भारतीय मुसलमानही हिंदूच असल्याने त्यांची घरवापसी करायची आहे ! – Mohan Bhagwat

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे विधान

(घरवापसी म्हणजे हिंदु धर्मात पुनर्प्रवेश)

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – भारतात रहाणारे मुसलमानही हिंदूच आहेत, ते काही अरब देशांमधून आलेले नाहीत. त्यांचीही ‘घरवापसी’ (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) करायची आहे; पण हे काम हळूहळू होईल, असे विधान प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले.

प.पू. सरसंघचालक यांनी मांडलेली सूत्रे

१. एका कुटुंबात किमान ३ मुले असावीत. आता जी कुणी मुले लग्न करत आहेत, त्यांना सांगा की, त्यांनी किमान तीन मुले जन्माला घालावीत.

२. विद्यापीठ अनुदान आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे कुणाच्याही विरोधात नाहीत. सर्वांना समवेत घेऊन चालावे लागेल. या संदर्भात एका गटाला वाटते की, हे आपल्या विरोधात आहे. दुसर्‍या गटाला वाटते की, ते आपल्या बाजूने आहे. सरकार नियम बनवते. जर कुणाला ते चांगले वाटत नसेल, तर त्यांनी स्वतःची बाजू मांडली पाहिजे. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सरकार जो काही कायदा करेल, त्याचे पालन केले पाहिजे.

३. जर एखादी व्यक्ती खड्ड्यात पडली असेल, तर तिला बाहेर येण्यासाठी हात द्यावा लागेल आणि बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीला तिला बाहेर काढण्यासाठी थोडे वाकून हात पुढे करावा लागेल, जेव्हा दोघेही हात पुढे करतील तेव्हाच गोष्ट बनेल.

४. आपल्याला जातीच्या भानगडीत पडायचे नाही. ही जात अशी गोष्ट आहे, जी आपण अनेक दशकांपासून संपवण्याचा प्रयत्न करत आहोत; पण ही जात काही जात नाही.

५. मुसलमानही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले जाऊ इच्छितात. त्यांच्याच लोकांनी राष्ट्रीय मुस्लिम मंच हा मंच बनवला आहे.

मोगल आणि इंग्रज हिंदु धर्म अन् संस्कृती यांना मिटवू शकले नाहीत

५०० वर्षे मोगल आणि २०० वर्षे इंग्रज यांनी देशावर राज्य केले आणि ते निघून गेले; पण हिंदु धर्म अन् संस्कृती इतकी भक्कम आहे की, ते तिला मिटवू शकले नाहीत. इतक्या वर्षांत हिंदु धर्माचे कुणी काहीही बिघडवू शकले नाही, तर आता कोण काय बिघडवू शकेल ?