
भारत आणि रशिया यांच्यात केवळ राजकीय संबंध नसून त्याला ऐतिहासिक आणि सामरिक मैत्रीची पार्श्वभूमीही आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन ४ डिसेंबर या दिवशी भारताच्या दौर्यावर आले. पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांची आतापर्यंत १९ वेळा भेट झाली आहे. त्यांची प्रत्येक भेट भारतासाठी प्रगतीचे पाऊल ठरली. आतापर्यंतच्या भेटींतील अनेक महत्त्वपूर्ण करार, तसेच त्यांच्यातील चर्चा पहाता ही मैत्री अधिक दृढ, अधिक व्यापक अन् अधिक धोरणात्मक होत आहे. त्यामुळे भारतही विकासाच्या दिशेने नवनवीन वळणे घेत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना आमंत्रण दिले होते. त्याचा स्वीकार करून पुतिन भारतभेटीसाठी आले. मोदींनी त्यांना केवळ आमंत्रण दिले नाही, तर त्यांचे स्वागत करण्यासाठी ते विमानतळावर उपस्थित होते. ही गोष्ट पुतिन यांना पुष्कळ भावली आणि त्यांनी याचे कौतुकही केले. मोदी यांनी पुतिन यांना रशियन भाषेतील ‘भगवद्गीता’ भेट दिली आहे. ‘भगवद्गीतेतील शिकवण जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देते’, असेही मोदींनी त्यांना सांगितले. पुतिन यांची भारतभेट अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकते. त्यात युक्रेन संघर्ष, चीन-रशिया जवळीक, ‘इंडो-पॅसिफिक’मध्ये वाढता सामरिक तणाव, शस्त्रव्यापार या सर्वच सूत्रांचा समावेश आहे. यामुळे जागतिक स्तरावर संदेशवहन होऊ शकते. पुतिन यांच्याकडून स्वायत्ततेचा नेहमीच आदर केला जातो. त्यांनी भारताला कधीही दबावाखाली निर्णय घेण्यास भाग पाडलेले नाही. त्यामुळे या पार्श्वभूमीवरही त्यांची भेट परिणामकारक ठरू शकते. ‘आतंकवादाच्या विरोधातील लढाईत रशिया भारतासमवेत आहे. भारतीय इतके भाग्यवान आहेत की, ते भारतात रहातात आणि भारतात श्वास घेत आहेत’, अशा शब्दांत पुतिन यांनी भारतियांचे कौतुक केले. भारत हा असा देश आहे की, जो केवळ एकाच राष्ट्राकडे झुकत नाही, तर तो आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे वैश्विक स्तरावर भारताचे नाव गौरवाने घेतले जाते. या अनुषंगानेही सर्वच जण या अभूतपूर्व भेटीतील चर्चेच्या प्रतीक्षेत होते.
दोन्ही राष्ट्रांमधील परस्परपूरकता आणि अवलंबित्व !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी ‘भारताने रशियाकडून तेल घेऊ नये’, यासाठी दबाव टाकला होता. त्यांनी भारतावर ५० टक्के कर लागू केला; पण आपण अमेरिकेला न जुमानता रशियाकडून तेल घेतच आहोत. रशिया भारताला स्वस्त दरात तेलाची निर्यात करत असल्याने आपण राष्ट्रहित जोपासण्याच्या पार्श्वभूमीवर तेल घेणे चालूच ठेवले आहे. अर्थात्च ते अमेरिकेला मान्य नाही. ‘भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने रशियाला युक्रेनविरुद्ध युद्ध चालू ठेवण्यासाठी बळ मिळते’, असे ट्रम्प म्हणतात; पण पुतिन यांनी एका वृत्तवाहिनीच्या चर्चेतून अमेरिकेला रोखठोक शब्दांत सुनावले, ‘‘जर अमेरिका रशियाचे तेल खरेदी करू शकते, तर मग भारताला त्या अधिकारापासून वंचित का ठेवायचे ? अमेरिका तिच्या ‘न्यूक्लियर पॉवर प्लांट्स’साठी आमच्याकडून अणूइंधन विकत घेते. तेसुद्धा इंधनच आहे, तीसुद्धा ऊर्जाच आहे.’’ रशियाकडील तेल आणि गॅस यांमुळे भारतीय अर्थव्यवस्था टिकून आहे, हे देशासाठी महत्त्वपूर्ण आहे. रशिया भारताला राफेलपेक्षाही मोठे असलेले अत्याधुनिक विमान ‘एस्यू ५७’ याचे तंत्रज्ञान विकण्याच्या सिद्धतेत आहे. या माध्यमातून भारतात विमाननिर्मितीतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या पायघड्याच घालण्यात येणार आहेत. हे विमान भारत आणि रशिया यांच्यातील व्यापारसंबंध वृद्धींगत करण्यासाठी पूरक ठरू शकते. भविष्यात ‘रुपया (भारतीय चलन) – रुबल (रशियाचे चलन) व्यापार किंवा डॉलरविना व्यापार’ ही संकल्पना स्थिर झाल्यास ते राष्ट्रहितकारक ठरेल. दोन्ही राष्ट्रे दीर्घकालीन सामरिक सहकार्यासाठी वचनबद्ध आहेत.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांची भारतभेट महत्त्वाची ठरली ! पुष्कळ कालावधीपासून हे युद्ध चालू आहे. पंतप्रधान मोदी युद्धाविषयी भारताची भूमिका मांडतांना म्हणाले, ‘‘भारत युद्धात तटस्थ नसून शांततेच्या बाजूने आहे. जगानेही शांततेच्या मार्गावर परतले पाहिजे. भारत-रशिया संबंध अधिक दृढ होऊन त्याने नवी उंची गाठायला हवी.’’ भारताच्या भूमिकेचे पुतिन यांनी स्वागत केले. रशिया-युक्रेन युद्धाच्या प्रकरणात भारताने मुत्सद्दीपणे स्वतःची भूमिका मांडली आहे. मोदी यांच्या वक्तव्यातूनही हेच दिसून आले.
भारताच्या वेगाने वाढणार्या अर्थव्यवस्थेसाठी इंधनाचा अखंड पुरवठा चालू ठेवणार असल्याचे पुतिन यांनी चर्चेत स्पष्ट केले. पंतप्रधान मोदींनी रशियातील नागरिकांसाठी ३० दिवसांचा विनामूल्य ‘ई-टूरिस्ट व्हिसा’ घोषित केला. भारत-रशिया यांच्या व्यापारात १०० अब्ज डॉलर्सचा द्विपक्षीय व्यापार साध्य करून सर्वाधिक आर्थिक उलाढाल करण्यात येणार असल्याचे दोन्ही नेत्यांनी ठरवले आहे. ‘पंतप्रधान मोदींनी दोन्ही सरकारांसमोरील प्रमुख आव्हाने अधोरेखित केली असून आम्ही त्यावर नक्कीच कार्यवाही करू’, असेही पुतिन म्हणाले.
पुतिन – मोदी यांच्या भेटीत त्यांनी ‘व्हिजन’ २०३० चा धोरणात्मक ‘रोडमॅप’ (दीर्घकालीन मार्गदर्शक नकाशा) असलेल्या दीर्घकालीन आर्थिक सहकार्यासाठी प्राधान्य क्षेत्रांची रूपरेषा सांगणार्या व्यापक कार्यक्रमावर स्वाक्षरी करण्यात आली. भारत आणि रशिया दोन्ही राष्ट्रे आतंकवादाच्या विरोधात खांद्याला खांदा लावून उभी असून त्यासाठी एकत्रित जागतिक कारवाईचे आवाहन करण्यात आले. सैनिकी संबंध, अंतराळ संशोधन, कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) आणि नौकाबांधणीमधील सहकार्य यांतही वृद्धी करण्यात येणार आहे. दोन्ही राष्ट्रांनी भविष्यात संयुक्त राष्ट्र, जी २०, ब्रिक्स आणि एस्.सी.ओ. यांसह आंतरराष्ट्रीय व्यासपिठांवर समन्वय राखण्यास सहमती दर्शवली. रशिया आणि भारत यांची जरी मैत्री घट्ट होत असली, तरी रशिया आणि चीन यांच्यातील जवळीकही वाढत आहे. त्यामुळे भारतासाठी हे मोठे आव्हान ठरणार आहे. चीनमुळे भारतातील तणाव वाढतो. या दृष्टीने ‘रशियाची भूमिका अत्यंत संवेदनशील आणि संतुलित रहायला हवी’, असेही भारतियांना वाटते. भविष्यात रशिया-चीन संबंध आणखी बहरतील कि ते कोमेजतील, हे येणारा काळच सांगेल.
जागतिक पटलावर भारताचे महत्त्व !
भारत आणि रशिया यांनी आतापर्यंतच्या अनेक प्रतिकूल परिस्थितीत एकमेकांना साथ दिली आहे. या भेटीतून दोन्ही देशांतील आर्थिक आणि सामरिक सामर्थ्य नक्कीच वाढणार आहे. दोन्ही देशांची भूमिका अधिक प्रभावी आणि स्थिर होईल. ‘कणखर परराष्ट्रनीती राबवणार्या भारताची रशियासमवेतची मैत्री अशीच वृद्धींगत होत राहू दे आणि भारतातील समस्यांवर मात करण्यासाठी ती पूरक ठरू दे’, असेच भारतियांना वाटते.
| रशिया-भारत यांची मैत्री असली, तरी रशिया-चीन यांच्यातील जवळीक वाढत असल्याने भारताने या आव्हानाचा सामना करावा ! |

संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !
Delhi Hotel Fire : देहलीतील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीमध्ये २१ जणांचा मृत्यू
संपादकीय : दैवी स्वरसाज हरपला !
मूल्याधिष्ठित पत्रकारिता देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
संपादकीय : ‘गांधीवादा’ची कात टाकलेला भारत !