ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना पुणे येथे ‘ऋग्वेद भूषण पुरस्कार’ प्रदान !

भाऊ तोरसेकर

पुणे, १३ जानेवारी (वार्ता.) – ‘देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थे’च्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘ऋग्वेद भूषण पुरस्कार-२०२६’ ज्येष्ठ पत्रकार श्री. गणेश वसंत उपाख्य भाऊ तोरसेकर यांना नुकताच प्रदान करण्यात आला. येथील केसरी वाडा परिसरातील लोकमान्य सभागृहात झालेल्या एका सोहळ्यात भाजपच्या राज्यसभा खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांच्या शुभहस्ते त्यांना शाल आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र कुलकर्णी, विश्वस्त श्री. प्रशांत सुरू, कार्याध्यक्ष श्री. जयंत देशपांडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. सामाजिक, कला आणि धािर्मक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या अन्य व्यक्तींचाही या वेळी गौरव करण्यात आला. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने कार्यक्रमस्थळी उत्पादन कक्ष लावण्यात आला होता. त्याला प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी भेट दिली.

मतदार प्रगल्भ झाले, तरच देशाचे राजकारण प्रगल्भ होईल ! – भाऊ तोरसेकर

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘ॲनालायझर’ वाहिनीचे संपादक श्री. सुशील कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीत श्री. भाऊ तोरसेकर यांनी विविध विषयांवर परखड मते मांडली. ते म्हणाले की, ज्याप्रमाणे औषधाची मुदत संपल्यावर त्याचे विष होते, तशीच अवस्था सध्या साम्यवाद आणि मार्क्सवाद यांची झाली असून ही विचारसरणी आता पूर्णपणे कालबाह्य झाली आहे. राजकारणाविषयी बोलतांना त्यांनी स्पष्ट केले की, जेवढे मतदार प्रगल्भ होतील, तेवढेच देशाचे राजकारण प्रगल्भ होईल; तसेच वाचकांची आवड-निवड अचूक ओळखणारा तोच खरा ‘संपादक’ असतो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर टीकास्त्र सोडतांना त्यांनी ‘अंनिस’इतके अंधश्रद्ध दुसरे कुणीही नसल्याचे सांगितले. आगामी निवडणुकीचा राजकीय अंदाज वर्तवतांना त्यांनी मुंबई महानगरपालिकेत शिंदे-फडणवीस यांचे १५० हून अधिक उमेदवार विजयी होतील आणि राज्यातील २२ महानगरपालिकांत त्यांचीच सत्ता येईल, असा विश्वासही या वेळी व्यक्त केला.

प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी, खासदार, भाजप

हिंदु म्हणून संघटित होऊन कृतीच्या स्तरावर कार्य करण्याची आवश्यकता ! – प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी, खासदार, भाजप

पुरस्कार प्रदान केल्यानंतर मनोगत व्यक्त करतांना प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, भाऊ तोरसेकर यांच्याकडून आम्ही निर्भीडपणाची प्रेरणा घेतली असून त्यांच्या ‘पॉडकास्ट’च्या माध्यमातून विषयाचा सखोल अभ्यास कसा करावा ? बातम्यांचा तर्क कसा लावावा ? हे आम्हाला शिकायला मिळाले. सध्या इतिहासाचे विद्रूपीकरण करून ते समाजासमोर मांडले जात आहे; कोरेगाव भीमा संदर्भात सामाजिक माध्यमांवर फिरणारे अर्वाच्य ‘रील’ (काही सेकंदांचे व्हिडिओ) हे त्याचेच उदाहरण असून केवळ घरात बसून हे थांबणार नाही, तर त्यासाठी हिंदु म्हणून एकत्र येऊन कृतीच्या स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणेच बाजीराव पेशवे, वीर सावरकर, लोकमान्य टिळक हेसुद्धा आमचे दैवत आहेत. त्यामुळे ‘द केरल स्टोरी’सारख्या चित्रपटातून बोध घेऊन पालकांनी स्वत:च्या मुलांना सण-उत्सवांचे आणि धर्माचे महत्त्व शिकवून आपली संस्कृती पुनर्जीवित केली पाहिजे.