संपादकीय : अथर्वचा न्यायालयीन लढा !

मध्यप्रदेशातील जबलपूर येथील १९ वर्षीय अथर्व चतुर्वेदी याने स्वतःच्या हक्कांसाठी सर्वाेच्च न्यायालयात स्वतः बाजू मांडून विजय मिळवला आहे.

मध्यप्रदेशातील जबलपूर येथील १९ वर्षीय अथर्व चतुर्वेदी याने स्वतःच्या हक्कांसाठी सर्वाेच्च न्यायालयात स्वतः बाजू मांडून विजय मिळवला आहे. त्याचे झाले असे की, अथर्व याला ‘राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षे’त (‘नीट’मध्ये) ५३० गुण मिळाले होते. त्याला आर्थिक दुर्बल घटकातून वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणे अपेक्षित होते; मात्र मध्यप्रदेश सरकारचे याविषयीचे धोरण स्पष्ट नसल्यामुळे त्याला प्रवेश मिळाला नाही. ‘वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी माझ्याकडे आवश्यक गुण आहेत आणि प्रवेश मिळणे, हा माझा हक्क आहे’, या विचाराने अथर्वने हक्कासाठी लढण्याचा निश्चय केला. ‘शहाण्याने न्यायालयाची पायरी चढू नये’, अशी आपल्याकडे म्हण आहे; मात्र अथर्वने ती चढण्याचा आणि त्याही पुढे जाऊन स्वतःचा खटला स्वतः लढण्याचा निश्चय केला. यासाठी आरक्षणाविषयी विविध न्यायालयांनी दिलेले निकाल, त्याविषयीचा कायदा आणि अन्य टिपण स्वतः काढून न्यायालयासमोर सादर करण्यासाठी याचिकेचा मसुदा स्वतः सिद्ध केला. त्याला पहिली लढाई मध्यप्रदेश उच्च न्यायालयात लढायची होती. ती तो यशस्वीपणे लढला. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी त्याचा युक्तीवाद ऐकून ‘तू डॉक्टर नव्हे, तर अधिवक्ता व्हायला हवेस’, असे सांगत कौतुक केले. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने त्याच्या बाजूने निकाल दिला; मात्र त्याची कार्यवाही होऊ शकली नाही. मग मात्र त्याने सर्वाेच्च न्यायालयाचे दार ठोठावले. सर्वाेच्च न्यायालयाच्या सुटीकालीन खंडपिठाने (‘व्हेकेशन बेंच’ने) २ मिनिटांत अथर्वची याचिका रहित केली. त्यानंतर तो परत मध्यप्रदेश उच्च न्यायालयात गेला. तेथून परत सर्वाेच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांच्या खंडपिठासमोर या याचिकेची सुनावणी झाली. सर्वाेच्च न्यायालयात साधारण विविध खंडपिठांसमोर २०० ते ३०० खटल्यांची सुनावणी होते. तेथे ३०-४० किंवा त्याहून अधिक वर्षे वकिली केलेले अधिवक्ते न्यायमूर्तींसमोर युक्तीवाद करत असतात. त्यातही याचिका असल्यास सरकारच्या बाजूने लढणार्‍या अधिवक्त्यांची तेथे फौज असते. जेव्हा अथर्वचा खटला सुनावणीसाठी आला, तेव्हा सरन्यायाधीश कामकाज संपवून उठू लागले होते; मात्र अथर्वची याचिका समोर आल्यावर त्यांनी थांबून त्याची सुनावणी केली. ‘हा तर लहान मुलगा आहे, याला सहज गुंडाळू’, अशी मनोवृत्ती असणारे अधिवक्ते अथर्वने मांडलेला अभ्यासपूर्ण युक्तीवाद, कायद्याची असलेली जाण आणि आत्मविश्वासाने मांडलेल्या सूत्रांनी अवाक् झाले. अथर्वची रास्त मागणी आणि त्यासाठी त्याने केलेला युक्तीवाद ऐकून सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी विशेषाधिकाराचा वापर करून अथर्वला आर्थिक दुर्बल घटकाच्या कोट्यातून वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याचे निर्देश दिले. अथर्वने दिलेल्या या प्रदीर्घ लढ्यामुळे केवळ त्यालाच नव्हे, तर त्याच्यासह आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनाही लाभ होणार आहे.

चिकाटी आणि संयम यांचा कस

न्यायालयाच्या चकरा मारणे, कायद्याची क्लिष्ट भाषा, युक्तीवाद यांमुळे सामान्य जनतेच्या मनात न्यायालयीन यंत्रणेविषयी भीती आहे. त्यामुळे वादी किंवा प्रतिवादी नियमितच्या सुनावण्यांनाही जाण्यास टाळतात. समाजाची अशी मानसिकता असतांना अथर्वने दिलेला हा लढा उठून दिसणारा आहे. त्याचे वडील अधिवक्ता आहेत; मात्र तरीही त्याने ‘हा माझ्या हक्कांसाठीचा लढा आहे’, असे सांगून स्वतः युक्तीवाद केला. सर्वाेच्च न्यायालयाच्या खंडपिठाने प्रथम याचिका रहित केल्यावर अथर्व खचून गेला नाही. त्याने पुन्हा जोमाने प्रयत्न करून मध्यप्रदेश उच्च न्यायालय आणि नंतर सर्वाेच्च न्यायालयाचे खंडपीठ अशी प्रक्रिया पूर्ण करून स्वतःची भूमिका मांडली. युक्तीवाद करतांना काही वेळा न्यायमूर्तींना काही सूत्रे पटली, तर काही पटली नाहीत. असे असतांनाही त्याने चिकाटीने स्वतःचे म्हणणे जोरकसपणे आणि नम्रपणे न्यायालयासमोर मांडले. उच्च किंवा सर्वाेच्च न्यायालयांतील न्यायमूर्तींसमोर अनेक प्रकरणांचा निपटारा करायचा असतो. त्यामुळे अल्प वेळेत युक्तीवादातील महत्त्वाची सूत्रे मांडणे महत्त्वाचे असते. अथर्वने ते लीलया केले. सर्वाेच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी अथर्वला अधिवक्ता सुशांत यांनी साहाय्य केले होते. ‘अथर्वने प्रत्येक वेळी न्यायमूर्तींना संबोधित करतांना ‘माननीय न्यायमूर्ती’, ‘आदरणीय न्यायमूर्ती’ असे आदरयुक्त शब्दप्रयोग केले. त्याच्याकडून एकदाही असे न म्हणण्याची चूक झाली नाही. न्यायालयाच्या कामकाजाचे बारकावे शिकण्यासाठी जिथे अन्य अधिवक्त्यांना १० ते १२ वर्षे लागतात. ते अथर्वने काही कालावधीत सहज साध्य केले. न्यायालयीन लढा देण्यासाठी सामान्य माणसाच्या मनात अनेक अडथळे असतात. अशांसमोर अथर्वने दिलेला लढा हा प्रेरणा देणारा आहे’, असे अधिवक्ता सिंह यांनी आवर्जून सांगितले. स्वतःच्या हक्कांसाठी लढण्याची जिद्द असली, तर मनुष्य कुठलेही संकट पार करू शकतो, हे अथर्वकडून शिकण्यासारखे आहे .

संस्कारही महत्त्वाचे !

ज्या वयातील मुले व्हिडिओ गेम्स पहाण्यात किंवा भ्रमणभाष हाताळण्यात मग्न असतात, त्या वयोगटातील अथर्वमध्ये ही परिपक्वता आली कुठून ? कोरोना महामारीच्या काळात न्यायालयीन कामकाजही ‘ऑनलाईन’ चालत असे. तेव्हा छोटा अथर्व त्याचे वडील करत असलेले युक्तीवाद बारकाईने ऐकत असे. न्यायाधिशांसमोर स्वतःचे सूत्र कसे मांडायचे ? कुठल्या सूत्रांना महत्त्व द्यायला हवे ? कुठले सूत्र ठासून मांडायला हवे ?, याचा अभ्यास त्याने त्या वेळी केला. ‘कोरोना महामारीच्या काळात मुलांमध्ये भ्रमणभाष वापरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले’, अशी तक्रार पालक करतांना दिसतात; मात्र ‘त्याचा सदुपयोग करणारी अथर्वसारखी मुलेही होती’, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.

अथर्व याच्यावर भारतभरातून कौतुकाचा वर्षाव होत असतांनाही त्याचे पाय भूमीवर आहेत. ‘मी पुष्कळ काही साध्य केले’, असा अभिनिवेश त्याच्या वागण्या-बोलण्यात कुठेही नाही. अनेक वृत्तवाहिन्यांना त्याच्या मुलाखती घ्यायच्या आहेत; मात्र दिवसभर तो ग्रंथालयात जाऊन अभ्यास करतो. त्यामुळे वाहिन्यांच्या प्रतिनिधींना रात्रीच त्याची मुलाखत घ्यायची संधी मिळत आहे ! ज्या वयात मुले प्रलोभनांमध्ये अडकतात, त्या वयात अथर्वमध्ये दिसणारी ही वृत्ती कौतुकास्पद आहे. असा सर्वांगीण विकास हा योग्य संस्कारांमुळेच होऊ शकतो, हे येथे विशेषत्वाने सांगावेसे वाटते. भारतामध्ये विविध न्यायालयांमध्ये अधिवक्त्यांच्या अभावामुळे ६६ लाख प्रकरणे प्रलंबित आहेत. अधिवक्त्यांकडून ‘तारखांवर तारखा देणे’, अशिलांकडून भरमसाठ पैसे घेणे यांमुळे जनतेची पिळवणूक होते. भारतीय जनतेने एकेकाळी ‘संगणक साक्षर’ होण्याचे मनावर घेऊन नवीन आव्हाने स्वीकारली होती. आता ‘कायदे साक्षर’ होऊन न्यायालयीन यंत्रणेविषयी असलेली भीती मनातून घालवली, तर न्यायालयीन प्रक्रियेत क्रांती घडायला वेळ लागणार नाही !

भारतीय जनतेने ‘कायदे साक्षर’ होऊन न्यायालयीन प्रक्रियेविषयी असलेली भीती घालवणे आवश्यक !