वास्तूशास्त्रविषयक लेखमाला : लेखांक १४
या अगोदरच्या लेखांमध्ये आपण भूमी आणि वास्तूचा पदविन्यास यांविषयी जाणून घेतले. या पदविन्यासाच्या आधारे वास्तूमध्ये कोणत्या पदामध्ये काय असावे आणि काय नसावे, याविषयी आपल्याला माहिती मिळते. समाजामध्ये वास्तूमध्ये कुठे काय असावे, याविषयी बरीच चर्चा चालू असते. याविषयी समाजामध्ये बरेच समज आणि गैरसमज आहेत. म्हणून याविषयी सर्वांना मूळ ग्रंथांमध्ये काय नियम आहेत, हे लक्षात यावे, हा या लेखाचा मुख्य उद्देश आहे. वास्तूच्या रचनेमध्ये सर्वप्रथम आपण प्रवेशद्वाराचा विचार करतो म्हणून यापुढील लेखांमध्ये आपण प्रवेशद्वाराविषयी जाणून घेऊया.
(भाग १)
लेखांक १३ वाचण्यासाठी क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1005465.html

१. ‘प्रांगण प्रवेश’ आणि ‘सिंहद्वार’
भूमीचे आरेखन (आखणी) करतांना महत्त्वाचा विषय आहे वास्तूप्रवेश ! भूमीची निवड केल्यानंतर आपण त्याचे ‘एकाशीतिपद वास्तूमंडला’नुसार (७ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेला लेख क्रमांक १३ वाचावा) आरेखन करून घ्यावे, इथपर्यंतचा भाग आपण आतापर्यंत पाहिला. आता वास्तूमध्ये (भूमीमध्ये) प्रवेश कुठून करायचा, या भागाचा विचार करायचा आहे. यासाठी आपल्याला इतर सर्व खोल्या आणि सुविधा यांचा विचार करायचा असतो. याविषयी मूळ वास्तूशास्त्रामध्ये काही महत्त्वाचे नियम आहेत.

रिकाम्या जागेला संरक्षण भिंत (कंपाऊंड वॉल) करणे महत्त्वाचे असते. अशा बंदिस्त कंपाऊंडमधून जागेत येण्यासाठी जे प्रवेशद्वार असते, त्याला ‘प्रांगण प्रवेश’ असे म्हणतात. तर भूमीमध्ये घर उभे राहिल्यानंतर त्या घरात प्रवेश करण्यासाठी जे द्वार असते त्याला ‘सिंहद्वार’ (मेन एंट्रन्स) असे म्हणतात.
२. प्रवेशद्वार कोणत्या दिशेला आणि कुठे हवे, याविषयी उल्लेख शास्त्रात असणे
भूमीला ‘कंपाऊंड’ करून घेतल्यानंतर मुख्य रस्ता ज्या दिशेला आहे, त्यानुसार प्रांगण प्रवेश कोणत्या दिशेला घ्यायचा, ते निश्चित करावे लागते. सध्या समाजामध्ये प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असल्यास ते अशुभ असते, असा एक समज पसरलेला आहे; परंतु वास्तूशास्त्राच्या कोणत्याही ग्रंथामध्ये दक्षिण दिशेला प्रवेशद्वार अयोग्य असे सांगितलेले नाही; पण प्रवेशद्वार कोणत्या दिशेला आणि कुठे असायला हवे, तसेच दक्षिणेला द्वार घेतांना कोणत्या पदात घ्यावे, हे मात्र स्पष्टपणे सांगितलेले आहे. त्यासह पूर्व आणि उत्तर या दिशा शुभ आहेत; म्हणून त्या दिशांना प्रवेशद्वार कोणत्याही ठिकाणी घेऊन चालत नाही. त्याचीही जागा शास्त्राने निश्चित करून दिली आहे.
३. वर्णानुसार प्रवेशद्वाराची दिशा

सर्वप्रथम आपण कोणत्या वर्णाला कोणत्या दिशेचे प्रवेशद्वार लाभदायक आहे, हे पाहूया. वर्णाचा विचार गुणकर्मानुसार करावा.
प्रत्यङ्मुखं ब्राह्मणानां क्षत्रियाणां तथोत्तरे ।
वैश्यानां पूर्वदिग्द्वारं शूद्राणां दक्षिणे शुभम् ।। – विश्वकर्मप्रकाश, अध्याय ७, श्लोक १३
अर्थ : ब्राह्मण वर्णियांचे घराचे द्वार हे पश्चिमाभिमुख (पूर्व दिशेला) असावे. क्षत्रिय वर्णियांचे घराचे द्वार उत्तराभिमुख (दक्षिण दिशेला) असावे. वैश्यांचे घराचे द्वार पूर्वाभिमुख (पश्चिम दिशेला) तर शूद्र वर्णियांच्या घराचे द्वार दक्षिणाभिमुख (उत्तर दिशेला) असणे शुभ असते.
४. वास्तूच्या कोनात (चार कोपर्यातील) द्वार वर्ज्य

वास्तूशास्त्राच्या सर्वच ग्रंथांमध्ये वास्तूच्या कोपर्यात द्वार असणे वर्ज्य सांगितलेले आहे.
अ. वर्जयेत् कोणेष्वेव विशेषत: । (संदर्भ : विश्वकर्मप्रकाश, अध्याय ७, श्लोक २०) याचा
अर्थ : कोपर्यातील द्वार वर्ज्य करावे.
आ. गृहकुक्षौ कृतं द्वारं सर्वरोगभयङ्करम् । (संदर्भ : समराङ्गणसूत्रधार, अध्याय ३५, श्लोक ५९)
अर्थ : घराच्या कुक्षीला (कोपर्यात) द्वार केल्यास सर्वरोग निर्माण करणारे ठरते.
सध्या बर्याच ठिकाणी सदनिकांचे प्रवेशद्वार हे कोपर्यातच घेतले जाते. बांधकाम व्यावसायिकांना एकाच मजल्यावर दोन-चार सदनिकांचे डिझाईन करायचे असल्याने त्यांच्या दृष्टीने कोपर्यातील द्वार हे सोयीचे होते; पण ते करत असतांना ‘मूळ वास्तूशास्त्राचा अभ्यास नसल्याने आपण एक वास्तूदोष निर्माण करत आहोत’, याचे भान त्यांना रहात नाही; मात्र ‘आमच्या सदनिका या वास्तूशास्त्रानुसारच आहेत’, असा प्रचार मात्र सरसकट केला जातो.
५. घराच्या मधोमध प्रवेशद्वार निषेध !

वास्तूच्या मधोमध, म्हणजेच ब्रह्ममंडलामध्ये प्रवेशद्वार वास्तूशास्त्रानुसार निषिद्ध आहे. अशा प्रकारचे प्रवेशद्वार बर्याच घरांमध्ये असण्याची शक्यता असते. अशा वास्तूंमध्ये पायर्या चढून वर गेल्यावर मधोमध प्रवेश घेतला जातो. तोसुद्धा एक प्रकारचा वास्तूदोष आहे.
गृहमध्ये कृतं द्वारं द्रव्यधान्यविनाशनम् ।
अवाहतकलहं शोकं नार्यावासं प्रदूषयेत् ।। – विश्वकर्मप्रकाश, अध्याय ७, श्लोक ७८
अर्थ : घराचे मुख्य प्रवेशद्वार ठिक मध्यभागी असल्यास धनधान्याचा नाश होतो. कारणाविना कलह, शोक, तसेच घरातील स्त्रियांचे मने कलुषित होतात.
वरील पद्धतीने प्रवेशद्वार टाळावे; कारण प्रवेशद्वार हा वास्तूच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे बर्याच वास्तूग्रंथांमध्ये प्रवेशद्वाराविषयी स्वतंत्र अध्याय दिलेले आहेत. यातून प्रवेशद्वार निर्दाेष असणे, हे वास्तूशास्त्रकारांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते, असे लक्षात येते.
(संदर्भ ग्रंथ : विश्वकर्मप्रकाश, समराङ्गणसूत्रधार)
– श्री. श्रेयस पिसोळकर (वास्तूविशारद, ज्योतिष होराभूषण, होरारत्न), फोंडा, गोवा. (१२.२.२०२६)
लेखांक १५ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1013087.html
क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
स्त्रीत्वाचा उत्सव !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘सत्संग’ आणि कला !