विजयदुर्ग बंदरामध्ये पर्यटकांसाठी प्रसाधनगृह आणि शुद्ध जलपेय सेवेचे भूमीपूजन

भूमीपूजन करताना विजयदुर्गचे प्रभारी (तात्पुरते) सरपंच रियाज काझी

विजयदुर्ग – विजयदुर्ग किल्ले परिसरामध्ये विजयदुर्गला भेट देणार्‍या पर्यटकांसाठी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या वतीने नवीन प्रसाधनगृह आणि पर्यटकांसाठी शुद्ध जलपेय उपलब्ध कक्षाचे भूमीपूजन विजयदुर्गचे प्रभारी (तात्पुरते) सरपंच रियाज काझी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पुरातत्व तज्ञ, मुंबई मंडळाचे अधीक्षक डॉ. अभिजीत आंबेकर याचबरोबर पुरातत्व विभागाचे किल्ले विजयदुर्गचे अधिकारी राजन दिवेकर, तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. या कामासाठी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने निधी उपलब्ध करून दिला आहे. याचबरोबर विजयदुर्ग लगत असलेल्या ऐतिहासिक गोदीसाठीही निधी उपलब्ध करून संवर्धनाचे काम हाती घेतले जाणार असल्याचे पुरातत्व अधिकार्‍यांनी या वेळी सांगितले.

छत्रपतींच्या पराक्रमाने पुनित झालेला ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला जागतिक वारसा केंद्रात समाविष्ट झाल्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याचबरोबर येथे येणार्‍या पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरातत्व विभाग प्रयत्न करत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. नजीकच्या काळात विजयदुर्ग ‘रो रो फेरीबोट’ (वाहनांची वाहतूक करणारी नौका) याचबरोबर उभारली जाणारी आरमार सृष्टी अशा अनेक सोयींमुळे भविष्यात विजयदुर्ग पर्यटनामध्ये प्रगती करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.