वास्तूशास्त्रविषयक लेखमाला : लेखांक १२
वास्तूशास्त्राच्या अभ्यासामध्ये उताराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्वच पुराण वास्तूतज्ञांनी उताराचा अभ्यास करूनच भवन उभारण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. ‘अपराजित पृच्छ’, ‘समरांगण सूत्रधार’, ‘मयमतम्’, ‘मानसार’, ‘मनुष्यालय चंद्रिका’, ‘वास्तूविद्या’ अशा सर्वच वास्तूविषयक ग्रंथकर्त्यांनी उताराचा सखोल अभ्यास केला आहे. त्याविषयी आता आपण जाणून घेऊया.
तसा विचार केल्यास समतल भूमी ही भवन उभारण्यासाठी उत्तम असते; पण प्रत्येक वेळी अशी भूमी उपलब्ध होणे कठीण असते; म्हणून जर भूमी उंच सखल असल्यास कोणत्या भूमीला प्राधान्य द्यावे, याविषयी शास्त्रात नियम दिले आहेत. एखाद्या दिशेचा अभ्यास करतांना त्याच्या समोरील दिशेचा उतार अथवा चढ किती आहे ? याचे निरीक्षण करून त्या तुलनेनेच दुसर्या दिशेचा उतार अभ्यास करावा.
भाग ११ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1000990.html

१. प्लव (उतार) कुठे असल्यास काय फल मिळते ?
पूर्वप्लवे भवेल्लक्ष्मीराग्नेय्यां शोकमादिशेत् ।
याम्यां याति यमद्वारं नैर्ऋते च महाभयम् ।।
पश्चिमे कलहं कुर्याद्वायव्यां मृत्युमादिशेत् ।
उत्तरे वंशवृद्धि: स्यादीशाने रत्नसंचय: ।। – विश्वकर्मप्रकाश, अध्याय २, श्लोक १५ आणि १६
अर्थ : पूर्वेस उतार असलेली भूमी धन देते, आग्नेय कोपर्यात उतार असल्यास दु:खदायक, दक्षिणेस मृत्यू आणि नैर्ऋत्येस उतार असलेली भूमी महाभयकारक असते. पश्चिमेस उतार असल्यास कलह, वायव्येस उतार असल्यास मृत्यू, उत्तरेस उतार असल्यास वंशवृद्धी आणि ईशान्य दिशेस उतार असल्यास रत्नलाभ होतो.
या श्लोकातून आपल्याला लक्षात येते की, कोणत्या दिशेस उतार असल्यास काय फल मिळू शकते. त्यानुसार भूमीचे चयन (निवड) करतांना वरील श्लोकाप्रमाणे उताराचा विचार करावा. ‘मध्यभागी उतार, म्हणजेच खड्डा असणारी भूमी कष्टप्रद असते’, असे शास्त्रात सांगितले आहे.

कोणत्याही वास्तूला साधारणतः उत्तर-ईशान्य-पूर्व या दिशांना उतार असावा आणि आग्नेय-दक्षिण-नैर्ऋत्य-पश्चिम-वायव्य या दिशांना चढ असावा, असे मत सर्वच वास्तूशास्त्रकारांनी मांडले आहे.
– श्री. श्रेयस पिसोळकर
२. चढ कुठे असल्यास काय फल मिळते ?
इन्द्रोन्नतं पुत्रनाशं वन्ह्युन्नतं अर्थप्राप्तिदम् ।
अग्निनीचोर्थनाश:स्याद् याम्योन्नतमरोगकृत् ।।
निर्ऋत्युच्चं श्रियोलाभं पुत्रदं वरुणोन्नतम् ।
वायून्नतं द्रव्यनाशं सौम्योन्नतमथोगद: ।। – वास्तूविद्या (प्राचीन वास्तू ग्रंथ)
अर्थ : ज्याप्रमाणे उतार कुठे असल्यास काय फल मिळते, असे सांगितले आहे; त्याप्रमाणे चढाव कुठे असल्यास काय परिणाम होतो, तेही शास्त्रात सांगितले आहे. पूर्वेला चढ असेल, तर पुत्रनाश; आग्नेय दिशेस चढ असेल, तर आर्थिक लाभ करून देणारा (उतार असल्यास द्रव्यनाश होतो); दक्षिणेकडील चढ रोग दूर करणारा, तर नैर्ऋत्येकडे असणारा चढ संपत्ती देणारा असतो. पश्चिम दिशेला चढ असेल, तर पुत्रसौख्य देणारा, वायव्येकडील चढ द्रव्य नाश करणारा, उत्तर दिशेचा चढ आजाराला निमंत्रण देणारा, तर ईशान्य दिशेकडील चढ हा महाक्लेश देणारा असतो.
३. मध्यभागी उतार किंवा चढ असल्यास
प्रवासदा मध्यनता धरित्री मध्योन्नता वित्तसुखादीहन्त्री ।
वन्ह्यादिवाय्वन्तनता धरित्री प्रायेण दारिद्र्यफलप्रदा स्यात् ।। – मनुष्यालय चंद्रिका, अध्याय १, श्लोक २०
अर्थ : मध्यभागी दबलेली भूमी नेहमी प्रवास देणारी आणि स्थानांतर करण्यास भाग पाडणारी असते. मध्यभागी उन्नत (उंच) असणारी भूमी वित्त आणि सुख यांचे हरण करणारी असते, तसेच आग्नेय आणि वायव्य दिशेला अवनत (उतार असलेली) भूमी ही घरमालकाला निर्धनता देणारी असते.
जो नियम भूमीच्या उताराला लागू होतो, तोच नियम भवनाच्या वरील उतारालाही लागू असतो. घराच्या छताचा उतारही निश्चित करतांना पूर्व आणि उत्तर या दिशांना अधिक उतार किंवा दोन्हीकडे समान ठेवावा; परंतु दक्षिण आणि पश्चिम दिशेला पूर्व अन् उत्तर दिशेच्या तुलनेत अधिक उतार ठेवू नये. तो क्लेशकारक असतो, असे सांगितलेले आहे. बर्याच वेळा वास्तू निर्मिती करतांना अंतर्गत रचनेमध्ये भवनात प्रवेश केल्यावर खाली उतरून मग सोफा वगैरे बसण्याची व्यवस्था केलेली असते. मोठ्या बंगल्यांमध्ये अशी रचना केल्याचे दिसून येते; परंतु हासुद्धा वास्तूचा उतार म्हणून विचार केला जातो. तो जर अयोग्य दिशेला, म्हणजेच दक्षिण-पश्चिम आदी दिशांना असल्यास एक अतिरिक्त दोषाची वास्तूमध्ये भर पडते. म्हणून वास्तूची अंतर्गत रचना (डिझाईनिंग) करत असतांना वास्तूशास्त्राच्या नियमांना आपण कुठे छेद देत नाही ना, याचा आपण विचार करणे आवश्यक आहे. यासाठीच सध्याच्या सर्वच आधुनिक वास्तूविशारद आणि स्थापत्य अभियंते यांनी प्राचीन अन् पारंपरिक वास्तूशास्त्राचा अभ्यास करून घरे, तसेच इमारतींची निर्मिती करणे आवश्यक आहे. त्यामुळे दोषपूर्ण वास्तू निर्माण होणे न्यून होऊन समाजातील बर्याच समस्यांवर समाधान प्राप्त होईल. सर्वांनाच या शास्त्राचा अभ्यास करून सात्त्विक वास्तू निर्मिती करण्याची प्रेरणा मिळो, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना !
(संदर्भ ग्रंथ : मयमतम्, विश्वकर्मप्रकाश, वास्तूविद्या, मनुष्यालय चंद्रिका)
– श्री. श्रेयस पिसोळकर (वास्तूविशारद, ज्योतिष होराभूषण, होरारत्न), फोंडा, गोवा. (२९.१.२०२६)
भाग १३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1005465.html
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
क्रिकेटचा उदो उदो नको !