मतदानाच्या वेळी स्वच्छ राजकारणाची चाड असलेल्या मतदारांनी करायची कृती !

महाराष्ट्रातील येत्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये माझ्या (आणि आपल्यापैकी अनेक लोकांच्या) आवडत्या पक्षाने निष्ठावंतांना डावलून बाहेरून आयात केलेल्या नेत्यांना उमेदवारी दिली. त्याचा समर्थक आणि मतदार यांना आलेला सात्त्विक संताप सामाजिक माध्यमांवर सर्वत्र दिसत आहे; पण नुसता त्यावर जळफळाट करून काहीही होत नाही. याला उपाय एकच आहे, ‘स्वच्छ राजकारणाची चाड असलेल्या मतदारांनी अशा संधीसाधू, तोंडाळ, जातीयवादी उमेदवारांना नाकारणे’, मग तो त्यांच्या आवडत्या पक्षाचा का असेना ! त्यासाठी अपराधी वाटण्याचे काहीही कारण नाही. 

 

१. दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणार्‍या सूत्रांशी निगडित निवडणूक

ही लोकसभा निवडणूक नाही. महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या निकालावर देशाची सुरक्षा, भवितव्य आणि देशाच्या अर्थकारणाची दिशा यांपैकी काहीही अवलंबून नाही. वरीलपैकी कुठल्याही निकषावर पडताळले, तरी निदान माझे मत लोकसभा निवडणुकीत सदैव मोदींनाच असेल. ही विधानसभा निवडणूकही नाही, जिथे संपूर्ण महाराष्ट्राचे धोरण आणि भवितव्य ठरते.

लेखिका सौ. शेफाली वैद्य

ही आहे महानगरपालिका निवडणूक. शहरी नागरिकांच्या प्रतिदिनच्या जगण्याशी निगडित सूत्रे इथे महत्त्वाचे आहेत. आपल्या शहरातील रस्ते कसे आहेत, वाहतुकीचे नीट नियंत्रण होते कि नाही ?, आपला परिसर स्वच्छ आहे कि नाही ?, आपल्या प्रभागातील कचरा वेळेवर उचलला जातो कि नाही ?; पाणी, वीज, शहराची सुरक्षा, हिरवाईचे रक्षण, सार्वजनिक बागा, उद्याने यांची देखभाल दुरुस्ती, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी आहे ?, हवा चांगली आहे कि प्रदूषित ?, शहरातून वहाणारी नदी ही नदी उरली आहे कि तिचे पार गटार झाले आहे ? आदी दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारी सूत्रे या निवडणुकांशी निगडित आहेत.

२. प्रभागाच्या नागरी समस्यांवर काम करणार्‍या प्रामाणिक आणि चारित्र्यवान उमेदवाराला मत देणे महत्त्वाचे !

यामुळे या निवडणुकांमध्ये खरेतर पक्ष न बघता उमेदवार बघावा. त्यातल्या त्यात स्वच्छ चारित्र्याची, प्रामाणिक, तळमळीने काम करणारी; प्रभागात कधी समस्या आली, तर लगेच भ्रमणभाष उचलणारी, प्रभागातील समस्या सोडवणारी व्यक्ती पाहून लोकांनी मतदान केले आणि पक्षीय अभिनिवेष बाजूला ठेवून अशा व्यक्तीला निवडून दिले, तर सर्व राजकीय पक्षांनाही हे भान राहील की, उमेदवार चांगलाच दिला पाहिजे.

आपण तरी अशाच उमेदवाराला मत देऊया, जो प्रत्यक्ष कार्याच्या स्तरावर चांगला कार्यकर्ता आहे; मध्यरात्री भ्रमणभाष केला, तरी तो उचलेल, जो प्रभागाच्या नागरी समस्यांवर काम करील. जो राष्ट्रद्रोही नाही. एक मतदार म्हणून माझ्या हातात ती शक्ती नक्कीच आहे. उर्वरित सगळे नुसते शब्दांचे फेसाळ बुडबुडे !

– सौ. शेफाली वैद्य, हिंदुत्वनिष्ठ लेखिका, पुणे.