अहिल्यानगरचे वेदमूर्ती दंडक्रम विक्रमादित्य देवव्रत रेखे यांनी रचला इतिहास !

काशी येथे अत्यंत कठीण ‘दंडक्रम पारायण’ पूर्ण

वेदमूर्ती दंडक्रम विक्रमादित्य देवव्रत रेखे

अहिल्यानगर – काशीमध्ये मागील ५० दिवसांपासून चालू असलेल्या ‘दंडक्रम वेद पारायणा’चा समारोप नुकताच झाला. राज्यातील अहिल्यानगरचे वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे (वय १९ वर्षे) यांनी अत्यंत कठीण अशा स्वरूपाचे दंडक्रम वेद पारायण अखंड आणि न चुकता पूर्ण केले असून ‘दंडक्रम विक्रमादित्य’ ही उपाधी त्यांनी प्राप्त केली आहे. देवव्रत यांनी या दंडक्रम पारायणात २ सहस्र मंत्रांचे ५० दिवस निरंतर ग्रंथ न पहाता त्रुटिरहित पठण करून विश्वभरात वेद-परंपरेचा अभिमान उंचावला. शृंगेरी पीठाचे शंकराचार्य जगद्गुरु भारती तीर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच एक भव्य कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवव्रत यांचे अभिनंदन केले असून वैदिक परंपरेचे तेज असेच उजळवत राहो, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

वेदमूर्ती दंडक्रम विक्रमादित्य देवव्रत रेखे

२०० वर्षांनंतर प्रथमच दंडक्रम पारायण !

देवव्रत यांनी २ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ‘वल्लभराम शालिग्राम सांगवेद विद्यालया’त पारायण केले. प्रतिदिन सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यंदिनी शाखेतील अनुमाने २ सहस्र मंत्रांचे दंडक्रमाने ते पठण करत होते. काशीमध्ये असे दंडक्रम पारायण २०० वर्षांनंतर प्रथमच झाले. याआधी अनुमाने २ शतकांपूर्वी नाशिकमध्ये वेदमूर्ती नारायण शास्त्री यांनी असे पारायण केले होते.

अन्नपूर्णा मंदिराचे महंत शंकरपुरी महाराज, महेश चैतन्य ब्रह्मचारी (हरिद्वार), आचार्य राजाराम शुक्ल आणि आचार्य हृदयरंजन शर्मा यांनी याप्रसंगी देवव्रत यांचा सत्कार केला. वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांच्या सन्मानार्थ त्यांना सोन्याचे कडे आणि १ लाख १ सहस्र ११६ रुपये प्रदान करण्यात आले. या वेळी काशीच्या विद्वानांकडून आणि विविध संस्थांकडूनही देवव्रत यांचा गौरव करण्यात आला. त्याचसमवेत देवव्रत यांचे वडील आणि गुरु महेश चंद्रकांत रेखे, श्रोता देवेंद्र गढीकर आणि पारायण संयोजक नीलेश केदार जोशी यांचाही सत्कार करण्यात आला.

दंडक्रम पारायण पूर्ण केल्याविषयी पंतप्रधान मोदी यांनी केले अभिनंदन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वरील आपल्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले,

केवळ १९ वर्षे वयाच्या वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी केलेल्या या कार्याची आठवण येणार्‍या अनेक पिढ्या ठेवतील ! भारतीय संस्कृतीविषयी प्रेम असणार्‍या सर्वांना त्याने दंडक्रम पारायण पूर्ण केल्याविषयी त्याचा पुष्कळ अभिमान आहे. शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यंदिनी शाखेचे २ सहस्र मंत्र ५० दिवसांत कोणताही खंड न पाडता म्हणणे याला ‘दंडक्रम पारायण’ असे म्हटले जाते. यात अनेक वैदिक मंत्र आणि ऋचा अचूक म्हणणे अपेक्षित असते. आपल्या उच्च गुणवत्तेच्या गुरु परंपरेचे हे एक अद्वितीय उदाहरण आहे. हे अद्वितीय कार्य काशीच्या पवित्र नगरीत पार पडले, याचा काशी नगरीचा खासदार म्हणून मला पुष्कळ आनंद झाला आहे. त्याच्या कुटुंबियांना, तसेच त्याच्या पाठीशी असलेले देशभरातील साधू-संत, पंडित, तसेच अनेक संस्था यांना माझे प्रणाम !

वेदमूर्ती देवव्रत रेखे यांच्या अलौकिक कार्यापुढे आम्ही नतमस्तक ! – आचार्य तुषार भोसले, प्रदेशाध्यक्ष, भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी

वैदिक मौखिक परंपरेनुसार ‘दंडक्रम’ ही सर्वाधिक कठीण, सुसंगठित आणि विलक्षण पद्धत आहे. विशेष म्हणजे हे अत्यंत कठीण ‘दंडक्रम’ पारायण जगाच्या पाठीवर आणि इतिहासात केवळ दुसर्‍यांदा झाले आहे. तेही वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षासाठी आणि महाराष्ट्राच्या सुपुत्राकडून घडले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या अलौकिक आणि अद्भुत कार्यापुढे आम्ही केवळ नतमस्तक आहोत.

दंडक्रम पारायण पूर्ण करणे म्हणजे आपल्या प्राचीन गुरु परंपरेच्या वैभवाचे पुनरुज्जीवन ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

देवव्रत महेश रेखे यांचा सन्मान करतांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

महाराष्ट्रातील १९ वर्षीय तरुण देवव्रत महेश रेखे यांनी त्यांच्या अद्भुत स्मरणशक्तीच्या माध्यमातून २ सहस्र वैदिक मंत्रांचे स्मरण करून मिळवलेले अभूतपूर्व यश संपूर्ण आध्यात्मिक जगासाठी एक प्रेरणा आहे.

पारायण अखंड, शुद्ध आणि शिस्तीने पूर्ण करणे म्हणजे आपल्या प्राचीन गुरु परंपरेच्या वैभवाचे पुनरुज्जीवन आहे. पवित्र काशीच्या दिव्य भूमीवर हा वैदिक विधी पार पडला, ही माझ्यासाठी विशेष अभिमानाची गोष्ट आहे.