Shankhnad Mahotsav Delhi : शंखनाद महोत्सवानिमित्त मंगल पांडे यांची बंदूक, पानीपत युद्धातील तोफ प्रथमच देहलीत !

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव देहली २०२५

तोफेचे प्रात्यक्षिक पहायला मिळणार !

इंद्रप्रस्थ (नवी देहली), १२ डिसेंबर (वार्ता.) : भारताच्या इतिहासातील ‘भक्ती’ आणि ‘शक्ती’ यांचा संगम घडवणारा अद्वितीय सोहळा देशाच्या राजधानी देहली म्हणजेच इंद्रप्रस्थ येथे साकारत आहे.

मंगल पांडे यांचे एआय निर्मित चित्र

‘सेव्ह कल्चर, सेव्ह भारत फाउंडेशन’ प्रस्तुत आणि ‘सनातन संस्था’ आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त वर्ष १८५७ च्या पहिल्या बंडातील आद्यक्रांतीकारक मंगल पांडे यांनी वापरलेली बंदूक आणि मध्यप्रदेशाच्या राजघराण्यातील मल्हारराव होळकर, तसेच क्रांतीसिंह नाना पाटील यांनी वापरलेल्या बंदुका प्रथमच देहलीकरांसमोर येणार आहेत.


हे वाचा → संपादकीय : ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद कशासाठी ?


त्याचप्रमाणे पानीपतच्या युद्धातील तोफांसह १ सहस्र ५०० दुर्मिळ शस्त्रेही पहायला मिळणार आहेत. या महोत्सवात पराक्रमाचा तेजस्वी इतिहास आणि चैतन्यदायी अध्यात्म यांचा अद्भुत संयोग अनुभवयाला मिळणार आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी दिली.

प्रातिनिधीक बंदूक

या महोत्सवातील ‘स्वराज्याचा शौर्यनाद’ प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील १ सहस्र ५०० हून अधिक ऐतिहासिक शस्त्रांचा भव्य संग्रह प्रथमच देहलीकरांसमोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः स्पर्श केलेल्या शस्त्रांसह महाराणा प्रताप आणि विजयनगर साम्राज्यकालीन शस्त्रेही येथे पहाता येतील. हे केवळ शस्त्रांचे प्रदर्शन नसून लहान मुलांना यातून प्रेरणा मिळावी, यासाठी काही शस्त्रे हाताळण्यासाठी दिली जाणार आहेत, हे या प्रदर्शाचे वैशिष्ट्य आहे. तोफ कशी उडवली जाते ? याचे प्रात्यक्षिकही दाखवले जाणार आहे. हे शस्त्रप्रदर्शन भारत मंडपम्’्च्या सभागृह क्रमांक १२मध्ये सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले रहाणार आहे.

प्रातिनिधीक तोफ

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाविषयी देहली येथील भारत मंडपम्’च्या परिसरात नागरिकांनी व्यक्त केलेले अभिप्राय !

भारत सनातन राष्ट्र व्हायला हवे ! श्री. संजीवकुमार तिवारी, बिहार

भारत सनातन राष्ट्र व्हायला हवे. आम्हाला अन्य कुणाच्या नाही, तर सनातनच्या छत्रछायेखालीच रहायचे आहे. काही राजे आणि नागरिक यांच्या चुकांमुळे भारतामध्ये मुसलमानांचे राज्य आहे; परंतु भारतातील मुसलमान हे मूळचे हिंदूच आहेत. तलवारीच्या बळावर त्यांनी मुसलमान धर्म स्वीकारला. भारत सनातन राष्ट्र होण्यामध्ये जर कुणी अडथळा निर्माण केला, तर त्यासाठी हिंदू उभे रहातील. कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता सर्वांनी सनातन राष्ट्रासाठी योगदान द्यायला हवे.

सनातनचे अभिनंदनीय कार्य ! डॉ. अनिल वाघ, नागपूर, महाराष्ट्र

सनातन धर्म देवतांचा धर्म आहे. आपल्या संस्कृतीच्या सुरक्षेसाठी सनातन धर्माची पुनर्स्थापना आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांसह अनेक योद्ध्यांनी भारतासाठी हौतात्म्य पत्करले आहे. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवामध्ये प्राचीन शस्त्र प्रदर्शनाद्वारे महान योद्ध्यांचे स्मरण होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम आणि त्याद्वारे महाराष्ट्राचे नाव संपूर्ण देशात पोचवत आहात, हे कार्य अभिनंदनीय आहे.

राष्ट्रपुरुषांचा नव्हे, तर मोगलांचा इतिहास शिकवला जाणे दुर्दैवी ! – श्री. अभिषेक दुबे, गोरखपूर, उत्तरप्रदेश

‘भारत सनातन राष्ट्र व्हायला हवे’, असे मलाही वाटते. आतापर्यंत आमच्या पिढीला पाठ्यपुस्तकांमध्ये भारतावर आक्रमण करणाऱ्या मोगलांचाच इतिहास शिकवला गेला. महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई आदी राष्ट्रपुरुषांचा इतिहास शिकवला गेला नाही. त्यांनी वापरलेल्या शस्त्रास्त्रांविषयी माहिती देण्यात आली नाही. या प्रदर्शनाच्या माध्यमातून ही माहिती मिळेल. त्यामुळे सर्वांनी महोत्सवात सहभागी व्हावे.

हिंदूंच्या एकजुटीतून हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य ! – श्री. मुकेश कुमार साहू, मिलवाडा, राजस्थान

हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र व्हायला हवे. जातीयवाद हटवून ‘हिंदू’ म्हणून एकत्र यायला हवे. हिंदूंची एकजूट झाल्यावरच हिंदु राष्ट्राची स्थापना करता येईल. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या माध्यमातून सनातन राष्ट्राची संकल्पना सत्यात उतरेल.

मणिपूरमधील ‘थांग-ता’ या प्राचीन युद्धकलेची प्रात्यक्षिके !

महोत्सवामध्ये मणिपूर येथील ‘थांग-ता’ या प्राचीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. आक्रमणकर्त्यांपासून भूमी आणि संस्कृती यांचे रक्षण करण्यासाठी या युद्धकलेचा उपयोग करण्यात आल्याचा मणिपूरचा इतिहास आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या युद्धकलेला विशेष महत्त्व आहे.

दुर्मिळ सोमनाथ ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाची संधी !

सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे अंश

१ सहस्र वर्षांहून अधिक काळ जपलेल्या मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या अवशेषांचे दर्शन देहलीत प्रथमच सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. गझनीच्या महंमदाने उद्ध्वस्त केलेले हे पवित्र अवशेष पुजारी कुटुंबाने तमिळनाडूत सुरक्षित ठेवले असून कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य यांच्या मार्गदर्शनाने सनातन संस्थेद्वारे ते भाविकांना पहायला मिळणार आहे.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या माध्यमातून राष्ट्ररक्षण, संस्कृती, शौर्य आणि हिंदवी स्वराज्याचे तेज चेतवण्याचा प्रयत्न आहे.