नवी देहली येथे १३ आणि १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेला ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ येथील प्रतिष्ठित आणि आंतरराष्ट्रीय केंद्र ठरलेल्या ‘भारत मंडपम्’ येथे पार पडणार आहे. ‘भारत मंडपम्’चे नाव वर्ष २०२३ मध्ये पार पडलेल्या ‘जी २०’ संमेलनामुळे भारतवासियांना ज्ञात झाले. (जी २० म्हणजे १९ देश आणि युरोपियन युनियन (यात २७ देश आहेत) यांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँक गव्हर्नर यांची संघटना.) नवी देहलीमध्ये भारताच्या राजधानीच्या ठिकाणी एखाद्या मोठ्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे नाव अशा स्वरूपाचे भारतीय असणे, हे एक वैशिष्ट्यपूर्ण आहे.

१. ‘भारत मंडपम्’ची बांधणी

भारत मंडपम् हे नवी देहलीतील प्रगती मैदानात बांधलेले एक भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्र आहे. या प्रकल्पाचे बांधकाम वर्ष २०१७ मध्ये चालू झाले होते. २६ जुलै २०२३ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. अनुमाने १२३ एकर (प्रगती मैदान परिसर)मध्ये असलेला हा प्रकल्प ‘नॅशनल प्रोजेक्ट’ (राष्ट्रीय प्रकल्प)च्या अंतर्गत विकसित करण्यात आला आहे. देहलीतील संपूर्ण प्रगती मैदान पुनर्विकास प्रकल्पावर अनुमाने २ सहस्र ७०० कोटी रुपयांचा व्यय झाला, केवळ ‘भारत मंडपम्’वर (‘कन्व्हेन्शन सेंटर’वर) अनुमाने ७५० कोटी रुपयांचा व्यय झाला आहे. या इमारतीची रचना भारतीय परंपरा आणि आधुनिक सुविधा यांचे एकत्रिकरण करून केलेली रचना आहे. या इमारतीचा आकार हा शंखाच्या आकारासारखा आहे. या इमारतीची रचना आणि निर्मिती यांसाठी वापरलेले बरेचसे साहित्य पूर्णपणे स्वदेशी (आत्मनिर्भर) आहे.
२. भारतीय सांस्कृतिक मूल्यांची जपणूक आवश्यक !
सध्या केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर कमालीची अशांतता, अस्वस्थता, असुरक्षितता, युद्धमान आणि गृहयुद्ध यांची स्थिती आहे. आता काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे ‘जी २०’ शिखर परिषद पार पडली. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आतंकवाद, अमली पदार्थ यांविरुद्ध लढा देण्याच्या प्रस्तावासह विकासाच्या मापदंडांचा पुनर्विचार करून भारतीय सांस्कृतिक मूल्ये जगाला पुढील मार्ग दाखवतील’, असा विश्वास व्यक्त केला आहे. भारतीय सांस्कृतिक मूल्य, म्हणजे वेगळे काही नसून ‘व्यक्तीला हिंदु धर्माचरणामुळे त्याच्या अंगी जोपासले जाणारे विविध दैवी गुण, निर्माण होणारे चैतन्य, स्वत:सह समाजाचे कल्याण साधू पहाणारी तळमळ, समष्टीचा विचार आणि धर्माच्या मर्यादांचे पालन’, हेच आहे. कालमहात्म्यानुसार जागतिक स्तरावर भारत एक मोठी महासत्ता म्हणून उदयास येत असली, देशात मोठे कारखाने, उद्योगधंदे, पुष्कळ पायाभूत सुविधा, अनेक भव्य आणि दिव्य वास्तू, लोकांचे जीवनमान उंचावत असले, तरी केवळ हे म्हणजे विकास किंवा हे म्हणजेच भारतीयत्व नाही.भारतीयत्व म्हणजे आत्मिक विकास साधण्याची प्रक्रिया असून त्यासाठी आवश्यक ती व्यवस्था असलेली राज्ये आणि राष्ट्रव्यवस्था भारतात युगानुयुगे होती. याचाच अर्थ धर्माचरणी राज्यकर्ता असलेले आणि तशी प्रजा असलेले दैवी राष्ट्र होते. ‘दैवी राष्ट्र होते’, असे म्हणण्याचे कारण म्हणजे तशी व्यवस्था सध्या अस्तित्वात नाही किंवा पाश्चात्त्यांच्या विकासाच्या भ्रामक संकल्पनांमुळे अनेक शतकांची परकीय आक्रमणे आणि क्रूर राजवटी यांमुळे व्यवस्था झाकोळली गेली आहे. अयोध्येतील (उत्तरप्रदेश) श्रीराममंदिरावर ध्वजारोहण करतांना पंतप्रधान मोदी यांनी ‘गुलामगिरीच्या मानसिकतेतून पूर्णपणे बाहेर या’, असे आवाहन भारतियांना केले होते. ते एक प्रकारे भारतियांना भारतीयत्वाकडे जाण्याचेच आवाहन होते.
‘भारत मंडपम्’ची वैशिष्ट्ये

१. क्षमता : ‘भारत मंडपम् कॉम्प्लेक्स’ची एकूण क्षमता अनुमाने १४ सहस्र लोकांना सामावून घेण्याची, तर वाहनतळाची क्षमता अनुमाने ५ सहस्र ५०० वाहनांसाठी आहे. यात एक भव्य ‘ॲम्फीथिएटर’ (खुले नाट्यगृह) असून त्याची आसन क्षमता ३ सहस्र व्यक्तींची आहे. ‘ॲम्फीथिएटर’ सांस्कृतिक कार्यक्रम आणि सादरीकरण यांसाठी वापरले जाते.
२. आधुनिक व्यवस्था : ‘कन्व्हेन्शन हॉल’मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची दृकश्राव्य व्यवस्था आहे, जी १६ भाषा समजू शकते. संपूर्ण इमारत ‘५ जी’ इंटरनेट वायफायने सुसज्ज आहे. ‘मुख्य कन्व्हेन्शन सेंटर’ची रचना शंखाच्या आकाराची आहे. यात एकाच वेळी ७ सहस्र लोक बसू शकतात.
३. ‘विंडो टू दिल्ली’ : येथे ‘विंडो टू दिल्ली’ नावाचे एक स्थळ आहे, जेथून ‘इंडिया गेट’ आणि ‘राष्ट्रपती भवन’ दिसू शकते. ‘भारत मंडपम्’च्या परिसरात २८ फूट उंच कास्याची नटराज मूर्ती बसवण्यात आली आहे.
४. मॉड्यूलर हॉल्स : येथे लहान ते मोठ्या आकाराचे अनेक सभाकक्ष आहेत, जे विविध बैठका आणि चर्चा यांसाठी उपयुक्त आहेत.
५. प्रदर्शन हॉल्स : यात एकूण १.५ लाख चौरस मीटरहून अधिक प्रदर्शनाची क्षेत्रे आहेत. येथे मोठे आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावे, औद्योगिक प्रदर्शने आणि वस्तू अन् सेवा यांची प्रदर्शने आयोजित केली जातात.
६. कलाकृती : भिंतींवर आणि आतील सजावटीत योग, पंचमहाभूते (पृथ्वी, जल, अग्नि, वायु, आकाश), सूर्यशक्ती, तंजावूर चित्रकला, मधुबनी चित्रकला, वार्ली पेंटिंग्ज आणि भारताचे प्राचीन शल्यशास्त्र दर्शवणार्या कलाकृती आहेत.
थोडक्यात भारत मंडपम् हे एक जागतिक दर्जाचे ‘एम्.आय.सी.ई.’ (मिटींग (बैठक), इन्सेटिव्हस (प्रोत्साहन), कॉन्फरन्स (परिषद), एक्झिबिशन (प्रदर्शन)), सुविधा केंद्र म्हणून ओळखले जाते. याच ठिकाणी ‘जी २०’ शिखर परिषदेसारख्या अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजित करण्यात आल्या होत्या.
– श्री. यज्ञेश सावंत
३. सनातन राष्ट्राचा विषय जगात पोचवण्यास माध्यम !
असे दिव्य आणि तेजस्वी राष्ट्र निर्माण होणे, हे भारतीयत्वाची जपणूक, जोपासना आणि संरक्षण यांसाठी आवश्यक झाले आहे. जो देश पूर्वापार ज्या व्यवस्थेपासून समृद्ध आणि संपन्न होत आला, ती व्यवस्था त्यागल्यामुळे आणि पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे स्वत:चे स्वत्व अन् स्वाभिमान विसरला, तेच पुन्हा मिळवून देण्यासाठी राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांच्यात दुर्दम्य आत्मविश्वास जागवण्यासाठी अन् त्यांना दिशा देण्यासाठी २ दिवसांचे विचारमंथन ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त होणार आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्रखर हिंदुत्वनिष्ठ वक्ते, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख या महोत्सवाच्या माध्यमातून हिंदूंना सनातन राष्ट्र निर्माण करण्याची आवश्यकता बिंबवतील.वर्तमान व्यवस्थेत बहुसंख्य असूनही हिंदूंवरच देशात अन्याय आणि अत्याचार होत असल्याचे अनेक घटनांमधून दिसून येते. हिंदूंना ‘हिंदु’ म्हणून काही सुविधा वा व्यवस्था नाही; मात्र अल्पसंख्यांकांना जगात कुठेही न मिळणार्या सुविधा आणि सवलती आहेत. जागतिक स्तरावर ‘बहुसंख्य हिंदूंचा देश’ म्हणून भारताला पाहिले जाते. त्यामुळे काही ख्रिस्ती आणि इस्लामी देश भले वरवरची जवळीक करतांना दिसतील, तरी भारताला कसा त्रास देता येईल, असाच त्यांचा प्रयत्न दिसतो, म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मानहानी करण्याचे प्रयत्न अधिक होतात. अशा स्थितीत ‘भारत मंडपम्’ येथे ‘जी २०’ परिषद झाली आणि त्या माध्यमातून भारत ‘महाशक्ती’ म्हणून उदयास येत असल्यामुळे त्याचे जगात स्थान आहे. भारताला न्यून लेखून चालणार नाही आणि जागतिक राजकारणात भारतही स्वत:च्या स्वतंत्र भूमिका ठरवू शकतो, हे याच ठिकाणाहून जगातील प्रमुख देशांना पटवून देण्यास यशस्वी ठरलो होतो.
‘भारत मंडपम्’ हे नाव देण्याची कारणे !
नावात ‘भारत’ या शब्दाचा समावेश हा आपल्या देशाची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख दर्शवतो. ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित होणार्या परिषदा आणि प्रदर्शने यांच्या माध्यमातून हा देश (भारत) जागतिक समुदायासमोर सादर व्हावा’, हा मुख्य उद्देश आहे.
१. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी हे केंद्र केवळ वास्तू म्हणून न रहाता राष्ट्रीय अस्मिता आणि अभिमान यांचे प्रतीक व्हावे; म्हणून ‘भारत’ या शब्दावर जोर देण्यात आला.
२. भगवान बसवेश्वर यांच्या ‘अनुभव मंडपम्’ या नावावरून ‘भारत मंडपम्’ हे नाव दिले आहे. १२ व्या शतकातील भगवान बसवेश्वर यांचे ‘अनुभव मंडपम्’ हे कर्नाटकातील कल्याण येथे १२ व्या शतकात स्थापन झालेले एक खुले व्यासपीठ होते. याला ‘जगातील पहिली संसद’ असेही म्हटले जाते. येथे समाजातील सर्व स्तरांतील (जात, धर्म, लिंगभेद न पहाता) लोक एकत्र येऊन सामाजिक, धार्मिक आणि आध्यात्मिक विषयांवर वादविवाद, चर्चा अन् अनुभव कथन करत असत.
‘भारत मंडपम्’ या केंद्राला ‘अनुभव मंडपम्’ची प्रेरणा असून हे केंद्र सर्वांसाठी खुले असलेले व्यासपीठ आहे. ‘येथे केवळ व्यवसाय न होता जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण कल्पना आणि समस्या यांवर चर्चा (डिस्कोर्स) व्हावी, तसेच हे भारताच्या लोकशाही मूल्यांचे अन् चर्चेवर आधारित संस्कृतीचे प्रतीक असावे, जिथे प्रत्येक मताला आदर दिला जावा’, अशी भूमिका आहे.
‘जी २०’ परिषदेमुळे ‘भारत मंडपम्’ला आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च दर्जाचे स्थान मिळाले आणि भारताची ‘जागतिक केंद्र’ म्हणून ओळख वाढण्यास साहाय्य झाले. आता ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’मुळे त्याचे महत्त्व आणखी वाढणार, हे नक्की !
– श्री. यज्ञेश सावंत
४. दैवी नियोजनावर आधारित कलाटणी देणारा महोत्सव !
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा त्याच भारत मंडपम्मध्ये होत आहे, हा दुग्धशर्करायोग असून या व्यासपिठावरून भारतासह जागतिक स्तरावर ‘भारत यापुढे ‘सनातन राष्ट्रा’च्या दिशेने वेगाने वाटचाल करणार आहे’, हा संदेश जाणार आहे. हा संदेश संत, धर्माचार्य तर देणारच आहेत; मात्र हिंदुत्वनिष्ठांसह देशात राज्य आणि केंद्र येथे सत्तेत असणारे मंत्रीगण अन् लोकप्रतिनिधी सहभागी होऊन ‘सनातन राष्ट्र निर्मिती’ला पाठिंबा व्यक्त करणार आहेत. कालमहिम्यानुसार भारतातील सर्वच व्यवस्थांचा धर्मकेंद्रीय कायापालट होणार असला, तरी त्यासाठी देहली येथील शंखनाद हा आरंभबिंदू ठरेल, यात शंकाच नाही. मे २०२५ मध्ये परशूराम भूमीत, म्हणजेच गोवा येथे पार पडलेल्या महोत्सवाने हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ यांच्यात उत्साह अन् कार्य करण्याची नवीन उमेद निर्माण केली, तीच सकारात्मकता आणि प्रेरणा भारत मंडपम् येथे होणारा महोत्सव केल्याविना रहाणार नाही.‘जी २०’ परिषद झालेल्या भारत मंडपम्मध्ये ‘भारताला सनातन राष्ट्र घोषित करण्यासाठी ज्ञानयज्ञ होणे’, हा केवळ योगायोग नसून ती देशाच्या उत्थानासाठी दैवी नियोजनावर आधारित कलाटणी देणारी घटना आहे, हे तर निश्चित !
गुरुचरणार्पणमस्तु ।
– श्री. यज्ञेश सावंत, सहसंपादक, दैनिक ‘सनातन प्रभात’, पनवेल. (१.१२.२०२५)
पैसा जिंकला, नाती हरली !
‘मेनोपॉज’नंतर (रजोनिवृत्तीनंतर) वाढणारे आजार आणि आयुर्वेद : प्रतिबंध अन् समतोलाचा मार्ग
‘विश्वगुरु भारत’ होण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची आवश्यकता !
चला, पाल्यांचा मराठी शाळेत प्रवेश निश्चित करूया !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !