ग्रामीण भारतात शिक्षणापेक्षा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ यांवर होतो अधिक खर्च !

सरकारी सर्वेक्षणतून समोर आलेली माहिती

नवी देहली : ग्रामीण भारतात शिक्षणावर होणार्‍या खर्चापेक्षा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ यांवर अधिक पैसा खर्च केला जात असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. घरगुती उपभोग आणि खर्च सर्वेक्षणनुसार ग्रामीण कुटुंबे त्यांच्या एकूण खर्चापैकी केवळ २.५ टक्के खर्च शिक्षणावर करतात, तर तब्बल ४ टक्के खर्च तंबाखूजन्य पदार्थांवर, विशेषतः गुटख्यावर केला जातो.

१. वर्ष २०११-१२ ते २०२३-२४ या कालावधीत ग्रामीण भागांत तंबाखूवरील प्रतिव्यक्ती खर्चात ५८ टक्के वाढ झाली असून शहरी भागांत ही वाढ ७७ टक्के इतकी आहे. सध्या ग्रामीण भागात प्रतिमहा प्रतिव्यक्ती खर्चाच्या सुमारे १.५ टक्के आणि शहरी भागात १ टक्का खर्च तंबाखूवर होत आहे.

२. वर्ष २०११-१२ मध्ये ग्रामीण भारतात तंबाखूचे सेवन करणार्‍या कुटुंबांची संख्या ९ कोटी (५९.३ टक्के) होती, ती वर्ष २०२३-२४ मध्ये १३ कोटी ३० लाखांवर (६८.६ टक्के) पोचली आहे. म्हणजेच अवघ्या दशकभरात ३३ टक्के वाढ झाली आहे. शहरी भागांत ही वाढ आणखी वेगवान असून तंबाखूचे सेवन करणारी कुटुंबे २ कोटी ८० लाखांवरून ४ कोटी ७० लाखांवर पोचली आहेत. शहरी भागातील तंबाखू वापरणार्‍या कुटुंबांचा वाटा ३४.९ टक्क्यांवरून ४५.६ टक्के झाला आहे.

३. सध्या ग्रामीण भागातील एकूण तंबाखू खर्चापैकी ४१ टक्के खर्च गुटख्यावर होत असून तो सर्वाधिक वापरला जाणारा तंबाखूजन्य पदार्थ ठरला आहे. शहरी भागात सिगरेट अजूनही सर्वाधिक वापरली जात असली, तरी १६.८ टक्के शहरी कुटुंबे गुटखा वापरत असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

भारताला निरोगी ठेवण्याऐवजी महसूल वाढण्याकडे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांनी लक्ष दिल्याचाच हा परिणाम आहे !