Sydney Beach Shooting : सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे ज्यूंवर आक्रमण करणारे पाकिस्तानी वंशाचे मुसलमान पिता-पुत्र !

आक्रमण करणारे पाकिस्तानी वंशाचे मुसलमान पिता-पुत्र

सिडनी (ऑस्ट्रेलिया) – येथे १४ डिसेंबरला बॉन्डी समुद्रकिनार्‍यावर ज्यूंच्या हनुक्का सणाच्या वेळी झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणात ठार झालेल्यांची संख्या १६ झाली आहे. यात १० वर्षांची एक मुलगी आणि इस्रायलाचा एक नागरिक यांचाही समावेश आहे. तसेच ४५ जण घायाळही झाले आहेत. साजिद अक्रम (वय ५० वर्षे) आणि नावीद अक्रम (वय २४ वर्षे) या पिता-पुत्रांनी गोळीबार करत हे आक्रमण केले. पोलिसांच्या गोळीबारात साजिद ठार झाला, तर नावीद घायाळ झाला आहे. हे दोघेही पाकिस्तानी वंशाचे आहेत. या आक्रमणानंतर मेलबर्नमध्ये आयोजित होणारा हनुक्का उत्सव रहित करण्यात आला. ऑस्ट्रेलियामध्ये अनुमाने १ लाख २० सहस्र ज्यू लोक रहातात. त्यांपैकी अनुमाने ६० सहस्र ज्यू मेलबर्न शहरात रहातात.

साजिद २७ वर्षांपूर्वी पाकमधून ऑस्ट्रेलियात आला आणि येथे भाड्याच्या खोलीत राहू लागला. येथे त्याने विवाह केला आणि तो फळ विकण्याचा व्यवसाय करू लागला होता. त्याचा मुलगा नावीद याचा ऑस्ट्रेलियातच जन्म झाला. ‘साजिद याचे कोणत्या आतंकवादी संघटनांशी संबंध होते का ? यामागे आणखी कोण आहेत ?’ आदी गोष्टींचा शोध पोलीस घेत आहेत. वर्ष २०१९ मध्ये पोलिसांनी संशयावरून नावीद याची ६ महिने चौकशी केली होती; मात्र त्यात तो धोकादायक नसल्याचे पोलिसांना आढळले होते.

परवानाधारक बंदुकीद्वारे गोळीबार  

पोलिसांच्या माहितीनुसार साजिद अक्रमकडे परवानाधारक बंदूक होती, ज्याचा वापर तो शिकारीसाठी करत असे. तो एका गन क्लबचा सदस्य होता आणि राज्याच्या कायद्यानुसार त्याच्याकडे परवाना होता. त्याच्याकडे कायदेशीररित्या ६ बंदुका होत्या. गोळीबार करण्यासाठी निघण्यापूर्वी या दोघांनी कुटुंबाला सांगितले होते की, ते मासे पकडण्यासाठी जात आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या सरकारला आधीच सतर्क केले होते ! – इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू

नेतन्याहू यांनी सांगितले की, त्यांनी आधीच चेतावणी दिली होती; पण ऑस्ट्रेलिया सरकारने काहीच केले नाही, ज्याचा परिणाम हे भयानक आक्रमण झाले.

ऑस्ट्रेलियाने पॅलेस्टाईनला मान्यता दिल्यानंतर १७ ऑगस्ट या दिवशी पत्र लिहून पंतप्रधान अल्बानीज यांना याची माहिती दिली होती. यात म्हटले होते, ‘सरकारची धोरणे देशात ज्यूविरोधी भावनांना प्रोत्साहन देत आहेत. पॅलेस्टाईनला मान्यता देणे, हे पाऊल ज्यू-विरोधी आगीत तेल ओतण्यासारखे आहे. यामुळे आतंकवाद्यांना प्रोत्साहन मिळते आणि ऑस्ट्रेलियामध्ये ज्यूंविरुद्ध द्वेष पसरतो. गाझा युद्धानंतर (ऑक्टोबर २०२३ पासून) ऑस्ट्रेलियामध्ये ज्यूविरोधी आक्रमणांमध्ये वाढ झाली; परंतु सरकारने ते रोखण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत. ते याला सरकारची दुर्बलता मानतात.’

आतंकवाद्यांच्या वाहनात सापडला इस्लामिक स्टेटचा झेंडा  

पोलिसांच्या चौकशीत आतंकवादी अक्रम पिता-पुत्रांच्या वाहनातून आतंकवादी संघटना इस्लामिक स्टेटचा झेंडा सापडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार या आतंकवाद्यांनी इस्लामिक स्टेटशी निष्ठा राखण्याची शपथ घेतली होती. यामुळे या दोघांचे आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटनांशी संबंध होते, या दृष्टीने अन्वेषण केले जात आहे.

कब्रस्तानात फेकण्यात आली डुकराची डोकी !

आतंकवादी आक्रमणाच्या विरोधात प्रतिक्रिया म्हणून अज्ञातांकडून पश्चिम सिडनीच्या एका कब्रस्तानात डुकरांची डोकी कापून ती फेकण्यात आल्याचे आढळून आले. डुकर हे इस्लाममध्ये निषिद्ध असल्यामुळे हे कृत्य करण्यात आले. या कृतीमुळे  धार्मिक तणाव निर्माण होत असल्याचे म्हटले जात आहे.

दुसरीकडे सिडनीतील मुसलमान नेत्यांनी आक्रमणाचा निषेध केला आहे. तसेच त्यांनी ठार झालेल्या आतंकवाद्याचा मृतदेह स्वीकारण्यासही नकार दिला आहे.

संपादकीय भूमिका

  • ‘आतंकवादाला धर्म असतो आणि आतंकवादी अन्य धर्मियांना लक्ष्य करतात’, हे लक्षात घेऊन आतंकवाद्यांच्या मानसिकतेला नष्ट करण्यासाठी जगाने प्रयत्न केला पाहिजे !
  • पाकिस्तानला आतंकवादी देश घोषित करून त्याच्यावर बहिष्कार घाला !
  • ज्यूंवरील आक्रमणाचा सूड उगवण्यासाठी इस्रायलने पाकवर आक्रमण केल्यास आश्चर्य वाटणार नाही !