‘तिरुमला तिरुपती देवस्थानम्’ने हिंदु मुलांना धर्मशिक्षण द्यावे ! – Global Hindu Heritage Foundation

‘ग्लोबल हिंदु हेरिटेज फाऊंडेशन’ची मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडे मागणी

ग्लोबल हिंदु हेरिटेज फाऊंडेशन’चे अध्यक्ष प्रा. प्रकाशराव व्ही. वेलगापुडी

तिरुपती (आंध्रप्रदेश) : भारतात, तसेच विदेशात सनातन धर्माचे संरक्षण आणि प्रसार करण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानम्ने (‘टीटीडी’ने) हिंदु मुलांसाठी स्वतंत्र धर्मशिक्षण वर्ग चालू  करावेत, अशी मागणी ‘ग्लोबल हिंदु हेरिटेज फाऊंडेशन’ने आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.

‘ग्लोबल हिंदु हेरिटेज फाऊंडेशन’चे अध्यक्ष प्रा. प्रकाशराव व्ही. वेलगापुडी यांनी स्वाक्षरी केलेल्या या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि ‘टीटीडी’चे कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल सिंगल यांना पाठवण्यात आली आहे. या निवेदनात ॲनी बेसंट यांच्या विचारांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्या म्हणाल्या होत्या, ‘‘४० वर्षे जगभरातील प्रमुख धर्मांचा अभ्यास केल्यानंतर हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व माझ्या लक्षात आले. हिंदु धर्माविना भारताचे अस्तित्व आणि भविष्य शक्य नाही. भारताची मुळे सनातन धर्मात खोलवर रुजलेली असून स्वतःचा धर्म आणि संस्कृती जपण्याचे दायित्व हिंदु समाजावरच आहे. हिंदूंनीच हिंदु धर्म टिकवला नाही, तर तो जपणारा कुणीच उरणार नाही.’’

या निवेदनात पुढे म्हटले आहे की,

१. ‘टीटीडी’च्या हिंदु धर्मप्रचार परिषदेच्या वतीने हिंदु मुलांना शास्त्र, धर्म, नीती, संस्कृती आणि परंपरा यांचे शिक्षण देणे आवश्यक आहे. ५ वर्षांपासूनच मुलांना धर्मशिक्षण दिले जावे. ‘टीटीडी’च्या अंतर्गत असलली श्री वेंकटेश्वराची सर्व मंदिरे आणि शैक्षणिक संस्था यांमध्ये हिंदु धर्माचे अभ्यासक्रम चालू करावेत

२. या वर्गांमध्ये ॐकाराचा जप, गणपति प्रार्थना, गुरुस्तुती, सूर्यनमस्कार, नीतीकथा, राष्ट्रपुरुषांची माहिती, हिंदु धर्माची वैज्ञानिकता, मंदिरे आणि परंपरा यांचे महत्त्व, रामायण, महाभारत अन् पुराणकथा, भगवद्गीतेतील श्लोक, भजने, योग आणि ध्यान, समाजसेवेचे मूल्य अन् शांती मंत्रांचा समावेश असावा.

अनेक पिढ्यांपासून हिंदूंना धर्माचे ज्ञान न दिले गेल्याने त्यांचे धर्मांतर !

अनेक पिढ्यांपासून हिंदूंनी त्यांचे धार्मिक, तात्त्विक आणि सांस्कृतिक ज्ञान पुढील पिढ्यांपर्यंत प्रभावीपणे पोचवलेले नाही. परिणामी हिंदु धर्माविषयी पुरेसे ज्ञान नसल्याने मुले, तसेच प्रौढ व्यक्ती धर्मांतराच्या मोहात अडकत आहेत. वैज्ञानिक, तात्त्विक, आध्यात्मिक आणि नैतिक मूल्यांची ओळख नसल्याने समाज कमकुवत होत आहे.

संपादकीय भूमिका

  • खरे तर मोठ्या मंदिरांनी हिंदूंना धर्मशिक्षण देणे अपेक्षित आहे; परंतु आज तीच मंदिरे सरकारी नियंत्रणात असल्याने आणि सरकारच सर्वधर्मसमभावी असल्याने हिंदु भक्तांनी अर्पण केलेले धन सरकार हिंदूंच्या धर्मशिक्षणासाठी वापरायचे सोडून सामाजिक, शैक्षणिक आदी उपक्रमांना देतात ! देवद्रव्याची अशी हानी हिंदू कधी रोखणार ?
  • अशी मागणी कुठल्या मुसलमान संघटनेला कधी मशिदी किंवा मदरसे यांच्याकडे करावी लागते का ?