स्मशानभूमीत अभ्यासिका ?

पुणे जिल्ह्यातील आडाचीवाडी (तालुका पुरंदर) येथे स्मशानभूमीत अभ्यासिका चालवली जात असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित झाला आहे. यामागील प्रयोजन विचारले असता ग्रामस्थ म्हणतात, ‘‘बाहेरगावाहून येणारे लोक आम्हाला विचारतात की, गावाचा विकास झाला; मात्र शैक्षणिक विकासासाठी तुम्ही काय केले ? म्हणून आम्हाला ही नवीन संकल्पना सुचली. स्मशानभूमीतील वातावरण अतिशय प्रसन्न आहे. स्मशानभूमीत ‘केवळ मृत व्यक्तींना जाळले जाते’, ही संकल्पना मोडीत काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. घराघरांतील दूरचित्रवाणी संचाच्या आवाजाचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो.’’ धार्मिक संकल्पनांना छेद देण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न पाहिल्यास त्यांच्या अज्ञानीपणाची कीव येते. दूरचित्रवाणी संचाचा आवाज न्यून करणे किंवा तो प्रसंगी बंद ठेवणे, या उपाययोजना सहज करता आल्या असत्या; पण तसे न करता मुलांना स्मशानात अभ्यासाला पाठवणे, हे म्हणजे ‘जखम डोक्याला आणि मलम गुडघ्याला’ असे केल्यासारखे आहे. ‘स्मशानभूमीतील वातावरण अतिशय प्रसन्न जाणवते’, असे काही हिंदूंनाच वाटते, याहून दुर्दैव ते काय ?

प्रत्येक कर्म करण्याची जागा निश्चित असते. पूजेसाठी मंदिर, शिक्षणासाठी शाळा-महाविद्यालय, नाटक पहाण्यासाठी नाट्यमंदिरे, चित्रपट पहाण्यासाठी चित्रपटगृह, स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकगृह, शौचालयासाठी प्रसाधनगृह, शस्त्रकर्मासाठी शस्त्रकर्मगृह आदी. यांत जर पालट केला, म्हणजे प्रसाधनगृहात स्वयंपाक केला, नाट्यगृहात चित्रपट दाखवले, चित्रपटगृहात नाटक केले, तर चालेल का ? नाही ना ! मग अंत्यसंस्कार होत असलेल्या ठिकाणी अभ्यासिका कशी चालेल ? स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात असल्याने तेथील वातावरणातील स्पंदने कशी असतात ? याविषयी ग्रामस्थांना ठाऊक तरी आहे का ? तेथे मोठ्या प्रमाणात रज-तमात्मक स्पंदने असतात. अन्य ठिकाणी अनिष्ट शक्तींचा दाब जाणवत असतो. अशा स्थितीत विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा होणार ? त्यांच्या मनःस्थितीवर विपरीत परिणाम झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ? स्मशानभूमीतील एखाद्या अतृप्त लिंगदेह किंवा अनिष्ट शक्ती यांच्यामुळे विद्यार्थ्यांना काही झाले, तर काय होईल ? याचा विचार ग्रामस्थांनी का केला नाही ? एखादी संकल्पना मोडीत काढण्यासाठी असा अघोरी निर्णय घेणे, म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असेच आहे. यामागे धर्मशिक्षणाचा अभावच कारणीभूत आहे. ग्रामस्थांनी स्मशानभूमीत नव्हे, तर गावातीलच एखाद्या शांत ठिकाणी अभ्यासिका बांधून तेथे विद्यार्थ्यांची सोय करावी. हिंदूंनी धर्माने घालून दिलेल्या नियमांच्या विरुद्ध जाऊन कृती करून धर्महानी ओढावून घेऊ नये !

– श्री. नीलेश पाटील, जळगाव