सिद्धमुनी नामधारकाला सांगतात, ‘‘या कलियुगामध्ये श्रीविष्णूंनी भक्तजन तारणार्थ अनेक अवतार धारण केले. त्यांपैकी श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवताराची कथा तुला सांगतो. पिठापूर पूर्व देशामध्ये आपळराजा नावाचा एक ब्राह्मण रहात होता. त्याची सुमती नावाची पतिव्रता भार्या अतिथी अभ्यागतांची नित्य सेवा भक्तीभावाने करत असे.

१. श्राद्धाच्या दिवशी साक्षात् दत्तात्रेयांनी दर्शन आणि वर देणे
एका अमावास्येच्या दिवशी ब्राह्मणाच्या घरी श्राद्ध होते. स्वयंपाक सिद्ध होता. अद्याप ब्राह्मणांचे भोजन व्हायचे होते. अशा वेळी दत्तात्रेय भिक्षेकरता आल्यावर सुमतीने त्यांना भिक्षा घालून प्रसन्न केले. भिक्षेस आलेल्या यतीने त्रैमूर्तीचे रूप घेऊन तिला दर्शन दिले. तेव्हा त्या पतिव्रता स्त्रीने त्यांना मनोभावे नमस्कार करून आर्त स्वरांनी त्यांचे स्तवन केले. दत्तात्रेय तिला म्हणाले, ‘‘माते, तुझ्या इच्छा त्वरित पूर्ण होतील. जननी, तुझ्या मनातील इच्छा मला सांग.’’ ती म्हणाली, ‘‘स्वामी, आपण मला जननी म्हणाला, ते तुमचे बोल सत्य करा. काय सांगू देवा, मला पुष्कळ पुत्र झाले; पण ते काही वाचले नाहीत आणि त्यातून जे २ वाचले आहेत, ते आंधळे अन् पांगळे आहेत; म्हणून देवा मला तुमच्यासारखा ज्ञानवान, तसेच जगद्वंद्य पुत्र होईल, असा वर द्या.’’ ते यती म्हणाले, ‘‘होईल, होईल. तुमच्या कुळाचा उद्धार करणारा ज्ञानी पुत्र तुला लवकरच होईल; पण तुम्ही त्याच्या शब्दाबाहेर जाता उपयोगी नाही.’’ असे सांगूत ते अदृश्य झाले.
वरील सर्व वृत्तांत सुमतीने तिच्या पतीला सांगताच त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. ‘भिक्षूकरूपाने श्री दत्तात्रेय आले आणि माझ्या घरी भिक्षा करून संतोष पावले. यामुळे माझे पितर कृतार्थ झाले आहेत. धन्य तुझे माता-पिता !’, असे म्हणून त्याने पत्नीला धन्यवाद दिले.
२. ‘श्रीपादां’चा जन्म आणि त्यांना चारही वेद, मीमांसा यांचे मुखोद्गत असलेले ज्ञान
योग्य वेळी सुमतीला पुत्ररत्न झाले. त्याच्या जातकर्माच्या वेळी गावातील विद्वान ब्राह्मणांनी ‘तो महान तपस्वी जगद्गुरु होईल’, असे भविष्य वर्तवले; म्हणून त्या बालकाचे नाव ‘श्रीपाद’ असे ठेवले. मूल वाढू लागले. ८ व्या वर्षी त्याचे यथाविधी मौजीबंधन (मुंज) केले आणि काय आश्चर्य लागलीच तो ब्रह्मचारी बालक चारही वेद, मीमांसा, तर्कशास्त्र इत्यादी घडाघडा म्हणू लागला ! विद्वान ब्राह्मणांना वेदांतभाष्य सांगू लागला !
३. श्रीपादने विवाह आणि ज्ञानमार्ग यांविषयी दिलेले संकेत
अशा रितीने श्रीपादची १५ वर्षे निघून गेली. १६ व्या वर्षी आई-वडिलांनी त्याच्याकडे विवाहाविषयी विचारणा केली. तेव्हा तो त्यांना म्हणाला, ‘‘विरक्तीरूपी स्त्रीसमवेत मी लग्न करणार आहे. अन्य सर्व स्त्रिया मला मातेप्रमाणे आहेत. माझे नाव ‘श्रीवल्लभ’ आहे. आता मी ज्ञानमार्गाने जाण्याच्या सिद्धतेत आहे.’’
४. माता-पित्यांच्या सेवेसाठी पांगळ्या भावांना सुदृढ शरीर प्रदान करून मुक्त होण्याचा वर देणे
श्रीपादाचे वरील शब्द ऐकून माता-पित्यांना त्या भिक्षुकाच्या शब्दांची आठवण झाली आणि ते म्हणाले, ‘‘बाबा रे, तुझ्या मनात असेल, तसे कर; पण तू आमचा प्रतिपाळ करशील, अशी आम्हाला आशा आहे. वृद्धपणी आमचे कोण बरे रक्षण करणार ? आणि त्या आंधळ्या-पांगळ्या पुत्रांचे तरी कोण रक्षण करणार ?’’ व्याकुळ होऊन मूर्च्छित पडलेल्या मातेचे अश्रू पुसून त्या अवतारी पुत्राने आपल्या लुळ्या-पांगळ्या २ भावांकडे पाहिल्यावर तत्क्षणी ते सुदृृढ शरिराचे झाले. त्यांना ‘शतायुषी व्हाल, जननी-जनकांची सेवा करून तुम्ही ज्ञानवान होऊन अंती मुक्त होऊन जाल’, असा वर दिला.
५. अंतिमतः तीर्थक्षेत्री हिंडून गोकर्ण क्षेत्रामध्ये वास्तव्य करणे
शेवटी श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या माता-पित्यांचा निरोप घेऊन उत्तरपंथाला निघाले. ते काशीपुरीमध्ये काही काळ गुप्तरूपाने राहून नंतर बद्रीनारायणाच्या दर्शनाला गेले. तेथून भक्तजनांना उपदेश करण्याच्या हेतूने फिरत फिरत ते गोकर्ण क्षेत्रामध्ये येऊन राहिले.’’
(साभार : त्रैमासिक ‘अक्कलकोट स्वामीदर्शन’, गुरुपौर्णिमा २००३)
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !