तुळसुली (तालुका कुडाळ) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदूंवर होणारी आक्रमणे थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक ! – अधिवक्त्या (सौ.) कावेरी राणे  

हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

बोलतांना अधिवक्त्या (सौ.) कावेरी राणे

कुडाळ (सिंधुदुर्ग) : हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य हे सत् आणि असत्, तसेच धर्म आणि अधर्म यांच्यातील दैवी लढा आहे. यात जो सैनिक म्हणून सहभागी होईल, त्याचे कल्याणच होणार आहे. या विचाराने प्रेरित होऊन हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी १ घंटा वेळ देण्याचा निर्धार करूया. हिंदु धर्म हा प्रत्येक जिवाच्या संरक्षणाची खात्री देतो. बांगलादेशासह अनेक ठिकाणी हिंदूंवर आक्रमणे होत आहेत. हिंदूंवर होणार्‍या आक्रमणाचे एकमेव कारण हिंदू धर्माचरणापासून दूर गेले आहेत अन् त्यांच्या धर्मभावना बोथट होत चालल्या आहेत. जोपर्यंत या देशात हिंदु राष्ट्र स्थापन होणार नाही, तोपर्यंत ही दयनीय स्थिती पालटणार नाही, असे उद्गार अधिवक्त्या (सौ.) कावेरी राणे यांनी तालुक्यातील तुळसुली येथील लिंगेश्वर विद्यालयाच्या सभागृहात ११ जानेवारी या दिवशी आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलतांना केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचा प्रारंभ सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. या वेळी अधिवक्त्या (सौ.) राणे पुढे म्हणाल्या, ‘‘हिंदु धर्माची शिकवण उदात्त आहे. ज्या धर्माची शिकवण इतरांचा विचार करणे अशी आहे, तो इतरांवर अत्याचार करील का ? राष्ट्राचा आत्मा हा धर्म असतो. ज्या राष्ट्रात धर्म नाही, ते राष्ट्र अधोगतीला जाते, म्हणजेच त्याची दुर्दशा व्हायला वेळ लागत  नाही. आज हिंदु धर्मासमोर लव्ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर, सांस्कृतिक जिहाद यांसारखी आक्रमणे उभी आहेत. हिंदूंना याविरुद्ध लढण्यासाठी बळ देण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. दुर्दैवाने धर्मशिक्षणाची केंद्र असलेली मंदिरेच शासनाच्या कह्यात जात आहेत आणि अनेक मंदिरे मानापमानावरून बंद आहेत. असे होऊ देऊया नको. हिंदु धर्म शिकण्यासाठी परदेशी लोक भारतात येतात आणि भारतीय मात्र पाश्चिमात्यांनी त्याग केलेल्या गोष्टी शिकत आहेत; कारण आपण आपल्या संस्कृतीचे महत्त्व समजून घेण्यात न्यून पडलो.’’

१. सभेनंतर सद्गुरु सत्यवान कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतलेल्या गटचर्चेमध्ये स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यामध्ये अनेक विषयांवर चर्चा करून ‘गावातील लोकांना याविषयी माहिती देण्यासाठी वर्ग घेण्यात यावा, गावातील मुला-मुलींसाठी प्रशिक्षणवर्ग चालू करावा, भावी पिढीला हे समजण्यासाठी शाळाशाळांमधून शिक्षण देण्यात यावे’, अशा मागण्या करण्यात आल्या. या कार्यासाठी लागणारे सर्व सहकार्य करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. १५ दिवसांनी किंवा महिन्यातून एकवेळ एकत्र येण्यासाठी उपस्थितांनी सिद्धता दर्शवली.

सभेला उपस्थित सद्गुरु सत्यवान कदम, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्माभिमानी

२. या कार्यक्रमाला लिंगेश्वर देवस्थानचे मानकरी, सेवेकरी, लिंगेश्वर हायस्कूलचे संचालक मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

३. सभेसाठी ध्वनीवर्धक यंत्रणा आणि अल्पोपहार श्री. बंड्या वारंग यांनी विनामूल्य दिले.

४. या सभेला सुमारे १२५ हून अधिक हिंदु धर्म बांधवांची उपस्थिती लाभली होती.