‘आय.एन्.एस्.व्ही. कौंडिण्य’ : भारताच्या प्राचीन सागरी प्रवासाचे पुनरुज्जीवन !

‘आय.एन्.एस्.व्ही. कौंडिण्य’ हा केवळ भारतीय नौदलात भरती झालेला एक नवीन नौकाप्रकल्प नाही, तर भारताच्या प्राचीन सागरी परंपरेचा जिवंत आणि चालती-बोलती धारिका आहे. सहस्रो वर्षांपूर्वी भारतीय उपखंडातील लोकांनी समुद्राला केवळ अडथळा न मानता संधी म्हणून पाहिले होते, याचा हा ठोस पुरावा आहे. या नौकेविषयीचे विशेष उल्लेखनीय असे की, अजंठा लेण्यांमधील ५ व्या शतकातील भित्तीचित्रांमध्ये दिसणार्‍या नौकांच्या रचनांचा तपशीलवार अभ्यास करून ही नौका बांधण्यात आली आहे. त्या काळात भारताचा आग्नेय आशिया, अरबी द्वीपकल्प आणि आफ्रिका यांच्याशी सागरी व्यापार होता, हे अनेक ऐतिहासिक संदर्भांतून स्पष्ट होते. ‘कौंडिण्य’ या प्राचीन भारतीय नौकेवर आधारित ‘आय.एन्.एस्.व्ही. कौंडिण्य’ ही नौका भारतातून समुद्रमार्गे बाहेर पडलेल्या सांस्कृतिक, धार्मिक आणि व्यापारी संपर्क यांची आठवण करून देते. त्यामुळे ही नौका केवळ भूतकाळाचे स्मारक नसून भारताच्या सागरी आत्मविश्वासाचे प्रतीक ठरते.

आय.एन्.एस्.व्ही. कौंडिण्य

१. ‘आय.एन्.एस्.व्ही. कौंडिण्य’चे वैशिष्ट्य

कु. शांभवी थिटे

‘आय.एन्.एस्.व्ही. कौंडिण्य’चे खरे वैशिष्ट्य त्याच्या बांधणीच्या पद्धतीत आहे. आधुनिक लोखंडी किंवा स्टीलच्या नौकांप्रमाणे खिळे किंवा वेल्डिंग न करता ही नौका पूर्णपणे पारंपरिक ‘स्टिच्ड शिप’, म्हणजेच शिवण पद्धतीने बांधलेली आहे. लाकडी फळ्या या नारळाच्या दोर्‍यांनी आणि नैसर्गिक तंतू राळेच्या साहाय्याने एकमेकांना जोडण्यात आल्या आहेत. या पद्धतीमुळे नौका लवचिक रहाते आणि समुद्रातील लाटांचा ताण सहजपणे सहन करू शकते. प्राचीन काळातील दीर्घ समुद्रप्रवासांसाठी ही लवचिकता अत्यंत उपयुक्त होती. या तंत्रामुळे दुरुस्तीही तुलनेने सोपी होती; कारण संपूर्ण रचना मोडण्याची आवश्यकता पडत नसे. आजच्या काळात ही पद्धत पुन्हा वापरात आणल्यामुळे केरळसह भारताच्या किनारी भागांतील पारंपरिक सुतार आणि कारागिर यांच्या पिढ्यान्‌पिढ्यांच्या ज्ञानाला नव्याने प्रतिष्ठा मिळाली आहे.

२. ‘आय.एन्.एस्.व्ही. कौंडिण्य’ भविष्यासाठी आत्मविश्वास देणारे एक महत्त्वपूर्ण पाऊल !

‘आय.एन्.एस्.व्ही. कौंडिण्य’ची निर्मिती ही प्राचीन परंपरा आणि आधुनिक विज्ञान यांचा सुंदर संगम म्हणता येईल. भारतीय नौदल, संस्कृती मंत्रालय, इतिहासतज्ञ, अभियंते आणि पारंपरिक नौकानिर्माते यांनी एकत्र येऊन हा प्रकल्प साकार केला आहे. अजंठामधील २ आयामी चित्रांवरून नौकेचा त्रिमितीय आकार ठरवणे, हे मोठे आव्हान होते. त्यासाठी आधुनिक जलगतिक चाचण्या, संरचनात्मक विश्लेषण आणि सुरक्षिततेचे आधुनिक मापदंड वापरण्यात आले अन् त्यातही ऐतिहासिक प्रामाणिकपणा जपण्यात आला. ही नौका प्राचीन गुजरात-अरब व्यापारमार्ग पुन्हा समुद्रातून पार करत आहे, ही मोहीम अत्यंत प्रेरणादायी आहे. अशा उपक्रमांमुळे भारताची प्राचीन नौकानिर्मिती परंपरा केवळ अभ्यासापुरती मर्यादित न रहाता प्रत्यक्ष अनुभवाच्या पातळीवर समजून घेता येईल. म्हणूनच ‘आय.एन्.एस्.व्ही. कौंडिण्य’ ही नौका भूतकाळाचा गौरव करतांना भविष्यासाठी आत्मविश्वास देणारे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरते.

– कु. शांभवी थिटे, परराष्ट्र धोरणांच्या अभ्यासिका, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, देहली. (५.१.२०२६)