महाशिवरात्र हे भगवान शिवाचे व्रत आहे. भगवान शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात. त्या प्रहराला, म्हणजे शंकराच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्र असे म्हणतात. महाशिवरात्र हे व्रत माघ कृष्ण चतुर्दशी या तिथीला करतात. या वर्षी महाशिवरात्र १५ फेब्रुवारी २०२६ या दिवशी आहे.

महाशिवरात्री व्रताचे महत्त्व काय आहे ?
भगवान शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात. तो काळ पृथ्वीवर वर्षातून एकदा महाशिवरात्र म्हणून साजरा केला जातो, कारण पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. पृथ्वी आणि उच्चलोकांतील कालमानात अंतर आहे. पृथ्वी जड (स्थूल) आहे. जडाची गती पुष्कळ अल्प असते. म्हणजेच जडाला ब्रह्मांडात प्रवास करण्यास जास्त वेळ लागतो. देवता सूक्ष्म असल्याने त्यांची गती अधिक असते. त्यामुळे त्यांना ब्रह्मांडात प्रवास करण्यास कमी वेळ लागतो. यामुळेच पृथ्वी अन् देवता यांच्या कालमानात अंतर आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाची उपासना करण्यामागील शास्त्र याप्रमाणे आहे. ‘शिवाच्या विश्रांतीच्या वेळी शिव ध्यानावस्थेतून समाधी-अवस्थेमध्ये जातात. शिवाची समाधी-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्यामुळे विश्वातील किंवा ब्रह्मांडातील तमोगुण किंवा हालाहल त्यावेळी शिव-तत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे ब्रह्मांडामध्ये हालाहलाचे प्रमाण प्रचंड वाढते किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून जास्तीतजास्त शिव-तत्त्व आकृष्ट करणारी बिल्वपत्रे, पांढरी फुले, रुद्राक्षांच्या माळा इत्यादी शिवपिंडीवर अर्पण करून वातावरणातील शिव-तत्त्व आकृष्ट केले जाते. त्यामुळे वाईट शक्तींच्या वाढलेल्या दाबाचा परिणाम म्हणावा तितका जाणवत नाही’. – ब्रह्मतत्त्व (सौ. पाटील यांच्या माध्यमातून, १८.२.२००४, दुपारी ३.०५)
शिवाने स्वत: भक्तांना आशीर्वचन दिले आहे, जे महाशिवरात्रीला माझे व्रत करतील, त्यांच्यावर माझी पुढीलप्रमाणे कृपादृष्टी होईल –
१. पुरुषांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
२. कुमारिकांना मनासारखा वर मिळेल.
३. विवाहित स्त्रियांचे सौभाग्य टिकेल.
महाशिवरात्रीच्या दिवशी शिव सर्व जिवांना आवर्जून मार्गदर्शन करतात. त्यामुळे अनेक जीव शिवाकडून मार्गदर्शन घेण्यासाठी त्या दिवशी शिवलोकात उपस्थित असतात.
महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे ?
महाशिवरात्री व्रताचे दोन प्रकार आहेत – काम्य आणि नैमित्तिक. उपवास, पूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची तीन अंगे आहेत. माघ कृष्ण त्रयोदशीला एकभुक्त रहावे. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाशिवरात्र व्रताचा संकल्प करावा. सायंकाळी नदीवर किंवा तळ्यावर जाऊन शास्त्रोक्त स्नान करावे. भस्म आणि रुद्राक्ष धारण करावे. प्रदोषकाळी शिवाच्या देवळात जावे. शिवाचे ध्यान करावे. मग षोडशोपचार पूजा करावी. भवभवानीप्रीत्यर्थ तर्पण करावे. शिवाला एकशे आठ कमळे किंवा बेलाची पाने नाममंत्राने वाहावीत. मग पुष्पांजली अर्पण करून अर्घ्य द्यावे. पूजासमर्पण, स्तोत्रपाठ आणि मूलमंत्राचा जप झाल्यावर शिवाच्या मस्तकावरील एक फूल काढून ते स्वतःच्या मस्तकावर ठेवावे आणि क्षमायाचना करावी.
महाशिवरात्रीच्या रात्री करावयाची यामपूजा !
शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात, असे विधान आहे. त्यांना ‘यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालावे, अनुलेपन करावे, तसेच धोत्रा, आंबा आणि बेल यांची पत्री वाहावी. तांदुळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी देवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेतील मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. नृत्य, गीत, कथाश्रवण इत्यादी गोष्टींनी जागरण करावे. पहाटे स्नान करून पुनश्च शिवपूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. आशीर्वाद घेऊन व्रतसमाप्ती करावी. बारा, चौदा किंवा चोवीस वर्षे हे व्रत केल्यावर त्याचे उद्यापन करावे.
महाशिवरात्रीला शिवाचा ‘ॐ नमः शिवाय ।’ या षडक्षर मंत्राचा नामजप करा !
महाशिवरात्र या दिवशी शिव-तत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. भगवान शिवाची भावपूर्णरित्या पूजा करण्यासह
‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप जास्तीतजास्त केल्याने त्याची कृपा प्राप्त होते. आपल्याला शिव-तत्त्व अधिकाधिक ग्रहण करता येते.
(संदर्भ : संकेतस्थळ ‘Sanatan.org’)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !