मराठीप्रेमाचे मायावी उमाळे… !

येत्या काळात महाराष्ट्रात मराठीच्या सूत्रावरून अराजक माजवण्याचा प्रयत्न केला जाईल. काही केल्या जनमत मोदी आणि भाजप यांच्याविरुद्ध जात नाही, हे पाहून वैफल्यग्रस्त झालेली काँग्रेस अन् त्यांची दरबारी ‘इकोसिस्टम’ (यंत्रणा) यांनी गेली १२ वर्षे सतत मिळेल त्या काडीचा आधार घेऊन रान पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी थक्क करणार्‍या वैचारिक कोलांट्या मारल्या असल्या, तरी एका विषयात मात्र सातत्य दिसते. हिंदूंचे ऐक्य तोडून त्यांच्यात फूट कशी पाडता येईल, यासाठी कधी हास्यास्पद, तर कधी गंभीर प्रयत्न सातत्याने केले जातात.

प्रतिकात्मक चित्र

१. विरोधकांकडून समाजात फूट पाडण्यासाठी भाषावादाचा आधार घेण्याची शक्यता

भाजप सत्तेत येताच जातीयवादाच्या ज्वाळा कशा भडकवल्या गेल्या, हे महाराष्ट्राने वारंवार अनुभवले. देवेंद्र फडणवीस यांनी ही परिस्थिती संयमाने हाताळून सर्व बाजूंना विश्वासात घेऊन या ज्वाळा विझवण्यात यश मिळवले. जातीयवादाचे हत्यार काही काळ का होईना, बोथट झालेले पाहून आता समाजात फूट पाडण्यासाठी भाषावादाचा आधार घेतला जात आहे.

महापालिका निवडणुकीत दादर, माहीम, परळ, शिवडी, वरळी, लालबाग या मर्यादित भागात का होईना, भाषेवर आधारित ‘कन्सॉलिडेशन’ (एकत्रीकरण) झाले, हे पाहून आशा पल्लवित झालेले हे टोळके आता संपूर्ण महाराष्ट्रात भाषावादाचा भडका उडवण्याचा प्रयत्न करणार, हे निश्चित आहे.

श्री. अभिजित जोग

२. फूट पाडण्यासाठी कोण पुढे असेल ?

यात आघाडीवर असतील, ते वर्षानुवर्षे काँग्रेसच्या विविध अनुग्रहांचा लाभ घेणारे पत्रकार, तथाकथित विचारवंत; लोकांनी आजवर ज्यांचे नावही कधी ऐकलेले नाही, असे लेखक, सोयीस्कर विषयांवर पत्रके काढणारे पत्रकबहाद्दर, फॅशनेबल आंदोलनजीवी, थोडक्यात म्हणजे संविधान, आविष्कारस्वातंत्र्य, लोकशाही, विवेकवाद यांसारख्या विषयांवर उठसूट प्रवचन झोडणारे छद्म पुरोगामी आणि ‘स्यूडो सेक्युलर्स’ (छद्मी निधर्मी). या मूल्यांवर यांची निष्ठा किती बेगडी आणि ‘सिलेक्टिव्ह’ (निवडक) असते, हे वारंवार उघडे पडतेच. ताजे उदाहरण घ्यायचे झाले, तर गाझामधील विध्वंसावर तारस्वरात बोलणार्‍या या टोळीने इराणमधील आंदोलकांच्या कत्तलीवर तोंडाला कुलूप घातले आहे.

३. मराठीप्रेमाचा मुलामा देऊन अराजक पसरवण्याचे षड्यंत्र

यामुळे हे लोक खरे-खोटे, योग्य-अयोग्य असा कुठलाही विधीनिषेध न बाळगता मराठीच्या बेगडी प्रेमाचा आधार घेऊन अराजकाची आग भडकवण्याचा प्रयत्न करतील. ‘उत्तर भारतीय आणि गुजराती हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत’, असा प्रचार केला जाईल. रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांकडे नजर वर करून बघण्याचे धाडस नसणार्‍या गुंडांनी इतर प्रदेशातील भारतीय नागरिकांना मारहाण केली की, टाळ्या पिटून आनंदाचे चित्कार काढले जातील. या सगळ्याला मराठीप्रेमाचा आकर्षक मुलामा दिला जाईल.

असे असले, तरी यांचे मराठीप्रेम किती खरे आहे, हे पडताळून पहाण्यासाठी हे बघितले पाहिजे की, यांच्यापैकी किती जणांची मुले-नातवंडे मराठी शाळेत शिकतात किंवा महाराष्ट्रात नोकरी, व्यवसाय करतात ? किती जणांना मराठीत ४ ओळी धड लिहिता-बोलता येतात ? (‘तू माझे साहाय्य कर’, छाप मराठी बोलणार्‍यांनी मराठीप्रेमाचे उमाळे काढावे, हे हास्यास्पद आहे !) किती मराठी पुस्तके यांनी विकत घेऊन वाचली आहेत ? सत्य हे आहे की, मराठी भाषेशी यांना काहीही देणे-घेणे नाही. यांना मोदी-भाजपला हटवण्यासाठी सूत्र हवे आहे. तसे नवीन काही सूत्र हाती लागले की, हे मराठीचे सूत्र अलगद वार्‍यावर सोडून देतील.

४. मराठीच्या नावाखाली फूट पाडणार्‍या कारवायांना थारा न देता एकत्र रहाणे महत्त्वाचे !

तमिळनाडूत ‘तमिळमध्ये बोला’; म्हणून कुणाला मारहाण करावी लागत नाही; कारण सगळेच तमिळ बोलत असल्यामुळे बाहेरून येणार्‍या व्यक्तीला तमिळ शिकावीच लागते, तसेच आपण सगळे मराठीत का बोलू शकत नाही ? गुजराती- मारवाडी धंदा व्यवसायात प्रगती करतात; कारण त्यांच्या समाजाचा त्यांना पाठिंबा असतो. उद्योजकतेसाठी आपल्या तरुणांच्या पाठीशी उभे रहाणारे असे ‘सोशल कॅपिटल’ (सामाजिक भांडवल) मराठी माणूस का निर्माण करू शकत नाही ? एकेकाळी महाराष्ट्राने राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत देशाचे नेतृत्व केले होते. मग आपल्या अस्तित्वाबद्दलची, भाषेबद्दलची ओशाळलेपणाची आणि न्यूनगंडाची भावना मराठी मनात कधी शिरली ? ज्यांना महाराष्ट्राविषयी आणि मराठीविषयी खरे प्रेम आहे, त्यांनी या प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत. इतर प्रांतियांचा द्वेष करून मराठीचा सन्मान वाढणार नाही; म्हणूनच मराठीच्या नावाखाली केल्या जाणार्‍या फूट पाडणार्‍या कारवायांना आपण थारा देता कामा नये. मोदी म्हणतात, त्यानुसार ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे !’ (एकत्र रहाल, तर सुरक्षित रहाल !)

– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे. (२४.१.२०२६)