Pawan Kalyan Bangladesh Lynching : भारताने स्वातंत्र्य मिळवून दिलेली भूमी आज अल्पसंख्यांकांच्या रक्ताने माखली !

बांगलादेशातील हिंदु युवकाच्या हत्येचा आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्याकडून तीव्र निषेध

हत्या झालेला बांगलादेशातील हिंदु युवक दीपू चंद्र दास आणि आंध्रप्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण (उजवीकडील)

अमरावती (आंध्रप्रदेश) – जनसेना पक्षाचे प्रमुख आणि आंध्रप्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी बांगलादेशातील हिंदु युवक दीपू चंद्र दास यांच्या अमानुष हत्येबद्दल तीव्र दुःख आणि संताप व्यक्त केला आहे.

सामाजिक माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना त्यांनी सांगितले की, ही घटना मानवतेच्या अधःपतनाचे प्रतीक आहे. वर्ष १९७१ मध्ये भारतीय सैनिकांनी त्यांच्या रक्ताने ज्या भूमीला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्याच भूमीवर आज निष्पाप अल्पसंख्यांकांची हत्या होत आहे.

पवन कल्याण यांनी आकडेवारीचा उल्लेख करत सांगितले की,

वर्ष १९५१ मध्ये बांगलादेशात हिंदूंची लोकसंख्या सुमारे २२ टक्के होती, ती आता ८ टक्क्यांपेक्षाही अल्प राहिली आहे. ही केवळ स्थलांतराची गोष्ट नसून अल्पसंख्यांकांना लक्ष्य करून पद्धतशीरपणे होणार्‍या छळाचेच द्योतक आहे. इस्कॉन मंदिरातील संत चिन्मय दास यांची अटक आणि त्यानंतर दीपू दास यांना झाडाला लटकवून जाळण्याची घटना, तेथे कायद्याचे राज्य संपुष्टात आल्याचे दर्शवते.


आंतरराष्ट्रीय समुदायाची शांतता हा मानवी हक्कांवरील विश्वासघात !

पवन कल्याण यांनी बांगलादेशातील नेतृत्व आणि संयुक्त राष्ट्रे यांना या अमानवी कृत्याचा केवळ निषेध न करता दोषींना कठोर शिक्षा देण्याचे आवाहन केले आहे. भारतीय हुतात्मांनी शांततेसाठी बलीदान दिले होते, अल्पसंख्यांकांवरील अशा अत्याचारांसाठी नव्हे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. आंतरराष्ट्रीय समुदायाची शांतता हा मानवी हक्कांवरील विश्वासघात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

संपादकीय भूमिका

भारतातील किती शासनकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे ! हिंदूंच्या रक्षणाविषयी हिंदूच निष्क्रीय असल्याने शासनकर्तेही तसेच झालेले आहेत !