श्री दत्तात्रेयांची गोरखनाथ यांनी परीक्षा घेतल्याची कथा आणि त्या माध्यमातून मिळालेली शिकवण !

भगवान दत्तात्रेयांचा लौकिक झाल्यानंतर तिबेट आणि हिमालय या भागांत गोरखनाथ यांचा संचार चालू होता. त्या वेळी दत्तात्रेयांचा मुक्काम महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरीवर होता, ज्या ठिकाणी गोरखनाथ यांचे स्थान आहे आणि जेथे निवृत्तीनाथ यांना उपदेश झाला, त्या ठिकाणी दत्तात्रेय निवास करत असत.

श्री दत्तात्रेय गोरखनाथांना दर्शन देतांना

१. दत्तात्रेयांच्या शोधासाठी गोरखनाथ निघणे

गोरखनाथ महासिद्ध पुरुष आणि नाथ संप्रदाय यांचा प्रचार करत होते. ‘संपूर्ण विश्वातील सिद्धींचे बंड मोडून काढून सात्त्विक उपासना निर्माण करावी’, अशी त्यांची धारणा होती. दत्तात्रेयांचा लौकिक ऐकल्यानंतर त्यांचे एकदा तरी दर्शन घ्यावे, म्हणून ते आले होते.

२. गोरखनाथ यांनी दत्तात्रेयांचा शोध घेणे

दत्तात्रेयांचा शोध घेत घेत गोरखनाथ त्यांच्या गुहेत आले. त्या गुहेत दत्तगुरु एका शिळेवर आसनस्थ होते. दुसर्‍या एका शीळाखंडावर गोरखनाथ त्यांच्याकडील चिमटा, कमंडलू आणि झोळी ठेवून बसले. बराच वेळ झाला, तरी दत्तात्रेयांचे ध्यान संपण्याचे चिन्ह दिसेना; म्हणून अंतरंगात शिरून ते शोध घेऊ लागले. तेव्हा अंतरिक्षात त्या दोघांची भेट झाली. नंतर ते दोघेही गुहेत आले. ‘परीक्षा घेतल्याविना कुणाचीही भीड ठेवायची नाही’, असा गोरखनाथांचा बाणा होता.

३. दत्तात्रेयांनी गोरखनाथ यांना कमंडलूत दूध निर्माण करून दिल्यानंतरही त्यांचे समाधान न होणे

माध्यान्ह झाली होती. भुकेची वेळ होती. गोरखनाथांनी दत्तात्रेयांना विचारले, ‘‘आपण येथे अहोरात्र असता, तेव्हा उदरभरणाची सोय काय ?’’ श्रीदत्त भगवान म्हणाले, ‘‘चल, तुलाही भूक लागली असेल, तर आपण दूध पिऊ.’’ दत्तात्रेयांनी त्यांचा कमंडलू हस्तप्रक्षेपित केला, तर त्यात दूध भरून आले. ते दूध गोरखनाथ प्यायले; पण तरीही त्यांना दत्तात्रेयांची परीक्षा घ्यायची होती ! ते दत्तात्रेयांना म्हणाले, ‘‘अहो, हा एक प्रयोग आहे. वेदकालात कलश भरून ठेवत नसत. कलशस्थापना करून वरुणमंत्र म्हणत असत. तो मंत्र म्हणून हस्तप्रक्षेपण करताच कलश भरून येत असे.’’ अशा प्रकारे श्री दत्तांनी मंत्रसाधना केली असेल, असे गोरखनाथांना वाटले.

४. गोरखनाथ यांनी दत्तात्रेयांशी विविध गहन प्रश्नांची चर्चा करणे

वरील प्रसंगानंतर गोरखनाथांनी कडसणी लावायला (कडक बोलायला) प्रारंभ केला आणि विचारले, ‘‘निराकाराचा तुम्हाला काही बोध आहे का ?’’ तेव्हा दत्त म्हणाले, ‘‘त्यावाचून काही बोध असू शकतो का ?’’ गोरखनाथ म्हणाले, ‘‘तुम्ही आणि मी हा कशाचा बोध आहे ?’’ दत्तात्रयांनी सांगितले, ‘‘तो तुझ्यात आणि माझ्यात आहे.’’ यानंतर श्री दत्त आणि गोरखनाथ यांची बरीच चर्चा झाली.

५. दत्तात्रेयांनी गोरखनाथांना विविध स्थानांमधून शोधून काढणे

वरील चर्चेनंतर अंतिमतः दत्तात्रेयांनी सांगितले, ‘‘आपण परस्परांना शोधून काढू.’’ प्रथम दत्त शोधायला निघाले. गोरखनाथ दत्तांच्या कमंडलूत शिरले. दत्तांनी तो कमंडलू उचलून पालथा केला आणि सांगितले, ‘‘बाहेर ये.’’ तेव्हा गोरखनाथ म्हणाले, ‘‘एक वेळ पकडले, आता पुन्हा पकडा.’’ तद्नंतर गोरखनाथ बेडूक होऊन प्रवाहात शिरले. दत्तांनी तंगडी धरून त्यांना बाहेर काढले. नंतर गोरखनाथ औदुंबरांत शिरले. दत्तांनी डहाळी तोडली आणि बाहेर येण्यास सांगितले. शेवटी दत्तांच्या आसनाखाली गोरखनाथ गेले. दत्त तेथे जातात; पण आसनावर प्रत्यक्ष शिवाचे प्रतीक असल्याने ते आसनावर बसत नाहीत. गोरखनाथांना बाहेर बोलावतात. तेव्हा गोरखनाथ दत्तांना म्हणतात, ‘‘तुम्ही महासिद्ध आहात !’’ त्यावर श्री दत्त म्हणतात, ‘‘तू काय अल्प आहेस !’’

६. अहंकारामुळे गोरखनाथ दत्तात्रेयांना शोधू न शकणे आणि अंतिमतः दत्तात्रेयांना शरण गेल्यावर शोध लागणे !

गोरखनाथ यांना असा अहंकार होता की, आपणही दत्तांना शोधू. तेव्हा दत्त त्यांच्या आसनावरच गुप्त झाले. गोरखनाथ यांनी त्यांचे कलेवर टाकले (देहत्याग करून महासमाधी घेतली) आणि अंतरिक्षात शोधायला प्रारंभ केला. सप्त पाताळ, स्वर्ग, अंतरिक्ष, १४ दिशा संपल्या; पण कुठेही पत्ता लागेना. शेवटी विचार करू लागले, ‘हे गेले तरी कुठे ?’ जलाशयात, पाण्यात सर्व ठिकाणी शोधाशोध झाली; पण दत्तांचा पत्ता नाही. गोरखनाथ दत्तात्रेयांचा शोध घेत असतांना मच्छिंद्रनाथ तेथे येतात आणि गोरखनाथांना सांगतात, ‘‘तू दत्तांना शरण जा, म्हणजे ते सापडतील.’’ एवढे सांगून मच्छिंद्रनाथ निघून जातात. नंतर गोरखनाथ दत्तांना प्रार्थना करतात.

तेवढ्यात जलाशयातून दत्तात्रेयांचा ध्वनी उमटतो. तेव्हा गोरखनाथ त्यांना विचारतात, ‘‘ही कुठली सिद्धी ? आपण ज्या स्थितीत गेला, ती निराकाराच्या अतीत आहे. मी साकार, आकार, उकार, मकार सर्व शोधले, कुठे पत्ता लागला नाही. तेव्हा आपण कुठे होता ?’’ तेव्हा दत्त उत्तर देतात, ‘‘मी तुझ्याजवळ त्या जलाशयात पाणी होऊन वहात होतो. वारा होऊन फिरत होतो. आकाश होऊन लहरत होतो, म्हणजे अशी स्थिती नाही की, ज्यात मी नाही; ज्याच्यात मी आहे आणि जे माझ्यापासून काही वेगळे आहे. याला सर्वांत मोठी सिद्धी ‘महाकाय सिद्धी’ म्हणतात.’’

७. दत्तात्रेयांकडे विश्वातील सर्व स्वरूपांमध्ये संचारण्याची कला असणे

दत्तात्रेयांकडे महाकाय सिद्धी, म्हणजे विश्वाच्या सर्व स्वरूपांमध्ये एक समयावच्छेदेकरून (एकाच वेळी सर्वत्र) संचारण्याची ही कला आहे. भगवान दत्तात्रेयांना ‘स्मर्तृगामी’ म्हणतात, म्हणजे कल्पना करू किंवा संकल्प करू, तेथे ते सिद्ध असतात किंवा प्रकट असतात. दत्तांवाचून कुठलेच स्थान रिते (रिकामे) असू शकत नाही. दत्तांचा अलौकिक संचार या भारतवर्षात विहार करू शकतो.

८. दत्तात्रेयांनी त्यांच्या सिद्धींचा उपयोग जड जिवांचे कल्याण आणि सामाजिक दुष्टांचा संहार करण्यासाठी केला आहे !

– श्री संत बाबामहाराज आर्वीकर

(साभार : ग्रंथ ‘श्रीदत्तोपासना’)