
सातारा, २१ नोव्हेंबर (वार्ता.) – येथे दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. वेदभवन मंगल कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्याला वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते, हिंदुत्वनिष्ठ यांच्यासह ३०० हून अधिक धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते. या वेळी पुणे येथील प्रसिद्ध लेखक श्री. अभिजित जोग, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे विशेष प्रतिनिधी श्री. राहुल कोल्हापुरे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
या वेळी भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त सैन्याधिकारी उपस्थित होते. अभिजित जोग यांच्या हस्ते कॅप्टन विजयकुमार मोरे, सुभेदार स्वामी जाधव, सुभेदार मेजर पांडुरंग उदगुडे यांचा सत्कार करण्यात आला, तसेच सनातन प्रभातच्या वितरकांचा सत्कार करण्यात आला. सनातन प्रभातच्या काही वाचकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
जगभर डावी वाळवी बोकाळली आहे ! – अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक

२६ वर्षांपासून हिंदुहितासाठी धडपडणार्या ‘सनातन प्रभात’चा प्रवास मी जवळून पाहिला आहे. त्यामुळे मला ‘सनातन प्रभात’चा अभिमान आहे. सध्या देशापुढे गंभीर आव्हाने आहेत. आपल्यातच शत्रू वावरत आहेत. अमेरिका ‘डीप स्टेट’ (‘डीप स्टेट’ म्हणजे सरकारी अधिकारी आणि खासगी संस्था यांचे गुप्त जाळे.) धोरण अवलंबून भारतामध्ये अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहे. बांगलादेश आणि श्रीलंका येथील आंदोलने ही त्याची ताजी उदाहरणे आहेत. दुसर्या बाजूला साम्यवादी भारताची सांस्कृतिक परंपरा नष्ट करू पहात आहेत. धर्मव्यवस्थेला कुटुंबव्यवस्थेकडून बळ मिळते; मात्र कुटुंब व्यवस्थाच मोडकळीस आणण्याचे षड्यंत्र साम्यवादी अन् डाव्या विचारसरणीकडून रचले जात आहे. तिसरीकडे जिहादी इस्लाम तलवारीच्या जोरावर जग जिंकण्यास निघाला आहे. चौथ्या बाजूला देशात इव्हॅनजिकल चर्च शांतपणे हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. त्यासाठी आदिवासी समाजात मोठ्या प्रमाणात कार्य चालू आहे. संपूर्ण जगाला डावी वाळवी पोखरून नष्ट करू पहात आहे. यासाठी हिंदूंनी संघटितपणे याचा सामना करण्यात सिद्ध व्हावे !
भारत ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची वेळ आली आहे ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

२६ वर्षांची ‘सनातन प्रभात’ची दैदीप्यमान वाटचाल हिंदूंना हिंदु राष्ट्रा’साठी आश्वासक आहे. सध्या भारतामध्ये ‘नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) पसरवण्याचे कार्य हिंदुविरोधकांकडून चालू आहे. ‘आतंकवादाला धर्म नसतो’ म्हणणार्यांनी देहली येथे झालेल्या बाँबस्फोटांचा विचार करावा. त्यामध्ये सापडलेले सर्व आतंकवादी हे उच्चविद्याविभूषित आहेत. लव्ह जिहाद आणि लँड जिहाद यांच्या माध्यमातून हिंदूंची मोठी हानी होत आहे. त्यामुळे भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची वेळ आली आहे.
‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून राष्ट्र अन् धर्मरक्षणाचा वसा पुढे चालूच ठेवणार ! – राहुल कोल्हापुरे, दैनिक ‘सनातन प्रभात’

जेव्हा हिंदूंना हिणवले जात होते, तेव्हा २६ वर्षांपूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘सनातन प्रभात’ या नावानेच नियतकालिक चालू केले. ‘सनातन प्रभात’मुळे हिंदूंचा हरवलेला आत्मविश्वास पुन्हा जागृत होऊन हिंदू संघटित होऊ लागला आहे. ‘सनातन प्रभात’ने चालू केलेल्या या वैचारिक आंदोलनाचा आवाज देशाच्या संसदेतही ‘हिंदु राष्ट्रा’च्या मागणीच्या स्वरूपात ऐकायला मिळत आहे. ‘सनातन प्रभात’ बंद पाडण्यासाठी अनेक राजकारणी, निधर्मी, पुरो(अधो)गामी, साम्यवादी यांनी प्रयत्न केले; मात्र ‘सनातन प्रभात’चा झंझावात कुणीही रोखू शकले नाही. राष्ट्र आणि धर्मरक्षणासाठी घेतलेला वसा आम्ही पुढे असाच चालू ठेवू !
वर्धापनदिन सोहळ्यात देशसेवा करणार्या वीर सैनिकांचा सत्कार !

सुभेदार मेजर पांडुरंग उदुगडे यांनी ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’मध्ये ३१ वर्षे देशसेवा केली आहे. सैन्यदलात कार्यरत असतांना भारत-चीन युद्ध, भारत-पाकिस्तान युद्ध अशा अनेक मोहिमांमध्ये त्यांनी सक्रीय सहभाग घेतला आहे. वर्ष १९७७ मध्ये ते गस्त घालत असतांना एक हिमकडा कोसळून सुभेदार मेजर पांडुरंग उदुगडे यांच्यासह अनेक सैनिक त्याखाली दबले गेले. या वेळी प्रभु श्रीरामाचा नामजप करत उदुगडे यांनी स्वतः त्यातून बाहेर पडत अन्य सैनिकांना बर्फातून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. या वेळी अनेक सैनिकांचे हात आणि पाय तुटले. एका सैनिकाला स्वतःचे प्राण गमवावे लागले. या प्रसंगात सुभेदार मेजर उदुगडे यांनी सैनिकांना धीर दिला आणि ही परिस्थिती अत्यंत सावधपणे हाताळली. याविषयी केंद्र सरकारकडून त्यांना विशेष सेना पदक देऊन गौरवण्यात आले.

कॅप्टन विजयकुमार मोरे यांनी ‘७ मराठा रेजिमेंट’ या सैन्य तुकडीमध्ये ३० वर्षे उत्कृष्ट सेवा केली. सैन्यसेवेत असतांना त्यांनी चिनी भाषा शिकून देहली येथील सैन्यदल मुख्यालयामध्ये दुभाषक म्हणून सेवा केली. वर्ष १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धासह सैन्यदलामध्ये राबवण्यात आलेल्या विविध मोहिमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. ‘मराठा रेजिमेंट’ची ‘सुभेदार मेजर’ म्हणून धुरा यशस्वीपणे सांभाळल्यामुळे त्यांना भारत सरकारच्या वतीने ‘कॅप्टन’ या पदावर पदोन्नतीने गौरवण्यात आले.

सुभेदार स्वामी जाधव हे ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’मध्ये कार्यरत होते. त्यांचे ‘पोस्टिंग’ शेकूल या ठिकाणी असतांना त्यांच्यावर आतंकवाद्यांना शोधण्याची मोहीम होती. त्या वेळी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणामध्ये त्यांच्या डाव्या दंडावर २ गोळ्या लागल्या. अशा स्थितीतही त्यांनी निकराचा लढा दिला. वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना विमानाने पूंछ येथील रुग्णालयात ठेवण्यात आले. या शौर्याविषयी त्यांना सेना पदकाने गौरवण्यात आले.
प्रारंभी मान्यवर वक्त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. नंतर वेदमूर्ती रविराज जोशी आणि अन्य ब्रह्मवृंद यांनी वेदमंत्रपठन केले. ब्रह्मवृंदाचा सत्कार सनातन संस्थेचे श्री. सुनील लोंढे यांनी केला. ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समुहाचे संस्थापक संपादक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदेशाचे वाचन हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजकुमार सावंत यांनी केले. सनातन संस्थेचे श्री. मंगेश निकम यांनी मान्यवर वक्त्यांचे स्वागत केले. अभिजित जोग यांच्या हस्ते सनातन प्रभातचे विशेष प्रतिनिधी राहुल कोल्हापुरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन रणरागिणी शाखेच्या सौ. रूपा महाडिक यांनी केले. सनातनच्या संत पू. मनीषा पाठक यांच्या हस्ते वेदभवन मंगल कार्यालयाच्या मालक सौ. संध्या पाठक यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी ‘सनातन प्रभात’चे वितरक साधना मुंगळे, सर्वश्री संभाजी भाेसले, विनायक ठिगळे, अमोल मोरे आणि विनोद भंडारे यांचा सत्कार श्री. अभिजित जोग यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी प्रसिद्ध उद्योजक श्री. जयंतीभाई पटेल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी तथा प्रसिद्ध उद्योजक श्री. ओंकार डोंगरे, प्राथमिक शिक्षिका सौ. वैशाली सुतार या ‘सनातन प्रभात’च्या वाचकांनी मनोगत व्यक्त केले.
सातारा येथील वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त काही वाचकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
१. श्री. जयंतीभाई पटेल, प्रसिद्ध उद्योजक आणि हिंदुत्वनिष्ठ व्यावसायिक पाटीदार समाज – सूर्याप्रमाणे प्रखर तेजस्वी आपले ‘सनातन प्रभात’ हे वृत्तपत्र आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सनातन प्रभात’ची वाटचाल यशस्वीपणे चालू आहे. त्याविषयी आम्ही कृतज्ञ आहोत. ‘सनातन प्रभात’ सारखे स्पष्टवक्ते दैनिक आपल्याला कुठेही वाचायला मिळणार नाही. लव्ह जिहाद असो अथवा लँड जिहाद असो हिंदु धर्मावर प्रतिदिन होणारे आघात आपल्याला ‘सनातन प्रभात’ मुळेच कळतात.
२. श्री. ओमकार डोंगरे, हिंदुत्वनिष्ठ व्यावसायिक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान – गेल्या ७-८ वर्षांपासून मी ‘सनातन प्रभात’ वाचत आहे. ‘सनातन प्रभात’मुळे हिंदुत्व, धर्मकार्य, अध्यात्म काय असते ? हे मला शिकायला मिळाले. व्यावसायिक हिंदुत्वनिष्ठ असू शकतो, हे ‘सनातन प्रभात’मुळे मला समजले. ‘पितांबरी उद्योग समुहा’चे श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांचे ‘सनातन प्रभात’मधील लेख मी अवश्य वाचतो. या लेखातून प्रेरणा घेऊन आम्हीही आमच्या आस्थापनामध्ये कर्मचार्यांकडून १ माळ नामजप करून घेतो. व्यवसायानिमित्त बाहेरगावी जातांना माझ्याजवळ दैनिक ‘सनातन प्रभात’चे अंक ठेवतो आणि ते माझ्या व्यावसायिक मित्रांना भेट देतो. ज्या वेगाने ‘सनातन प्रभात’मुळे हिंदू संघटित होत आहेत, ते पाहून असे वाटते की, आता हिंदु राष्ट्र दूर नाही. ‘सनातन प्रभात’ केवळ भारतातच नाही, तर देश-विदेशातही प्रसिद्ध व्हायला हवा, असे वाटते.
३. सौ. वैशाली सुतार, प्राथमिक शिक्षिका, सातारा नगर परिषद – दैनिक ‘सनातन प्रभात’ हे केवळ वृत्तपत्र नसून ते हिंदु धर्मजागृती आणि हिंदूसंघटन करण्याचे महान कार्य करत आहे. सनातन संस्कृती, हिंदूंचे सण-उत्सव यांचे महत्त्व हिंदु धर्माचे शिक्षण ‘सनातन प्रभात’मुळे आज घरोघरी पोचत आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे चैतन्य या अंकाच्या माध्यमातून समाजातील सात्त्विकता वृद्धींगत करत आहे. माझ्या शारीरिक अडचणीमुळे मी गोवा येथे झालेल्या शंखनाद महोत्सवाला उपस्थित राहू शकले नाही; मात्र ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून मी स्वतः शंखनाद महोत्सवाला उपस्थित असल्याची अनुभूती मला घेता आली. याविषयी मी ‘सनातन प्रभात’ आणि गुरुदेव यांच्याप्रती कोटी कोटी कृतज्ञ आहे.
| सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवर
संत, कीर्तनकार : या वेळी सनातनच्या १२३ व्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक, पू. ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज हिंदुत्वनिष्ठ आणि मान्यवर : हिंदु महासभेचे श्री. उमेश गांधी, श्री. ओसवाल, अधिवक्ता संजय शिंदे, अधिवक्ता जनार्दन करपे, योग वेदांत सेवा समितीचे जिल्हा प्रमुख श्री. सतीश केसकर, श्री. दीपक पाटील, अधिवक्ता सोमनाथ भरमगुंडे, पत्रकार दत्तात्रय फडतरे, पत्रकार अमर फडतरे, कराड येथील गोरक्षक श्री. सुनील पावसकर |
Bulandshahr Temple Namaz : बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे हनुमान मंदिरात नमाजपठण करणार्या असर महंमद यास अटक !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जिन्यामध्ये थुंकू नये म्हणून लावलेल्या देवतांच्या टाईल्स पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने काढल्या !