जळगाव येथे वाहनफेरीत दुमदुमला शेकडो धर्मप्रेमींकडून हिंदुत्वाचा जयघोष !

हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त आयोजन

वाहनफेरीमध्ये सहभागी धर्मप्रेमी

जळगाव – हिंदूंवर होणारे अन्याय आणि अत्याचार उघड करण्यासाठी, धर्मशिक्षणाने हिंदूंना संघटित करणे आणि ‘हिंदु-राष्ट्र स्थापने’ची पायाभरणी करण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसारासाठी शहरात वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले होते. यात शेकडो हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. फेरीत भगवे ध्वज, भगवे फेटे, टोप्या घातलेले हिंदू सहभागी झाले होते. त्यांनी दिलेल्या ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् !’, ‘भारतमातेचा विजय असो !’, ‘हिंदु एकजुटीचा विजय असो !’, ‘हिंदूंनो जागे व्हा !’, ‘वन्दे मातरम् !’ अशा घोषणांनी शहर दुमदुमले. या वीरश्रीयुक्त घोषणांमुळे वातावरणात शौर्य आणि चैतन्य यांची लहर उसळली.

वाहनफेरीमध्ये घोषणा देतांना सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु स्वाती खाडये आणि धर्मप्रेमी

वाहनफेरीसाठी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाड्ये यांची विशेष उपस्थिती लाभली. या फेरीत भाजप, उद्धव ठाकरे गट, शिवसेना हे पक्ष, तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि मान्यवर मंडळी सहभागी झाली होती.

प्रारंभी ‘बिग बाजार’, नेहरू चौक, येथे धर्मध्वजाचे पूजन ‘जनता सहकारी बँक’ेचे अध्यक्ष श्री. सतीश मदाने आणि सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते झाले.

श्री इच्छापूर्ती गणेश मंदिराजवळ श्री. श्याम कोगटा यांनी ध्वजपूजन केले, कोर्ट चौक येथे अधिवक्ता मंडळाने फेरीचे स्वागत केले, तर गणेश कॉलनी येथे नगरसेवक सौ. दीपमाला काळे, श्री. चंद्रशेखर अत्तरदे यांनी फेरीचे स्वागत केले. ‘सुकृती पॅनल’जवळ नगरसेवक श्री. मनोज चौधरी यांनी, तर पिंप्राळा चौकात माजी उपमहापौर श्री. कुलभूषण पाटील यांनी सरबत वितरणाचे नियोजन केले होते.

स्वागत करतांना अनेकांनी फेरीवर फुले उधळली. फेरीच्या स्वागतासाठी अनेकांनी रांगोळ्या काढल्या होत्या.

पिंप्राळा येथे फेरीच्या समारोपाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी १ फेब्रुवारी या दिवशी मानराज पार्क येथे होणार्‍या सभेत मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन या वेळी नागरिकांना केले.

वाहन फेरीत उपस्थित मान्यवर !

नवनिर्वाचित नगरसेवक सर्वश्री मनोज चौधरी, मुकुंदा सोनवणे, कल्पेश सोनवणे, चंद्रशेखर अत्तरदे, नरेंद्र पाटील, तसेच राहुल पाटील, कैलासअप्पा सोनवणे, अतुल बारी, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, तसेच नवनिर्वाचित नगरसेविका प्रतीक्षा सोनवणे, सौ. दीपमाला काळे, सौ. उज्ज्वला बेंडाळे आणि माजी महापौर सौ. सीमा भोळे