अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या फलिताचा विचार कधी करणार ?

‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ हे केवळ साहित्यिकांचे मेळावे नसून ते शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक आयुष्यावर परिणाम करणारे मोठे आयोजन ठरते. ‘साहित्याच्या नावाखाली उभा रहाणारा हा झगमगाट मराठी भाषेच्या खर्‍या प्रश्नांवर प्रकाश टाकतो कि त्यावर पडदा टाकतो ?’, 

हा प्रश्न आता टाळता येणार नाही. हे संमेलन मराठी भाषेच्या अभिमानाचे, साहित्यिक संवादाचे आणि वैचारिक मंथनाचे सर्वोच्च व्यासपीठ मानले जाते; मात्र काळानुसार या संमेलनांचे स्वरूप पालटत गेले आहे. १६ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘शिक्षणाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्याचे साहित्यिकांचे आवाहन, कोट्यवधींचा व्यय : आर्थिक उधळपट्टी कि सांस्कृतिक विसंगती ? आणि वैचारिक एकांगीपणा : साम्यवादीच का, हिंदुत्वनिष्ठ का नाहीत ?’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत. 

(उत्तरार्ध)

श्री. सचिन कौलकर, विशेष प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’, मिरज.

पूर्वार्ध वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/998271.html

१३. अतीमहनीयांची संस्कृती आणि भोजन व्यवस्थेतील गदारोळ !

सातारा येथील मराठी संमेलनात अतीमहनीय कक्षातील (व्हीआयपी) पाहुण्यांच्या भोजन व्यवस्थेविषयी अप्रसन्नता व्यक्त झाली. जेवणातील काही पदार्थांचा दर्जा योग्य नव्हता, तसेच संमेलनातील भोजनगृहाच्या ठिकाणी चक्क मराठी भाषा विभागातील उपसंचालकांना भोजनाची चिठ्ठी (पास) नसल्याच्या कारणावरून भोजनगृह स्थळावरून परत पाठवण्यात आले. भोजन व्यवस्थेतील गदारोळ केवळ नियोजनातील अपयश नसून तो व्यवस्थेतील असमानतेचेही प्रतीक ठरतो.

१४. सातारा शहराला काय मिळाले ?  प्रसिद्धी कि कायमस्वरूपी लाभ ?

साहित्य संमेलनामुळे सातार्‍याला काही दिवस प्रसिद्धी मिळाली, उपाहारगृहे भरली, दुकाने चालली; पण या प्रसिद्धीमधून शहराच्या दीर्घकालीन सांस्कृतिक किंवा शैक्षणिक विकासाला काय मिळाले ? एखादे कायमस्वरूपी साहित्य केंद्र, ग्रंथालय, लेखकांसाठी सुविधा यांपैकी काय उभे राहिले ?, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.

साहित्यिक विनोद कुलकर्णी यांना काळे फासणे, म्हणजे असहिष्णुतेचे लक्षण !

मराठी साहित्य संमेलनातील विचार मंचाजवळ साहित्यिक विनोद कुलकर्णी यांना काळे फासण्याचा प्रकार झाला की, जो निषेधार्ह आहे. साहित्य हे मतभिन्नता, विचारांची देवाणघेवाण आणि संवाद यांचे व्यासपीठ आहे. व्यक्तीवर प्रतिकात्मक किंवा प्रत्यक्ष हिंसा करणे, हे संमेलनाच्या उद्देशाला विरोधाभासी आहे. मतभिन्नता असू शकते, टीका करावी; मात्र संमेलनाच्या ठिकाणी त्यांना काळे फासणे, हे निंदनीय आहे. ही कोणत्याही सुसंस्कृत समाजात स्वीकारार्ह नाही. साहित्यिक विचारांशी असहमती व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत. हा प्रकार संपूर्णपणे असहिष्णु आणि अनुचित आहे. ‘विचारांना विचारांनी उत्तर देणे’, हीच साहित्याची खरी परंपरा आहे; व्यक्तीला लक्ष्य करणे नव्हे !

– श्री. सचिन कौलकर

१५. प्रश्न विचारले नाहीत, तर सोहळे वाढत जातील !

श्री. सचिन कौलकर

मराठी साहित्य संमेलन ही संकल्पना चुकीची नाही; पण तिची कार्यवाही चुकीच्या दिशेने होत आहे. जोपर्यंत साधेपणा, आशयप्रधानता, पारदर्शक व्यय आणि सर्वसमावेशकता येत नाही, तोपर्यंत अशी संमेलने साहित्याला नव्हे, तर व्यवस्थेच्या आत्मसंतुष्टीला पोषक ठरत रहातील. साहित्याच्या नावाखाली होणार्‍या या सोहळ्यांवर कठोर प्रश्न विचारणे, हीच आजची खरी साहित्यसेवा आहे.

१६. विचार मंचावर राजकीय कार्यकर्ते कशाला ?  

शतक पूर्व साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळाल्यापासून हे संमेलन विनाविघ्न पार पडावे, यासाठी अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीने सुयोग्य नियोजन केले. संमेलनाच्या शिष्टाचाराचा विचार करून अनेक छोट्या गोष्टींना मंडळाने अभ्यासपूर्वक विचार करून यथायोग्य मांडणी केली होती; मात्र विचार मंचावर अनाहूतपणे आलेले राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते सारस्वतांच्या डोळ्यात खुपले. उद्घाटक, स्वागताध्यक्ष, कार्याध्यक्ष यांच्यासह ‘मावळा प्रतिष्ठान’च्या पदाधिकार्‍यांचे विचार मंचावरील असणे, हा शिष्टाचाराचा भाग होता; मात्र नेत्यांच्या मागे आलेल्या कार्यकर्त्यांनी या विचार मंचावर उपस्थिती का लावली ? असा प्रश्न सारस्वतांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे या किरकोळ कार्यकर्त्यांमुळे प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अक्षरशः कोपर्‍यात बसावे लागले. ‘वाङ्मय म्हणजे काय ? याची जाण नसलेल्यांना विचार मंचावर येण्यास बंदी घालावी’, असा सूरही सातारकरांनी व्यक्त केला.

१७. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे आयोजन कशासाठी ?

‘संमेलनात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’सारखा हास्यविनोदाचा कार्यक्रम घेण्याची आवश्यकता होती का ?’, हा प्रश्न उपस्थित होतो. असे कार्यक्रम लोकांची गर्दी खेचण्यासाठी घेतले जातात का ? हे कार्यक्रम संमेलनाचे गांभीर्य अल्प करतात का ? कि साहित्याला सामान्य माणसांपर्यंत नेण्याचे साधन ठरतात ? अशा कार्यक्रमांचे फलित, म्हणजे केवळ करमणूकच आहे. यातून संमेलनाचे गांभीर्य अल्प पडू शकते. त्यामुळे असे कार्यक्रम घेण्याऐवजी पौराणिक कथा, देशासाठी प्राणपणाने कसे लढावे, यांवर समाजाला दिशा देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक वगैरे यांया आयुष्यावरील नाटक वा कार्यक्रम घ्यायला काहीच हरकत नाही. केवळ ‘टी.आर्.पी.’साठी (टेलीव्हिजन रेटिंग पॉईंट – दूरचित्रवाहिन्यांवरील एखाद्या कार्यक्रमाची लोकप्रियता मोजण्याचे परिमाण) अशा कार्यक्रमांचे आयोजन कशाला करायचे ?

१८. फलिताचा विचार व्हावा !

‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रहित करावे’, असे सूत्र येथे मांडले जात नाही; मात्र त्याची रचना, उद्दिष्टे आणि व्यय यांच्या फलिताविषयी कठोरपणे पुनर्विचार होणे अत्यावश्यक आहे. प्रश्न विचारणे, टीका करणे आणि आत्मपरीक्षण करणे, हेही साहित्याचेच अंग आहे. अन्यथा मराठी साहित्याच्या नावाखाली होणारे हे संमेलन भाषेच्या संवर्धनाऐवजी केवळ खर्चिक आणि आत्मसंतुष्ट सोहळे ठरत रहातील.

१९. संमेलनाचे फलित काय ?

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सर्वांत मोठे ‘फलित’, म्हणजे मराठी भाषा, शिक्षण आणि साहित्य यांना राज्यस्तरीय अन् राजकीय प्रतिष्ठा मिळवून देणे, तसेच मराठी भाषिक समाजाच्या गरजा अन् हक्क यांना दत्तक देणारे ठराव पार पाडणे होय. हे संमेलन कोणत्याही एका व्यक्तीपेक्षाही मराठी समाज आणि भाषिक समुदाय यांच्यासाठी एक मोठा लाभ मानले जाऊ शकते. स्थानिक साहित्यिक, वाचक आणि मराठी भाषा समर्थक वर्गांना एक व्यासपीठ मिळाले ज्यातून त्यांच्या आवाजाला राज्यस्तरीय मान्यता मिळू शकते. त्यामुळे तितक्या विशिष्ट व्यक्तीगत लाभापेक्षा मराठी भाषिक समुदायास, साहित्य विश्वाला आणि सामाजिक / सांस्कृतिक स्तरावर मोठा लाभ झाला आहे. काही ठिकाणी सीमावासीय आणि भाषिक अधिकार यांच्याखेरीज इतर सामाजिक मागण्यांवरही आवाज उठला, ज्यामुळे संमेलनातील वातावरण थोडे तापलेही. मराठी भाषा आणि साहित्य यांना एक सामूहिक, सार्वजनिक अन् राजकीय पाठबळ मिळाले. मराठी शिक्षणाविषयीचा ठराव या निर्णयांमुळे भाषिक समुदाय आणि लेखक-साहित्यिक यांना मोठा लाभ झाला आहे.

(समाप्त)

– श्री. सचिन कौलकर, विशेष प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’, मिरज. (१३.१.२०२६)