सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या माध्यमातून भारतविरोधी शक्तींना आव्हान !

‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष आणि ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे सहआयोजक श्री. उदय माहूरकर यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीकडे व्यक्त केलेले हृद्य मनोगत !


‘सनातन राष्ट्र शंखनाद’ म्हणजे भारतविरोधी शक्तींविरुद्ध युद्धाचा उद्घोष !

या महोत्सवातून सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण झाला असून तो सतत वाढत जाणार आहे. त्याला रोखणे अशक्य आहे. जो समूह भारताला विभाजित ठेवू इच्छितो, अशा भारतविरोधी शक्तींविरुद्ध हे दोन दिवसांचे आयोजन म्हणजे युद्धाचा एक उद्घोषच होता. भारताची सुरक्षा आणि संस्कृती यांसाठी हा कार्यक्रम अतीमहत्त्वपूर्ण आहे.

१. हिंदुत्वाचे खरे स्वरूप प्रस्थापित करणारी ‘सनातन संस्था’ !

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ने संपूर्ण उत्तर भारतात हिंदुत्वाच्या ऊर्जेचा संचार केला आहे. सनातन संस्थेने छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार पुढे नेत हा महोत्सव एकप्रकारे भारतविरोधी किंवा हिंदुविरोधी शक्तींसाठी थेट आव्हान ठरला आहे.

श्री. उदय माहूरकर

२. हिंदी चित्रपटसृष्टीच्या प्रभावापासून दूर असणारी संस्था म्हणजे सात्त्विक संस्था !

हा महोत्सव म्हणजे एक अभूतपूर्व घटना आहे. सनातन संस्था ही भारतातील सर्वांत सात्त्विक संस्था आहे. जी हिंदुत्वनिष्ठ संस्था हिंदी चित्रपटसृष्टीच्या (बॉलीवूडच्या) प्रभावाखाली नाही, तीच सात्त्विक संस्था होय ! सनातन संस्था ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि दूरदृष्टी पुढे नेण्याचे महान कार्य करत आहे.

३. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी महाराष्ट्राबाहेर ७८ वर्षांनंतर भव्य आयोजन !

सनातन संस्थेचे काही शत्रू आहेत. या शत्रूंना वाटते, ‘अखंड भारत’ या स्वप्नाच्या मार्गात संस्था अडथळा ठरत आहे.’ अशा परिस्थितीमध्ये भारत मंडपम् येथे इतक्या मोठ्या प्रमाणावर महोत्सवाचे आयोजन केले जाणे, ही मोठी घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि योगदान यांवर आधारित असे भव्य आयोजन आजपर्यंत महाराष्ट्राबाहेर गेल्या ७८ वर्षांत प्रथमच होत आहे. त्यामुळे याला विशेष महत्त्व आहे. या महोत्सवातून जी ऊर्जा निर्माण होईल, ती निश्चितपणे उत्तर भारतात दूरवर पसरेल.

– श्री. उदय माहुरकर, ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’