नेपाळने पुन्हा केली भारतावर कुरघोडी; चलनी नोटांनी उफाळला जुना वाद !

नेपाळने छापलेल्या नव्या नोटेचे छायाचित्र

काठमांडू (नेपाळ) – नेपाळच्या सेंट्रल बँकेने नवीन १०० रुपयांची नोट प्रसारित केली आहे; पण या नोटेसह एक जुना वाद पुन्हा उफाळून आला आहे. या नोटेवर छापलेल्या नकाशात नेपाळने लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा हे भाग त्याच्या प्रदेशात दाखवले आहेत, जे वर्षानुवर्षे उत्तराखंडचा हिस्सा मानले गेले आहेत. त्यामुळे ही नोट आता भारत-नेपाळ संबंधांमध्ये नवीन तणावाचा प्रारंभ मानला जात आहे.

नवीन नोटेच्या समोरील बाजूस डावीकडे माऊंट एव्हरेस्टचे छायाचित्र आहे आणि उजवीकडे नेपाळच्या राष्ट्रीय फुलाचा ‘वॉटरमार्क’मध्ये हलक्या हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर नेपाळचा विस्तारित नकाशा दिला आहे. (‘वॉटरमार्क’ म्हणजे कागदावर उत्पादन प्रक्रियेच्या वेळी सिद्ध केलेले एक चिन्ह आहे, जे प्रकाशामध्ये धरल्यास दिसते.) त्याच्या जवळ अशोक स्तंभही छापला आहे, ज्यात बुद्धांची जन्मभूमी लुंबिनीचा उल्लेख आहे. नोटेच्या मागील बाजूस एकशिंगी गेंडा दिसतो.

वर्ष २०२० मध्ये नेपाळच्या तत्कालीन सरकारने नवीन राजकीय नकाशा प्रसारित करून दावा केला होता की, महाकाली नदीच्या उद्गम क्षेत्रामुळे लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा हे त्याच्या वास्तविक भूभागाचा हिस्सा आहेत. नेपाळच्या संसदनेही त्या नकाशाला मान्यता दिली होती; मात्र भारताने या पावलाला चुकीचे ठरवत म्हटले होते की, ते ऐतिहासिक तथ्य आणि प्रशासकीय वास्तव यांच्याशी अजिबात जुळत नाही.

भारत आणि नेपाळ यांच्यात अनुमाने १ सहस्र ८५० किलोमीटरची सीमा आहे. दोन्ही देशांमधील सीमा निर्धारणाचा आधार म्हणून वर्ष १८१६ च्या ‘सुगौली करारा’ला मानले जाते. विवादाचे मूळ कारण, म्हणजे महाकाली नदीच्या मुख्य प्रवाहाविषयी दोन्ही देशांच्या वेगवेगळ्या व्याख्या. भारत ज्या प्रवाहाला मुख्य मानतो, त्याला नेपाळ ‘उपनदी’ मानतो अन् येथूनच सीमारेषेविषयीचा वाद निर्माण होतो.