‘हसणे’ ही निसर्गाने मानवाला दिलेली विलक्षण देणगी आहे. आपण केव्हाही हसण्याची उधळण करू शकतो. हसण्याची वृत्ती केवळ मानवामध्येच दिसते. ‘हसणे’ हा एक आंतरिक, मानसिक आणि बौद्धिक व्यायाम आहे. आनंदी आणि हसतमुख राहिल्याने तणाव वाढत नाही. सर्व रोगांमध्ये लाभकारी आणि सहजसुलभ औषध, म्हणजे ‘भगवंताच्या नामासह हसणे’, हे आहे. नेहमी हसतमुख राहिल्यामुळे आपले आयुष्य पुष्कळ सुंदर होते.

१. हसण्यामुळे स्वतः प्रसन्न राहून इतरांनाही प्रसन्न ठेवू शकणे
एखाद्या अनोळखी माणसाकडे पाहून आपण केवळ स्मितहास्य केले, तरीही दोघांमध्ये जवळीक निर्माण होऊन प्रेमभाव वाढतो. एकमेकांना साहाय्य करण्याची ओढ लागते. हा त्यातील सकारात्मक स्पंदनांचा परिणाम असतो. हसणारा स्वतः प्रसन्न रहातो आणि इतरांनाही प्रसन्न ठेवतो.
२. हसण्याने व्यायाम होऊन शरीर निरोगी रहाण्यास साहाय्य होणे
अ. सूर्य जसा अंधार दूर करतो, तसे ‘हास्य’ हे लहान-मोठ्या रोगांना सहजतेने दूर करते.
आ. दिवसाच्या आरंभी काही वेळ हसण्याचा व्यायाम केल्यास दिवसभर ताजेतवाने, उत्साही आणि शक्तीवान असल्याचे अनुभवता येते.
इ. हसण्यामुळे फुप्फुसांना चांगला व्यायाम मिळतो. हसणार्या व्यक्तीच्या फुप्फुसातील अनावश्यक द्रव्ये बाहेर टाकली जातात. त्या व्यक्तीत रक्तसंचार मुक्तपणे होतो. व्यक्तीची श्वासोच्छ्वासाची क्षमता वाढून तिचे आयुष्य वाढते. तिच्या शरिराचे वजन नियंत्रित रहाते. अशक्तपणा, श्वसनरोग आणि दम्याचे विकार यांत हसणे लाभदायक आहे. फुप्फुसांच्या निरोगीपणासाठी हसण्याचा व्यायाम उपयुक्त ठरतो.
ई. चिंता, क्रोध, ईर्षा, द्वेष इत्यादी विषयुक्त मनोभावांची वृद्धी हसण्यामुळे रोखली जाते. हसल्यामुळे व्यक्तीची मनःस्थिती सुधारते, तणाव न्यून होतो आणि रोगप्रतिकार शक्ती वाढून रक्तदाब न्यून होतो. व्यक्तीच्या शरिरात लाभदायक परिवर्तन होते. त्यामुळे आपला चेहरा सतत हसरा ठेवावा.
उ. हसण्याच्या क्रियेत व्यक्तीच्या शरिरातील ‘कॅलरीज’ वापरल्या जातात. त्यामुळे व्यक्तीचा रक्तदाब न्यून होतो.
ऊ. ‘हसणे’ हे अनेक रोगांवर गुणकारी ठरते. मुक्तपणे आणि मोकळेपणाने हसल्याने शरिरात ‘एन्डॉर्फिन्स हार्माेन्स’ सक्रीय होतात. त्यामुळे खाण्याची इच्छा किंवा लालसा नियंत्रणात रहाते.
ए. व्यक्ती आनंदी राहिल्याने तिची संसर्गजन्य आजारांशी लढणारी प्रणाली सक्षम होते. यामुळे विविध संसर्ग आणि ‘ॲलर्जी’ यांच्या प्रभावात येण्यापासून तिचा बचाव होतो. ती ‘ॲलर्जी’सारख्या रोगांना बळी पडत नाही.
ऐ. एका संशोधनानुसार १० मिनिटे व्यायाम केल्याने जेवढी हृदयगती तीव्र होते, तेवढी हृदयगती राखण्यासाठी एक मिनिट हसणे पुरेसे ठरते.
ओ. व्यक्ती हसत असतांना त्या व्यक्तीचे शरीर, मन, भावना आणि विचार एकरूप होतात. तिच्या शरिराच्या कंपनामध्ये एक लयबद्धता येते.
औ. भगवद्नामाचा उच्चार करून हसणार्या व्यक्तीच्या शरिरात लाभदायक पेशीकुंज (हार्माेन्स) सिद्ध होतात. निरागस आणि निष्कपट हसण्यामुळे वेगळे ‘हार्माेन्स’ स्त्रवून ते वेदनाशामक म्हणून कार्य करतात. ते ‘ॲलर्जी’वर उपाय करतात आणि अनेक रोगांपासून आपल्याला मुक्त ठेवतात.
अं. एका आधुनिक वैद्यांनी म्हटले आहे, ‘खळखळून हसल्याने आणि मन सदैव प्रसन्न ठेवल्याने पचनसंस्था सक्षम रहाते. रक्तपेशींमध्ये वाढ होते. मज्जासंस्था ताजीतवानी आणि कार्यक्षम रहाते. यामुळे मनुष्याचे स्वास्थ्य चांगले रहाण्यास साहाय्य होते. त्याच्या व्यक्तीमत्त्वात पालट होऊन तो सदैव प्रसन्न रहातो.’
– श्री. अशोक लिमकर (वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.५.२०२५)

पैसा जिंकला, नाती हरली !
‘मेनोपॉज’नंतर (रजोनिवृत्तीनंतर) वाढणारे आजार आणि आयुर्वेद : प्रतिबंध अन् समतोलाचा मार्ग
‘विश्वगुरु भारत’ होण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची आवश्यकता !
चला, पाल्यांचा मराठी शाळेत प्रवेश निश्चित करूया !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !