पुणे येथे शिवप्रताप दिनानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण !
पुणे – न्यायालयात हिंदूंची बाजू व्यवस्थित ऐकून घेतली जात नाही. हिंदुत्वनिष्ठ शासन सत्तेत असूनही पुण्येश्वर मंदिरासारख्या विषयांचे न्यायालयीन काम पुढे सरकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे काशी-मथुरा मुक्तीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी व्यक्त केले. ‘शिवप्रतापगड उत्सव समिती, पुणे’ यांच्या वतीने शिवप्रतापदिनानिमित्त नुकतेच विविध पुरस्कारांचे वितरण शुक्रवार पेठेतील नातूबाग मैदान येथे झाले. या वेळी ते बोलत होते.
या वेळी लेफ्टनंट जनरल सतीश नवाथे (निवृत्त), ह.भ.प. संग्रामबापू भंडारे, पावन सराफ, स्वाती मोहोळ, समितीचे अध्यक्ष श्री. संजय भोसले, प्रमुख संयोजक श्री. मिलिंद एकबोटे, श्री. नंदकिशोर एकबोटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अधिवक्ता विष्णु जैन पुढे म्हणाले की, अनेक राज्यांमध्ये प्रलोभने दाखवून धर्मपरिवर्तन होत आहे. हिंदूंसमोर हे संकट असून आपल्या अधिकारांसाठी जागृत होण्याची आवश्यकता आहे. आपली एकजूट झाली नाही, तर मालेगावसारख्या खटल्यामध्ये निर्दोष असूनही संबंधितांवर झालेल्या अत्याचारांसारख्या घटना वारंवार होतील. त्यांनी या वेळी राज्यघटना आणि कायद्यातील पालट करण्याची आवश्यकता व्यक्त केली. त्यांनी मंदिर सरकारीकरण बंद करणे, वक्फ बोर्ड रहित करणे, ‘पूजा स्थळ कायदा १९९१’ (प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट १९९१) रहित करणे आणि राज्यघटनेतून निधर्मी हा शब्द काढण्याची मागणी केली.

शिवप्रतापदिनाचा पराक्रम !
ह.भ.प. संग्रामबापू भंडारे म्हणाले, ‘‘धर्म आणि भगवंतावरील प्रेम यांमुळे आपला संकल्प सत्य होतो, ज्यामुळे परमेश्वरी शक्ती पाठीशी उभी रहाते. जशी ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभी राहिली आणि शिवप्रतापदिनाचा पराक्रम घडला.’’
जेव्हा काशी आणि मथुरा मुक्त होईल, तेव्हाच सोन्याचे हे कडे घालायला पुन्हा येईन ! – अधिवक्ता विष्णु जैन
‘हिंदवी स्वराज्य भूषण जीवा महाले’ पुरस्कार सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता विष्णु शंकर जैन, ‘शिवभूषण गोपीनाथ पंत बोकील’ पुरस्कार अधिवक्ता विश्वास पानसे (सासवड), ‘हिंदुत्व शौर्य’ पुरस्कार समीर कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी शिवशाहीचे प्रतीक असलेले सोन्याचे कडे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांना देण्यात आले; मात्र त्यांनी हे सोन्याचे कडे स्वीकारण्यास नकार देत ‘जेव्हा काशी आणि मथुरा मुक्त होईल, तेव्हाच हे सोन्याचे कडे घालायला पुन्हा येईन’, असे सांगितले. त्यांच्या या भूमिकेने उपस्थितांमध्ये धर्मतेज निर्माण झाले. |
क्षणचित्रे !
१. मुसलमानांचे तुष्टीकरण थांबवावे आणि अफझलखान वधाचे स्मारक लवकरात लवकर प्रतापगडाच्या पायथ्याला उभे करावे, अशा २ मागण्या श्री. मिलिंद एकबोटे यांनी शासनाकडे केल्या.
२. शाहीर अशोक कामठे यांनी पोवाड्यातून अफझलखान वधाचा इतिहास सांगितला. कार्यक्रमाची सांगता ‘गोरथ’ च्या (चारचाकी वाहन) उद्घाटनाने झाली.

गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !