जोडाक्षर पद्धती, व्यंजन चिन्हे आणि गणेशविद्या यांचा जनक श्री गणेश !

आज ‘श्री गणेश जयंती’ आहे. त्या निमित्ताने…

एक प्रसिद्ध आख्यायिका आहे की, महर्षि व्यास यांनी श्री गणेशाला ‘महाभारत’ लिहिण्यासाठी लेखनिक होण्याची विनंती केली. ‘मला लिहितांना थांबावे लागू नये’, अशा प्रकारे सलग लिखाण सांगण्याची अट श्री गणेशाने घातली. सलग लिखाण सांगतांना थोडी सवड मिळावी; म्हणून व्यास यांनी श्री गणेशाला प्रतिअट घातली, ‘त्याने महाभारत लिहितांना नव्या आणि परिपूर्ण अक्षरसंचासह अन् नव्या परिपूर्ण लेखन पद्धतीने लिहिले पाहिजे.’ श्री गणेशाने ही अट पाळतांना व्यासांच्या उच्चारांचे नीट अवलोकन केले, उच्चारांशी सुसंगत अक्षरचिन्हे निवडली. लेखन वेगाने होण्यासाठी श्री गणेशाने जोडाक्षर पद्धती विकसित केली. श्री गणेशाने तेव्हा विकसित केलेल्या लेखन पद्धतीत काही पालट होत आजची मराठी देवनागरी लिपी उपलब्ध झाली आहे. ही उपलब्ध लिपी अतिशय शास्त्रीय आहे.

भाषेच्या लिपींचा जनक श्री गणेश !

जगातील सर्व मानवांना ३३ मणके असतात. या ३३ मणक्यांशी या देवनागरी लिपीतील ३३ चिन्हे एकास एक संगतीने जुळलेली आढळतात, त्यांना सध्या मराठी देवनागरी लिपीतील ‘३३ व्यंजनचिन्हे’ म्हणून ओळखले जाते. मणक्यांच्या वरील भागातील मुखाशी संबंधित १६ उच्चारांशी १६ अक्षरचिन्हे जुळलेली आहेत. त्यांना ‘मराठी देवनागरी स्वरचिन्हे’ म्हणून सध्या ओळखले जाते. या चिन्हांच्या साहाय्याने श्री गणेशाने जोडाक्षर पद्धतही विकसित केली. यासह ३ संयुक्त व्यंजनचिन्हेही श्री गणेशाने निर्माण केली. श्रीगणेशाने ही सर्व ५२ चिन्हे ‘ॐ’ या बीजाक्षराच्या विविध अवयवांपासून निर्माण केली होती. या ५२ चिन्हांचा उपयोग करून २० सहस्र ७३७ दोन अक्षरी जोडाक्षरे, ७ लाख ४६ सहस्र ४९६ तीन अक्षरी जोडाक्षरे, २ कोटी ६८ लाख ७३ सहस्र ८५६ चार अक्षरी जोडाक्षरे, ९६ कोटी ७४ लाख ५८ सहस्र ८१६ पाच अक्षरी जोडाक्षरे निर्माण होतात. श्री गणेशाने हा अक्षरसंच आणि लेखन पद्धत निर्माण केली अन् ती नागरिकांच्या वापरासाठी पुष्कळच सोयीची ठरली. ‘ग, ण, श’ या ३ अक्षरांचे हे वेगळेपण, ही स्वर व्यंजन व्यवस्था श्री गणेश या देवतेनेच निर्माण केल्याचे सूचक मानून श्रद्धाळू गणेशभक्त देवनागरी लिपीला ‘गणेशविद्या’ म्हणतात.

‘गणेशविद्या’ या चिन्ह व्यवस्थेत स्थळ आणि काळ यांच्यानुरूप पालट होत सध्या वापरात असलेल्या मराठी, हिंदी, तमिळ, कन्नड, बांगला, उडिया, मल्ल्याळी, तेलुगु, गुजराती, पंजाबी, शारदा या लिपी विकसित झाल्या आहेत.

– सुमती पिंगळे, सातारा