पुणे येथे कृषी विभागाच्या ५ एकर भूमीचा अजून एक घोटाळा उघडकीस !

  • १८०० कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी ५ सदस्यांची समिती

  • तहसीलदारासह ९ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद

शीतल तेजवानी आणि पार्थ पवार

पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार अडचणीत आलेल्या भूमी व्यवहार प्रकरणात गुन्हा नोंद झालेल्या शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांचे अजून एक प्रकरण समोर आले आहे. पुणे शहरातील ‘मुंबई कुळ वहिवाट आणि शेतभूमी अधिनियम १९४८’ अंतर्गत महानगरपालिका क्षेत्र नसतांनाही बोपोडी येथे हा भूमी अपहार करण्यात आला. शासनाच्या कह्यात असतांना आणि वहिवाट असतांनाही ५ एकर भूमी घशात घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले, शीतल तेजवानी यांसह ९ जणांच्या विरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुण्यातील १ सहस्र ८०० कोटी रुपयांचा मोठा भूमी घोटाळा एका दिवसापूर्वीच उघडकीस आला आहे. या प्रकरणी चौकशीसाठी ५ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. १ सहस्र ८०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद झालेल्या शीतल तेजवानी या पसार झाल्या आहेत. त्यांचा ३ दिवसांपासून शोध चालू आहे.

शीतल आणि तिचे पती सागर सूर्यवंशी यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे १० कर्जे घेतली, यातून मिळालेली ४१ कोटी रुपयांची रक्कम इतरत्र गुंतवली होती. पिंपरी-चिंचवड येथील ‘सेवा विकास बँके’तील या घोटाळ्याच्या प्रकरणी सागर यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पिंपरी-चिंचवड पोलीस आणि अंमलबजावणी संचालनालय यांच्याकडून अटक झाली होती. शीतल यांनी मात्र अटकपूर्व जामीन मिळवला होता. त्यामुळे शीतल यांनी केवळ भूमी व्यवहार प्रकरणात नव्हे, तर कर्ज प्रकरणातही फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

५ सदस्यांची समिती व्यवहाराची चौकशी करणार !

पुणे भूमी गैरव्यवहारांच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी नोंदणी उपमहानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे. या प्रकरणात मुद्रांक शुल्क चुकवल्याच्या आरोपांची चौकशी केली जाईल. महसूल, मुद्रांक आणि नोंदणी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालीही एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.

पहिला गट हा नोंदणी उपमहानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यांची समिती मुद्रांक शुल्क चुकवल्याच्या प्रकरणाची चौकशी करील. दुसरा गट हा महसूल, मुद्रांक आणि नोंदणी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यांची समिती या भूमी व्यवहाराची सखोल चौकशी करील.

संपादकीय भूमिका

  • पुण्यात भूमीचे एका मागोमाग एक मोठे घोटाळे उघडकीस येत असतांना प्रशासकीय अधिकारी झोपले होते का ? कि तेच यामध्ये पूर्णपणे सहभागी होते, असेच या घोटाळ्यांचे स्वरूप आणि व्याप्ती आहे.
  • हे तर उघड झालेले घोटाळे आहेत. न उघड झालेले किती असतील, याची कल्पना करता येत नाही.