नवी मुंबई महानगरपालिकेने १० सहस्र श्री गणेशमूर्तीं ‘शास्त्रोक्त व्यवस्थापन’ करण्यासाठी ३ मास जमा करून ठेवल्या !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेने जवळपास १० सहस्रांहून अधिक श्री गणेशमूर्ती एके ठिकाणी ३ मास काळजीपूर्वक ठेवल्या आहेत. न्यायालयाचा निर्णय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेले निर्देश, यांनुसार या मूर्तींचे ‘शास्त्रोक्त व्यवस्थापन’ करण्यात येणार आहे, अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त सोमनाथ पोटरे यांनी दिली.

पोटरे म्हणाले की, प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या सूचनेनुसार काही सामाजिक संस्थांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. त्यावर चर्चा करून प्रशासन पुढील निर्णय घेईल. या संस्थांकडून निविदा मागवल्या जातील आणि या मूर्तींचे व्यवस्थानपन केले जाईल.

१. मुंबई उच्च न्यायालयाने पर्यावरणाच्या संदर्भातील एका याचिकेच्या सुनावणीमध्ये शासनाला श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनाच्या संदर्भात आणि त्यानंतरच्या प्रक्रियेच्या संदर्भात कार्यवाही करण्याचा आदेश दिला होता. वरील आदेशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी या संदर्भातील काही निर्देश दिले आहेत. राज्य शासनानेही यासंबंधी एक अध्यादेश काढला आहे.

२. वरील निर्देश आणि अध्यादेश यांनुसार नवी मुंबई महानगरपालिकेने नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण होण्याकरता श्री गणेशमूर्ती कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे आवाहन केले होते. कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आलेल्या सहस्रो मूर्ती संकलित करून ठेवण्यात आल्या आहेत.

३. सामाजिक कार्यकर्ते नीलेश कचरे यांनी श्री गणेशमूर्तींचे शास्त्रनानुसार व्यवस्थापन करावे, असे एक निवेदन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना दिले आहे.

१. नवी मुंबई महानगरपालिका श्री गणेशमूर्तींचे ‘शास्त्रोक्त विघटन’ आणि ‘शास्त्रोक्त विल्हेवाट’ लावणार आहे, अशी त्यांचीभूमिका आहे. (‘विघटन’ आणि ‘विल्हेवाट’ या दोन्ही कृती श्री गणेशमूर्तींच्या संदर्भात मुळातच अशास्त्रीय आहेत. त्यामुळे ‘याविषयी कुणी बोलू नये; म्हणून ‘शास्त्रोक्त’ हा शब्द वापरून गणेशभक्त आणि नागरिक यांची निवळ दिशाभूलच केली जात आहे, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ? तसेच ‘शास्त्रीय व्यवस्थापन’ म्हणजे नेमके काय करणार ? हेही जनतेला स्पष्ट करायला हवे ! – संपादक)

२. या उपक्रमासाठी मूर्तींच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसवल्याचे आणि सुरक्षारक्षक नेमल्याचेही समजते. (एवढे महिने याचा अनावश्यक खर्च करण्यापेक्षा मूर्तींचे शास्त्रोक्त पद्धतीने वाहत्या पाण्यात विसर्जन करणे अपेक्षित होते. ‘पीओपीमुळे पाण्याचे प्रदूषण होत नाही’, असा अहवाल काही पर्यावरणवादी संस्थांनी पूर्वीच दिला आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

श्री गणेशमूर्तींचे ‘व्यवस्थापन’ करण्यासाठी ३ मास त्या जमा करून का ठेवल्या ?, याविषयी नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जनतेला सांगितले पाहिजे !