अभिजात दर्जा मिळाल्यापासून सरकारकडून मराठी भाषेचा प्रचार-प्रसारास प्राधान्य ! – मराठी भाषामंत्री उदय सामंत

मंत्री उदय सामंत

मुंबई, ३ जुलै (वार्ता.) – ३ ऑक्टोबर २०२४ या दिवशी मराठी भाषेला ‘अभिजात (समृद्ध) भाषे’चा दर्जा मिळाला. तेव्हापासून सरकार मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यास प्राधान्य देत आहे. केंद्र सरकारकडे अनेक प्रस्ताव पाठवले आहेत. मराठी भाषा विभागाकडून अनेक योजना आणि निर्णय राबवण्यात येत आहेत, अशी माहिती उद्योग आणि मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.

भाजपच्या सदस्या उमा खापरे यांनी ‘राज्यात मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यस्तरीय संस्था उभारून धोरण निश्चिती करण्याविषयी’चा प्रश्न ‘अर्धा घंटा’ चर्चेमध्ये मांडला होता.

उद्योग आणि मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी मांडलेली सूत्रे

१. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी साहित्य संमेलन, वारकरी साहित्य संमेलन, बाल साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन, युवा साहित्य संमेलन आणि कामगार साहित्य संमेलन यांसाठी सरकार निधी देत आहे.

२. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ‘आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी भाषा केंद्र’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून ते २ महिन्यांमध्ये चालू होईल.

३. लंडनमधील लिलावात निघालेली एक इमारत सरकारने खरेदी केली. त्या ठिकाणी आता महाराष्ट्र मंडळ आणि मराठी भाषा अशी कार्यालये चालू असून मराठी भाषेचे जागतिक केंद्र हे लंडनला करण्याचा निर्णय घेतला आहे.

४. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांच्या नावाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या ठिकाणी ‘मराठी भाषा विकास केंद्रे’ सिद्ध केली जातील.

५. देशातील सर्वांत मोठे ‘मराठी भाषा भवना’चे काम अतिशय वेगाने चालू आहे. ते डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे.

६. बंद पडलेला ‘अनुवाद विभाग’ हा ‘स्व. यशवंतराव चव्हाण अनुवाद समिती’ म्हणून जाहीर केला आहे. त्या माध्यमांतून इतर भाषेतील चांगले साहित्य मराठीमध्ये अनुवादित करून ते प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत.

७. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची ‘ज्ञानेश्वरी’ आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची ‘तुकाराम गाथा’ सर्वांसमोर जावी म्हणून शासनाने दोन्ही ग्रंथ छपाई करण्यास प्रत्येकी १ कोटी रुपये दिले आहेत.

८. देहलीतील ‘जवाहरलाल नेहरू विद्यापिठा’मध्ये ‘कुसुमाग्रज’ यांच्या नावाने मराठी भाषा केंद्र चालू केले असून आता तिथे ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा गनिमी कावा’ हा अभ्यासक्रम (एम्.ए. साठी) चालू करण्याचा निर्णय घेतला आहे.