भारत आत्मनिर्भरतेच्या मार्गावर पुढे जाणार असल्याचेही मत

छत्रपती संभाजीनगर – भारत कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करणार नाही. कोणताही देश कितीही शुल्क लावो, भारत आत्मनिर्भरतेच्या मार्गावरच पुढे जाणार आहे, असे ठाम वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले. यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे अमेरिकेला सुनावले आहे. जिल्ह्यातील गंगापूर येथे १६ जानेवारी या दिवशी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित हिंदु संमेलनात ते बोलत होते. या वेळी सहस्रो हिंदु बंधू, भगिनी आणि महंत उपस्थित होते. या वेळी त्यांनी नागरिकांना स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन करत सांगितले की, जिथे शक्य आहे, तेथे भारतात बनवलेलेच खरेदी करा.
प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, हिंदूंना समाज परिवर्तन करायचे आहे. त्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी लागेल. समानता आपल्याला केवळ ओठात नको, तर कृतीत हवी आहे. त्यासाठी सर्व जातींमध्ये मित्र केले पाहिजेत. काही देश जागतिकीकरणाकडे केवळ बाजारपेठेच्या दृष्टीने पहातात; मात्र भारत संपूर्ण जगाला एक कुटुंब मानतो. आपल्याला इतर देशांमध्ये रोजगार निर्माण करण्याची, तसेच चिंता करण्याची आवश्यकता नाही. ते त्यांचे दायित्व आहे. भारत हा केवळ एक भौगोलिक प्रदेश नाही, तर तो एक विचार, संस्कृती आणि चारित्र्य आहे. भारताविषयी जे काही चांगले-वाईट घडते, त्याचे प्रश्न हिंदु समाजालाच विचारले जातील.
शतकानुशतके झालेली आक्रमणे, संकटे आणि विनाश असूनही भारताच्या परंपरा आणि मूल्ये जिवंत राहिली, असे सांगून प.पू. सरसंघचालक डॉ. भागवत म्हणाले की, ज्यांनी धर्म, संस्कार आणि मूल्ये जपली, तेच हिंदु म्हणून ओळखले गेले आणि अशा लोकांची भूमी म्हणजे भारत. भारताचे नागरिक जर प्रामाणिक, सदाचारयुक्त आणि उत्तम चारित्र्याचे बनले, तर तेच गुण जगासमोर देशाची ओळख ठरतील. आज संपूर्ण जग भारताकडून अपेक्षा ठेवून आहे. शक्ती म्हणजे केवळ शस्त्रसज्जता नाही, तर समज, नैतिकता, ज्ञान आणि योग्य विचारसरणीही शक्तीच आहे. हिंदु समाज खंबीर झाला, तर देशही खंबीर होईल आणि जगाची सेवा करू शकेल.
पू. डॉ. मोहनजी भागवत यांच्या भाषणातील ठळक सूत्रे अशी…
१. हिंदु समाजातील एकता हे केवळ संघाचे ध्येय नाही, तर संपूर्ण समाजाचे दायित्व आहे. संघ केवळ पुढाकार घेतो; पण खरे काम समाजाने एकत्र येऊन करावे लागेल.
२. हिंदूंनी अन्यायाविरुद्ध शांततेने; पण ठामपणे लढा देण्याची आवश्यकता आहे.
३. आध्यात्मिकता आणि सनातन धर्म ही भारताची सर्वांत मोठी शक्ती आहे. याच कारणामुळे भारताची संस्कृती आजपर्यंत टिकून आहे, तर जगातील अनेक जुन्या संस्कृती नष्ट झाल्या आहेत.
४. कुटुंबातील सदस्यांनी आठवड्यातून किमान एकदा एकत्र वेळ घालवावा. या वेळी आपल्या पूर्वजांच्या उपलब्धी, परंपरा आणि जीवन मूल्यांवर चर्चा करू शकते.
५. लोकांना अन्यायाविरुद्ध शांततेने आणि टप्प्याटप्प्याने लढण्याची आवश्यकता आहे. भगवान श्रीरामाने आधी संवादाने समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला; पण जेव्हा आवश्यकता पडली तेव्हा युद्धही केले.
६. लोकांनी जग पहाण्यासाठी परदेशात नक्कीच जावे; पण त्याचसमवेत भारताच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशांना जसे की, महाराणा प्रताप यांच्या गडांनाही भेट द्यावी.
उपस्थित संत, महंत…
संमेलनास श्री भास्करगिरिजी महाराज (श्री क्षेत्र देवगड संस्थान), महंत रामगिरिजी महाराज (मठाधिपती, श्री क्षेत्र सरलाबेट), श्री श्री १००८ स्वामी शांतिगिरिजी महाराज (जगद्गुरु श्री जनार्दन स्वामी आश्रम, श्री क्षेत्र वेरूळ) यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !