दैवी गुणांनी युक्त असा ‘औदुंबर वृक्ष’ !

उद्या, ४ डिसेंबर या दिवशी ‘दत्त जयंती’ आहे. त्या निमित्ताने…

दाह शमन करणारा दैवी वृक्ष औदुंबर म्हणजेच उंबर. नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे. भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो. या झाडाच्या आसपास भूमीत पाणी आढळते. किंबहुना जिथे पाणी मुबलक असते, अशा भूमीत हा वृक्ष वाढतो. या वृक्षाची काही वैशिष्ट्यपूर्ण माहिती येथे देत आहोत.

औदुंबर वृक्ष

१. औदुंबर वृक्षाचे काही अद्भुत उपयोग

अ. उंबराच्या सालीचा काढा करून तो थंड करावा. त्यात खडीसाखर-वेलची टाकून सरबत करावे. कर्करोग झाल्यावर जी ‘केमोथेरपी’ (रसायनोपचार) देतात, त्यात शरिराचा भयानक दाह होतो. त्यात हे सरबत उत्तम आहे. दिवसातून तीनदा घ्यावे.

आ. अतिसाराच्या वेळी रक्त पडत असेल, तर सालीचा काढा द्यावा.

इ. जखम झाल्यावर ती धुण्यासाठी ‘डेटॉल’, ‘सॅव्हलॉन’ यांसारखे औषध लावण्याऐवजी ती सालीच्या काढ्याने धुतली, तर जखम वेगाने भरून येते.

ई. तोंड आले असता सालीचा काढा थोडा घट्ट करून तो तोंडाला आतून लावला, तर वेगाने त्रास न्यून होतो.

उ. गर्भाशयाची सूज न्यून करण्यासाठी, रक्तप्रदर, श्वेतप्रदर, मासिक पाळीच्या काळात अतीप्रमाणात रक्तस्त्राव होत असेल, तर सालीचा काढा देतात. यासह योनीमार्गाद्वारे त्याच काढ्याचा उत्तरबस्ती दिला, तर उत्तम गुण येतो.

ऊ. गर्भाचे पोषण व्हावे म्हणून काढा देतात. सातत्याने गर्भपात होत असेल, तर गर्भ धारणेनंतर सालीचे सरबत करून प्यावे.

ए. लहान मुलांना दात येतांना जुलाब होतात, त्या वेळी उंबराचा चिक बत्ताशासमवेत देतात. भस्मक नावाची एक व्याधी आहे, ज्यात व्यक्तीसारखे काही न काही खात असते; पण त्या मुलाचे पोट भरत नाही, काही वेळाने परत भूक लागते. या आजारात उंबराची साल आईच्या दुधात वाटून दिली असता ही विचित्र लक्षणे न्यून होतात.

ओ. उचकी थांबत नसेल, तर उंबराच्या फळाचा रस प्यावा.

औ. कावीळ झाल्यास उंबराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात.

अं. तापात अंगाची आग होत असेल, तर पिकलेले उंबराचे फळ खायला द्यावे.

(टीप : वर सांगितलेले उपचार मनाने न करता वैद्यांच्या सल्ल्याने करणे श्रेयस्कर आहे. – संपादक)

२. औदुंबर वृक्षाला ‘देव’ का म्हणतात ?

औदुंबर वृक्षाला ’देव’ मानले जाते; कारण तो भगवान दत्तात्रेय आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्याशी संबंधित आहे. तेथे त्यांचा निवास असतो, अशी भक्तांची श्रद्धा आहे. औदुंबर वृक्षाला ‘कल्पवृक्ष’ मानले जाते; कारण त्याच्या सेवेने अनेक मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते.

२ अ. धार्मिक महत्त्व : या वृक्षाची प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते, तसेच त्याच्या सुकलेल्या काड्यांचा वापर होमहवनात समिधा म्हणून केला जातो.

२ आ. कल्पवृक्ष : औदुंबर वृक्ष हा कलियुगातील कल्पवृक्ष मानला जातो. त्याच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते, असे मानले जाते.

२ इ. औषधी गुणधर्म : या वृक्षाला केवळ धार्मिकच नव्हे, तर औषधी गुणधर्मही आहेत. त्याची पाने विंचू चावल्यावर लावल्यास वेदना न्यून होतात, चिक लावल्यास गालगुंड न्यून होते आणि फळे, तसेच सालीचा रस अंगाला चोळल्यास कुष्ठरोग बरा होऊ शकतो, असे लाभ सांगितले जातात.

(टीप : वर सांगितलेले उपचार मनाने न करता वैद्यांच्या सल्ल्याने करणे श्रेयस्कर आहे. – संपादक)

३. औदुंबर महात्म्य आणि नाथ संप्रदाय

नाथ पंथांच्या परंपरेतील थोर विभूतींनी चित्रकूट येथून पंथाचे कार्य केले होते. चित्रकूट येथे माधवनाथांनी कार्याला आरंभ केला आणि नंतर तेथील स्थान अन् पंथ महात्म्य हे देवगावरंगारी, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आणले. त्यानंतर चित्रकूटच्या स्थानाची परंपरा बंद झाली. ते सर्व कार्य आणि महात्म्य देवगावरंगारी येथून चालू केले. माधवनाथांच्या नंतर व्यंकटनाथांनी कार्य केले. त्यांच्या समाधीनंतर पुढील कार्य त्यांच्याच कृपाशीर्वादाने या नाथ शक्तीपिठातून होत आहे. या पंथाची अशी ही अखंड परंपरा अजून कार्यरत आहे. पंथाच्या सिद्धतेची अनुभूती या नाथ शक्तीपिठातून अनेक जण घेत आहेत. या सर्व गोष्टींमुळे या नाथ शक्तीपिठाला आगळेवेगळे महत्व प्राप्त झाले आहे. या शक्तीपिठाच्या गाभार्‍याच्या मागे भगवान दत्तात्रेयाच्या अत्यंत प्रीतीचे औदुंबर वृक्ष स्वयंभूपणे प्रस्थापित झाले आहे.

४. औदुंबर वृक्ष महात्म्य

दत्तप्रभूंना औदुंबर वृक्षाप्रती मोठे प्रेम आहे. औदुंबर वृक्षाच्या तळामध्ये त्यांचा निवास असल्याचे सर्वश्रुत आहे. ‘अनेक पुण्यवृक्ष त्यजून । काय प्रीती औदुंबरी ।’, असा प्रश्न विचारल्यावरून १९ व्या अध्यायात श्री गुरूंनी औदुंबर वृक्षाची महती सांगितली आहे. श्री नृसिंह सरस्वतींनी औदुंबराचा संबंध श्रीनृिसंहाशी असलेला स्पष्ट केला आहे. हिरण्यकश्यपूचा श्री नृसिंहाने वध केल्यानंतर भगवंताच्या हाताची अतिशय आग होत राहिली. त्या वेळी लक्ष्मीदेवीने एक औदुंबराचे फळ आणले आणि ‘तये वेळी शीतलार्थ । नखे रोविली औदुंबरात । विषाग्नि झाला शांत । उग्र नरसिंह शांत झाला ।’, अशा औदुंबरास दत्त संप्रदायामध्ये कल्पवृक्षाचे स्थान प्राप्त झाले.

(साभार : विविध संकेतस्थळे)