Pakistani Beggars Deport : सौदी अरेबियाने केली २४ सहस्र पाकिस्तानी भिकार्‍यांची हकालपट्टी !

वर्षभरात विविध देशांनी भीक मागणार्‍या ५१ सहस्र पाकिस्तानी नागरिकांना हाकलले !

AI निर्मित चित्र

रियाध (सौदी अरेबिया) – या वर्षात विविध देशांनी सुमारे ५१ सहस्र पाकिस्तानी नागरिकांना भीक मागत असल्याने हाकलले आहे. एकट्या सौदी अरेबियाने २४ सहस्र पाकिस्तानी भिकार्‍यांची हकालपट्टी केली आहे. संयुक्त अरब अमिरातमधून ६ सहस्र, अझरबैजानमधून २ सहस्र ५००, तर इतर देशांतूनही सहस्रावधी पाकिस्तानी नागरिकांना भीक मागण्याच्या आरोपावरून हाकलण्यात आले. ही माहिती विदेशस्थित पाकिस्तानी आणि मानवी हक्क विषयक राष्ट्रीय सभेच्या स्थायी समितीच्या बैठकीत समोर आली आहे.

१. मे महिन्यात पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भीक मागण्याची समस्या अत्यंत गंभीर झाल्याचे सांगितले होते. या कारणामुळे पाकिस्तानी नागरिकांना इतर देशांचे व्हिसा मिळणे कठीण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

२. पाकिस्तानचे सुमारे २ कोटी २० लाख लोक भीक मागण्यात सहभागी असून त्यातून प्रतिवर्षी सुमारे ४२ अब्ज रुपयांची कमाई होते, असे त्यांनी सांगितले.

विदेशात पकडले जाणारे बहुसंख्य भिकारी पाकिस्तानी !

वर्ष २०२३ मध्ये पाकच्या संसद समितीसमोर तत्कालीन परराष्ट्र सचिव जुल्फिकार हैदर यांनी माहिती दिली होती की, विदेशात पकडल्या जाणार्‍या भिकार्‍यांपैकी सुमारे ९० टक्के भिकारी पाकिस्तानी नागरिक असतात. हे लोक सौदी अरेबियासह इराक, मलेशिया, ओमान, कतार आणि संयुक्त अरब अमिराती इत्यादी देशांत भीक मागतांना आढळून आले होते.

संपादकीय भूमिका

पाकिस्तान हा ‘आतंकवाद्यांच्या निर्मितीचा देश’ असण्यासह ‘भिकार्‍यांचा देश’ही आहे, हे यातून लक्षात येते !