वास्तू पदविन्यास

वास्तूशास्त्रविषयक लेखमाला : लेखांक १३

वास्तूशास्त्रामध्ये वास्तू पदविन्यास एक महत्त्वाचा विषय आहे. यापूर्वीच्या लेखांमध्ये आपण भूमीची शुभाशुभता, प्रकार, वर्ण इत्यादी गोष्टी जाणून घेतल्या. आता भवन उभारण्यापूर्वी त्या भूमीचे आरेखन करावे लागते. तो भाग आपण आता समजून घेऊया. 

भूखंडाचे विशिष्ट पद्धतीने विभाजन करणे, याला ‘वास्तू पदविन्यास’ असे म्हणतात. पद म्हणजे भाग आणि विन्यास म्हणजे क्रमाने रचना करणे. ज्या जागेमध्ये भवन उभारायचे आहे, तिचे विविध पदांमध्ये विभाजन करून योग्य रचना करावी लागते. ‘मानसार’ या वास्तू ग्रंथामध्ये विविध पदांच्या वास्तूमंडलाचा उल्लेख आहे. त्यामध्ये १०२४ पदांपर्यंतच्या वास्तू पदविन्यासविषयी माहिती दिलेली आहे. 

शतवेश्मनि देशांश्च गृहादीनां निवर्तनम् ।
एकाशीतिपदेनैव सर्वं स्थानं मापयेत् ।। विश्वकर्मप्रकाश, अध्याय ४, श्लोक ३९ 

अर्थ : ज्या ठिकाणी १०० आणि त्याहून अधिक घरे आहेत, निवर्तन (साधारण ४ सहस्र हात चौरस भूमी) यांचे नियोजन अन् घरांची रचना यासाठी एकाशीतिपद (८१ पदांचे) वास्तूमंडलानुसार करावी.

भाग १२ वाचण्यासाठी क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1003400.html

१. ‘एकाशीतिपद’ आणि वास्तूपदमंडलानुसार पदांची नावे

यामुळे निवासी वास्तू, कार्यालये यांच्या दृष्टीने आपण ‘एकाशीतिपद (८१ पदांचे) वास्तूमंडला’चा अभ्यास करणार आहोत. भूमीचे समान ९ x (गुणिले) ९ असे विभाग करणे याला ‘एकाशीतिवास्तूपद’ असे म्हणतात. या पदांना शास्त्रामध्ये त्यांच्या वैशिष्ट्यानुसार आणि त्या पदांमध्ये कार्यरत ऊर्जेनुसार विशिष्ट नावे देण्यात आली आहेत. वास्तूपुरुषाच्या जन्मकथेमध्ये आपण वाचले होते की, ४५ देवता आणि असुर यांनी एकत्र येऊन वास्तूपुरुषाला पालथे पाडून त्यावर स्थानापन्न झाले. ते ज्या ठिकाणी स्थिर झाले, तो भाग त्या देवता किंवा त्यांच्या शक्तीच्या रूपाने ओळखला जाऊ लागला. याविषयी समजून घेऊया.

चतुश्रीकृते क्षेत्रे विभक्ते नवधा ततः ।
मध्ये महाद्युतिर्ब्रह्मा विधेयो नवभिः पदैः ।।

तस्मादनन्तरं प्राच्यां षट्पदः कीर्तितोऽर्यमा ।
आग्नेयकर्णे सवितृसावित्रौ पदिकावुभौ ।।

ब्रह्मणोऽनन्तरं याम्ये विवस्वान् षट्पदाश्रितः ।
नैर्ऋते पिदकोकर्णे जयेन्द्रौ कथितावुभौ ।।

षट्पदःस्यात् ततो मित्रः काष्ठायां पत्युरम्भसः ।
कर्णेऽपरोत्तरे यक्ष्मा रुद्रश्च पदिकावुभौ ।।

षड्भिः पदैःततः सौम्ये निश्चलः पृथिवीधरः ।
आपस्तथापवत्सश्च पदिकावीशदिग्गतौ ।।

इत्यन्तःसंश्रया देवाः प्रोक्ता ब्रूमो बहिः स्थितान् ।
ज्ञेयं प्रदक्षिणं तेषां स्थानं पूर्वाेतरादितः ।।

अग्निस्तदनु पर्जन्यो जयन्तश्चेन्द्र एव च ।
रविः सत्यो भृशश्चेति नभस्तस्मात् ततोऽनिलः ।।

पूषाख्यो वितथाख्यश्च गृहक्षतयमावथ ।
गन्धर्वाे भृराजश्च मृगः पितृगणस्ततः ।।

दौवारिकोऽथ सुग्रीवः पुष्पदन्तो जलेश्वरः ।
असुरः शोषनामा च पापयक्ष्मा ततः परम् ।।

रोगो नागश्च मुख्यश्च भल्लाटः सोम एव च ।
चरकोऽथदितिर्दैत्यमातेति पददेवताः ।। – समराङ्गणसूत्रधार, अध्याय १४, श्लोक १ ते १०

वरील श्लोकानुसार ८१ पदांना विविध नावे देण्यात आली आहेत. मध्यभागातील ९ पदांना ब्रह्माचे स्थान असते. यालाच आपण ‘ब्रह्ममंडल’ असे म्हणतो. ब्रह्ममंडलाच्या पूर्वेकडील ६ पदांवर ‘अर्यमा’चे स्थान असते. आग्नेय दिशेमधील कर्णरेषेने विभागलेल्या पदांवर ‘सवितृ’ आणि ‘सावित्र’ यांचे स्थान असते, तर ब्रह्ममंडलाच्या दक्षिण दिशेला ६ पदांवर ‘विवस्वान’ ही देवता असते. नैर्ऋत्य कोपर्‍यातील कर्णरेषेने विभागलेल्या पदांवर ‘जय’ आणि ‘इंद्र’ हे स्थान असते. ब्रह्ममंडलाच्या पश्चिम दिशेला ६ पदांच्या ठिकाणी मित्राचे स्थान असते. वायव्य दिशेच्या कर्णरेषेवरील पदावर ‘यक्ष्मा’ आणि ‘रुद्र’ यांचे स्थान असते. ब्रह्ममंडलाच्या उत्तरेला ६ पदांमध्ये ‘पृथ्वीधरा’चे, तर ईशान्य कोपर्‍यातील कर्णरेषेने विभागलेल्या २ पदांवर ‘आप’ आणि ‘आपवत्स’ यांचे स्थान असते. या वास्तूमंडलाच्या आतील बाजूच्या देवता आहेत. वरील श्लोकामध्ये वास्तूपदमंडलाच्या बाहेरील बाजूस असणार्‍या ३२ पदांची नावेसुद्धा आहेत.

एकाशीतिपद वास्तूपुरुष मंडल

अगोदरची १३ पदे आणि ३२ अशी एकूण ४५ देवता ८१ पदांमध्ये विभाजित केल्या आहेत. वरील देवतांपैकी जयंत, भृश, वितथ, भृंगराज, सुग्रीव, शोष, मुख्य, अदिती या पदांना प्रत्येकी २ पद देण्यात आली आहेत, तसेच ईशान्य दिशेला चरकी, आग्नेय दिशेला विदारी, नैर्ऋत्य दिशेला पुतना, वायव्य दिशेला पापराक्षसी, पूर्व दिशेला स्कंद, दक्षिण दिशेला विकट, पश्चिम दिशेला जृंभक आणि उत्तर दिशेला पिलीपिच्छ या बाहेरून रक्षण करणार्‍या देवता आहेत.

श्री. श्रेयस पिसोळकर

२. घटबिंब सिद्धांत

हे वास्तूमंडल सर्व आकाराच्या भूमींना लागू पडते. जो नियम मोठ्या वास्तूला लागेल, तोच नियम लहान वास्तूंनासुद्धा लागू असतो. ज्याप्रमाणे चंद्राचे प्रतिबिंब सरोवरासारख्या मोठ्या क्षेत्रामध्ये पडते, तसेच ते एका लहान पातेल्यातील पाण्यातही पडते; परंतु ते त्या पातेल्यामध्ये संकुचित होऊन दिसते. त्याप्रमाणे मोठ्या वास्तूंप्रमाणे लहान वास्तूंमध्येही समान ८१ पदे पडतात. केवळ त्यांचा आकार तुलनेने न्यून असतो. यालाच वास्तूशास्त्रामध्ये आपण ‘घटबिंब सिद्धांत’ असे म्हणतो.

३. वास्तूशास्त्राच्या नियमांत पदांचा करण्यात आलेला विचार

या वास्तूमंडलातील प्रत्येक देवतेची ऊर्जा, कार्य, तसेच शुभाशुभता यांच्याप्रमाणे कोणत्या पदामध्ये काय करावे आणि वास्तूमधील कोणता भाग असावा यांविषयी वास्तूशास्त्राचे नियम सिद्ध झाले आहेत. प्रवेशद्वार आणि देवघर कोणत्या पदात असावे, इत्यादी गोष्टींविषयी अभ्यास करतांना पदांचा विचार महत्त्वाचा ठरतो; कारण कोणत्या पदात प्रवेशद्वार आहे, त्यानुसार विविध शुभाशुभ फले शास्त्रामध्ये सांगितली आहेत; म्हणून योग्य पदांमध्ये प्रवेशद्वार घेण्यासाठी याचा लाभ होतो. वास्तूशांती विधी करतांना आपण याच देवतांचे आवाहन आणि पूजन करून त्यांना आहुती अर्पण करतो. बर्‍याच वेळा आपण असे म्हणतो की, पूर्व-उत्तर या शुभ दिशा, तर दक्षिण-पश्चिम या अशुभ दिशा आहेत; परंतु पदांनुसार विचार करतांना नेमकेपणाने त्या दिशांमध्ये कोणते पद शुभ आहे किंवा कोणते अशुभ आहे, याचा आपल्याला अभ्यास करता येतो. वास्तूमध्ये संतुलन साधण्यासाठी देवतांसह काही असुरांची स्थानेही वास्तूमध्ये असतात. याचा विचार आपल्याला वास्तूनिर्मिती करतांना सखोल करावा लागतो आणि कोणत्या ठिकाणी काय असायला हवे, याचा निर्णय घ्यावा लागतो.

(संदर्भ ग्रंथ : समराङ्गणसूत्रधार, विश्वकर्मप्रकाश, मयमतम्)

– श्री. श्रेयस पिसोळकर (वास्तूविशारद, ज्योतिष होराभूषण, होरारत्न), फोंडा, गोवा. (६.२.२०२६)

लेखांक १४ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1007762.html