विश्‍वाच्या कल्याणासाठी भारत सामर्थ्यसंपन्न होणे आवश्यक ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘नए क्षितिज’ कार्यक्रम !

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत मार्गदर्शन करतांना

मुंबई – विश्‍वाच्या कल्याणासाठीच भारताची निर्मिती झाली आहे. अर्थ आणि काम अन्य देशांमध्ये आहे; परंतु या पुरुषार्थांना साधून मोक्ष साधणारा धर्म भारतातच आहे. समाज आणि व्यक्ती यांचा एकत्रित विकास केवळ भारतीय संस्कृती साधू शकते. त्यामुळेच भारताला मोठे करणे आवश्यक आहे. विश्‍वाच्या कल्याणासाठी भारत सामर्थ्यसंपन्न होणे आवश्यक आहे, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. संघाच्या १०० व्या वर्षानिमित्त मुंबई येथे आयोजित ‘नए क्षितिज’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

७ आणि ८ फेब्रुवारी असे २ दिवस हा कार्यक्रम नेहरू सेंटर येथे होत आहे. या वेळी प.पू. सरसंघचालक डॉ. भागवत म्हणाले, ‘‘लाखो पिढ्यांनंतर या संस्कृतीची निर्मिती झाली. या संस्कृतीच्या रक्षणासाठी अनेकांनी बलीदान दिले. देशाचा भूगोल वेगवेगळा आहे. भारत मोठा झाला, तर विश्‍वातील स्वार्थीपणा बंद होईल. भारताला मोठे करण्यासाठी गुणवंत समाज आणि पूर्ण समाज हवा आहे. समाजामध्ये विविधता आहे; परंतु आधी सोपे प्रश्‍न सोडवूया, मग कठीण प्रश्‍नांची उत्तरे देऊ. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज होता येणार नाही; परंतु आपण त्यांच्या मार्गावरून जाऊ शकतो. त्या मार्गाने जाणारा मार्ग काटेरी आहे.’’