पायाचा अस्थिभंग झाल्याने असह्य वेदना होत असूनही देहली येथील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त ग्रंथप्रदर्शनाची सेवा करतांना साधिकेने अनुभवलेली गुरुकृपा !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे डिसेंबर २०२५ मध्ये नवी देहली येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’मध्ये मला ग्रंथप्रदर्शन लावण्याची सेवा मिळाली होती. या सेवेसाठी वाराणसी आश्रमातून निघतांना मी प्रभु श्रीरामाला ‘माझ्याकडून ही सेवा समर्पितभावाने करून घे’, अशी प्रार्थना केली.

१. प्रदर्शनस्थळी जातांना अकस्मात् पाय मुरगळून असह्य वेदना होऊ लागणे अन् गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर शक्ती मिळून सेवेला आरंभ करता येणे

१.१२.२०२५ या दिवशी मी देहलीत पोचले आणि ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेला आरंभ केला. ७.१२.२०२५ या दिवशी मी सकाळी निवासस्थानाहून निघतांना माझा डावा पाय अकस्मात् मुरगळला आणि मला असह्य वेदना होऊ लागल्या. मला वाटले, ‘कदाचित् माझ्या पायाचा अस्थिभंग झाला असेल.’ तेव्हा मी गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘हे गुरुदेवा, माझ्या पायाच्या दुखापतीमुळे ग्रंथप्रदर्शनातील सेवेत कोणतीही बाधा येऊ नये.’ गुरुदेवांच्या कृपेने काही क्षणांतच मला जणू शक्ती मिळाली आणि मी जवळच असलेल्या सेवाकेंद्रात जाऊन सेवा चालू केली.

२. सेवा करतांना चैतन्य मिळून थकवा न येणे आणि उत्साह टिकून रहाणे

गुरुदेवांच्या कृपेने सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे वितरण करण्याच्या सेवेत एवढे चैतन्य होते की, मला कधीच थकवा आला नाही. माझा उत्साह सतत टिकून होता. माझ्या मनात अधिकतर ‘गुरुदेवांना अपेक्षित असे प्रदर्शन लावण्यासाठी आणखी काय करू शकते ?’, असे विचार चालू होते.

३. पायावर पुष्कळ सूज येणे आणि गुरुदेवांना प्रार्थना केल्याने पायात तीव्र वेदना होत असतांनाही निवासस्थानी चालत जाऊ शकणे

सौ. सानिका सिंह

सेवा करतांना माझे लक्ष क्वचित्च माझ्या पायाकडे गेले. माझ्या पायावर पुष्कळ सूज आली होती आणि तेथील त्वचा हिरवी-निळी झाली होती. १२.१२.२०२५ या दिवशी मी पूर्वसिद्धतेसाठी प्रदर्शनस्थळी आले होते. ती सेवा पूर्ण करून निवासस्थानी पोचायला पहाटेचे ४.४५ वाजले. त्या दिवशी प्रदर्शनस्थळापासून निवासाच्या ठिकाणी येण्यासाठी वाहनही उपलब्ध नव्हते आणि माझ्या पायात तीव्र वेदना होत होत्या. तेव्हा मी गुरुदेवांना प्रार्थना करून तशीच चालत जाऊ शकले.

४. सेवेतील चैतन्यामुळे पायाच्या वेदनांकडे फारसे लक्ष न जाणे

३ दिवस प्रदर्शनाची सेवा होती. तेव्हा मी अधूनमधून गुरुदेवांना प्रार्थना करत होते. सेवेमध्ये एवढे चैतन्य आणि उत्साह होता की, पायाच्या वेदनेकडे माझे फारसे लक्ष जात नव्हते. पायाच्या दुखापतीमुळे या सेवेत मला एकदाही अडचण आली नाही. गुरुकृपेने प्रदर्शनाच्या सेवेतील साधकही मला अत्यंत प्रेमाने सांभाळून घेत होते.

५. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ या प्रदर्शनस्थळी आल्यावर साधिकेने अनुभवलेली भावावस्था !

५ अ. मन कृतज्ञतेने भरून येणे : १५.१२.२०२५ या दिवशी ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या प्रदर्शनस्थळी येणार आहेत’, असे समजल्यावर माझे मन शरणागत झाले. ‘माझे साधनेचे प्रयत्न गुरुदेवांना अपेक्षित असे होत नाहीत’, यासाठी मला क्षमा करावी आणि माझ्यावर कृपा करावी’, असे मी वारंवार मनात म्हणत होते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या प्रदर्शनस्थळी आल्या. तेव्हा त्यांची वात्सल्यपूर्ण दृष्टी माझ्यावर पडली. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी माझे नाव उच्चारले. ते ऐकून माझे मन कृतज्ञतेने भरून आले. ‘माझ्यामध्ये एवढे स्वभावदोष आणि अहं असूनही गुरु किती प्रेम करतात !’, या विचाराने माझ्या डोळ्यांत भावाश्रू आले.

५ आ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी कौतुक केल्यावर कर्तेपणा गुरुचरणी अर्पण होणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘प्रदर्शनाची सेवा करणार्‍या सर्व साधकांची सेवा चांगली झाली आहे.’’ ते ऐकून माझे मन पूर्णतः शरणागत झाले. ‘हे तिन्ही मोक्षगुरूंनो, आपणच कर्ते-करविते आहात !’, असा विचार माझ्या मनात आला.

६. पायाची क्ष-किरण चाचणी केल्यावर ‘अस्थिभंग झाला आहे’, असे समजणे आणि ‘या स्थितीतही सेवा करून घेतल्याबद्दल गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त होणे

१६.१२.२०२५ या दिवशी मी पायाची क्ष-किरण चाचणी (‘एक्स रे’) केली असता माझ्या तळपायाच्या पंजातील हाडाचा (‘मेटाटार्सल’चा) अस्थिभंग झाल्याचे समजले. वास्तविक तळपायाच्या पंजातील हाडाचा अस्थिभंग झाला, तर व्यक्तीला नीट उभेही रहाता येत नाही, एवढ्या तीव्र वेदना होतात. मी तर अशा स्थितीत ७ ते १६ डिसेंबर या कालावधीत, म्हणजे १० दिवस उभे राहून सेवा केली आणि पुष्कळ चालले होते, तरीही मला अत्यल्प वेदना होत होत्या. हे केवळ आणि केवळ गुरुकृपेनेच शक्य होऊ शकले.

मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिम् ।
यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ।।

अर्थ : ज्याची कृपा मुक्यालाही बोलते करते आणि पांगळ्यालाही पर्वत ओलांडण्यास समर्थ बनवते, त्या परमानंदस्वरूप माधवाला (श्रीकृष्णाला) मी नमस्कार करतो.

मी अक्षरशः हेच अनुभवले होते. गुरुमाऊलीने माझ्या अस्थिभंगाच्या वेदना अत्यल्प करून मला सेवेचा अपार आनंद दिला.

७. प्रार्थना

‘हे गुरुदेवा, ‘माझे तन, मन, धन आणि बुद्धी सर्वकाही आपल्या चरणी समर्पित करून घ्यावे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला आपली चरणसेवा करता येऊ दे. ‘आपल्याला आनंद होईल’, असे साधनेचे प्रयत्न आपणच माझ्याकडून करून घ्या’, अशी मी आपल्या चरणी प्रार्थना करते.’

– सौ. सानिका संजय सिंह, वाराणसी आश्रम, उत्तरप्रदेश. (१६.१२.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक