काळाच्या ओघात हरवलेले दागिने – एक शोध !

निसर्गाने जसे प्राण्यांना सौंदर्य दिले, तसेच ते मनुष्यप्राण्यालाही दिले; परंतु मनुष्यप्राण्याने हे निसर्गदत्त सौंदर्य नाकारून स्वतः काही वेगळी परिमाणे निर्माण केली. सुंदर दिसण्यासाठी वस्त्रे आणि देहयष्टी यांवर ‘दागिने’ या प्रकाराने कायमची मात केली. अशा या जुन्या-नव्या दागिन्यांचा इतिहास, त्यांचे प्रकार आणि इतिहास यांविषयीचा ऊहापोह प्रस्तुत लेखात केला आहे.

गळ्यातील हार

१. प्राण्यांना निसर्गदत्त दागिन्यांची भेट !

नथ

‘सर्व प्राण्यांना जे काही नटवायचे, ते निसर्गाने स्वतःच नटवले आहे; पण मनुष्यप्राण्याला मात्र निसर्गाने दिलेले सौंदर्य अपूर्ण वाटते. अनादि काळापासून तो सतत अधिकाधिक सौंदर्याच्या शोधात असतो. अगदी मोहेंजोदरो आणि हडप्पा, इजिप्शियन, ग्रीक, अशा सर्व पुरातन संस्कृतीत त्याची बीजे आढळतात. निसर्गाला जे सौंदर्य द्यायचे, ते त्याने सर्व प्राण्यांमधील नरांना दिले आहे. सुंदर दिसण्यासाठी त्याने विविध प्राणी, पक्षी आणि कीटक यांच्यातील नरांना सुंदर रंग, पिसारा, तुरे, आयाळ, आवाज आणि आकार दिले आहेत; पण मनुष्यप्राण्याने मात्र हे असे निसर्गदत्त सुंदर दिसणे नाकारून स्वतः काही वेगळी परिमाणे निर्माण केली. त्यानुसार तसे सुंदर दिसणे त्याने मुख्यत्वेकरून स्त्रीकडे सोपवले आहे. सुंदर दिसण्यासाठी वस्त्रे आणि देहयष्टी, यांवर ‘दागिने’ या प्रकाराने कायमची मात केलेली आहे.

२. समस्त मानवजातीचे ‘दागिनेप्रेम’ उपजतच !

मानवाचे ‘दागिनेप्रेम’ उपजतच असावे. जगभरात विविध ठिकाणच्या संस्कृतींमध्ये एकाच वेळी या ‘दागिनेप्रेमा’च्या खुणा आढळून येतात. सहस्रो वर्षांपूर्वी दगडांमध्ये कोरली गेलेली लेणी आणि मूर्ती याची साक्ष देतात. पुरातन वाङ्मयात याचे उल्लेख आढळतात. वेदांमध्ये विपुल वर्णने आढळतात. इटलीमधील जिनेव्हा, ब्राझिल अशा ठिकाणच्या वस्तूसंग्रहालयांत अतीप्राचीन दागिने, म्हणजे इसवी सनपूर्व २० सहस्र वर्षांपूर्वींचे शंख, कवड्या आणि प्राण्यांचे दात यांच्या माळा पहायला मिळतात. आफ्रिका खंडात सहस्रो वर्षांच्या जुन्या संस्कृती, तसेच आदिवासी आणि जंगलनिवासी यांच्या दागिन्यांसाठी वापरल्या जाणार्‍या वस्तूंच्या मूल्यापेक्षाही स्थानिक कलेचा अधिक प्रभाव दिसतो. शंख, शिंपले, पक्षांची पिसे, प्राण्यांची हाडे, भाजलेल्या मातीचे मणी, रंगीत दगड, लाकडाचे तुकडे इत्यादींचा सहज वापर केला जाई. पक्षी, प्राणी आणि मासे यांच्या हाडांचे दागिने हे मेलेल्या प्राण्यांच्या हाडांपासूनच बनवले जात असत. त्यासाठी प्राणी मारले जात नसत. हस्तीदंतासाठी हत्ती न मारता मेलेल्या हत्तीचे दात, म्हणजेच ‘प्रेतगजदंत’ वापरला जात असे. प्रचलित चलनी नाण्यांचे हार, सरी, असे दागिने बनवले जात असत; पण नंतरच्या काळात दागिन्यांसाठी अशा कुठल्याही वस्तू न वापरता यासंदर्भात अधिक डोळसपणे विचार केलेला दिसतो.

३. प्राचीन काळी दागिन्यांचा अनेक दृष्टींनी विचार ! 

पूर्वापार दागिने घालायची शरिरावरील स्थाने, दागिन्यांचे धातू, आकार, खडे, हिरे, मोती इत्यादींविषयी ज्योतिष, आयुर्वेद, तात्कालिक ग्रहस्थिती, अशा अनेक दृष्टींनी विचार केला जात असे. सोने हे उष्ण, चांदी थंड, विविध खड्यांचे अनेक गुण विशेष लक्षात घेतले जात असत. सोने, चांदी आणि काही खडे यांच्यात विशिष्ट प्रकारचे विष शोषून घेण्याचा गुण आहे. शारीरिक व्याधी, आजार आणि गरोदरपण यांचाही विचार केला जात असे. कुणी कुठले दागिने कुठे वापरावेत ?, यांचे परंपरागत संकेत रूढ झालेले होते. राजाचा अपवाद वगळता अन्य कुणीही पायामध्ये सोन्याचा दागिना न वापरण्याचा संकेत होता.

नखशिखांत वापरल्या जाणार्‍या दागिन्यांची सूची !

आपण आता नखशिखांत वापरल्या जाणार्‍या दागिन्यांची सूचीच पाहू. याची प्रदेश आणि समाजनिहाय फार वेगवेगळी नावे अस्तित्वात आहेत. अशी सर्व नावे जर एकत्र केली, तर ‘अलंकार सहस्रनामावली’ सिद्ध होऊ शकते.

(चित्रावर दोनदा क्लिक करा)
वळी

अ. पायाची बोटे : अनवट, अंगुष्ठा, पोल्हारा, जोडवी, विरवल्या, गेंद, मासोळ्या, विंचू (बिछवा), तांब्याच्या अंगठ्या किंवा वळी

आ. पायाचा घोटा आणि पावले : तोरड्या, साखळ्या, पैंजणे, झांजर, लच्छा, छडा, वाळे, कडे, चाळ, तोडे. पायातील साखळ्यांना कन्नड भाषेत ‘अंदु’ म्हणतात. हा शब्द ‘वाक्या, वाळे, अंदु कृष्ण, नवनीत चोरी’, या मराठी अभंगात दिसतो.

इ. कंबर : कंबरपट्टा, कटिबंध, मेखला, कांची, कलाप, कडदोरा, मणी दोरा, साखळ्या, पोंद

कंबरपट्टा

ई. मनगट : कंकण, बांगड्या, पाटल्या, गोठ, तोडे, बिलवर, जवे, पिछोड्या, मोत्याच्या सरांचा गजरा, पोची, कडे, मनगट्या, चुडा, बिंदल्या, कांडवाळे, शिंदेशाही तोडे, साखळी

उ. हाताची बोटे : अंगठी, नागमुद्रा, पवित्रक, मुद्रा, वळे, सल्ले, दशांगुळे, वेढे, मुंद्री.
ऊ. दंड : वाकी, बाजूबंद, केयूर, नागबंद, नागोत्र, तोळेबंद, कोपरवाळी, विविध प्रकारची कडी, ताईत

ए. गळा : दागिन्यांच्या दुनियेत सर्वाधिक वापरले जाणारे दागिने हे गळ्यातील दागिने आहेत. स्त्री, पुरुष आणि लहान मुले यांच्या कंठभूषणांची सूची फार मोठी आहे – मंगळसूत्र, सरी, पुतळ्यांची माळ, बोरमाळ, मोहनमाळ, चंद्रहार, कंठा, तन्मणी, जोंधळे पोत, पेंड, चिंचपेटी, लफ्फा, वज्रटीक, एकसर, चपलाहार, कंठी, ठुशी, लॉकेट, वाघनखे, ताईत, साखळ्या, जिवती, पणती, शिवलिंग, हसळी, गाठले, साज, रुद्राक्ष, ओवेर साज (कोकण), डोरले, पाभर किंवा शिरण (ख्रिस्ती), डाळी टीका (मुसलमान), काशी ताळी (सारस्वत), पोवळी हार

ऐ. कान : कुडी, मुरकी, घोस, काप, वेलाचे काप, कर्णफुले, डूल, रिंग्ज, लवंग, गाठा, झुमका, कुर्डू, बुगडी, बाळी, भोकर, मत्स्य कुंडले, मकर कुंडले, चौकडा, भिकबाळी, लटकन, झेला

कर्णफुले

ओ. नाक : मुख्य अलंकार नथ (यामध्ये ब्राह्मणी, मराठा, कोल्हापुरी, धनगरी, कोकणी, वर्‍हाडी , मुसलमान, आगरी, पाठारे प्रभु असे अनेक प्रकार आहेत). नाथुली (कुमाऊँ आणि गढवाल), फुली, बुलाक (उत्तराखंड), मोरणी, चमकी, सुंकले

औ. डोके आणि केस : नागवेणी, चाफेकळीची वेणी, गोंडा, वेणीची फुले, भांगसर, भुंगा, बिंदी, बोर, आकड्यातील फुले, बाशिंग, मुंडावळ्या, मुकुट, शिरपेच, कलगी, तुरा.

(साभार : ‘आपले मराठी अलंकार’, लेखक : डॉ. म.वि. सोवनी)

– श्री. मकरंद करंदीकर

४. जगात भारतामध्ये ‘दागिने संस्कृती’चा सर्वाधिक बहर !

बिंदी

जागतिक तुलनेत भारतामध्ये ‘दागिने संस्कृती’ सर्वाधिक बहरलेली असावी. येथे सर्व वयोगटातील स्त्री, पुरुष, बालके, देवता, इतकेच काय; पण प्राण्यांसाठीही दागिने आहेत. मानवी देहाचा जो जो भाग सार्वजनिकपणे दिसतो, त्या प्रत्येक अवयवावर वापरण्याचे एकाहून अधिक दागिने अस्तित्वात आहेत. दक्षिण भारतात एकाच वेळी एकाच अवयवावर अनेक दागिने घालण्याचा सोस प्रकर्षाने दिसून येतो. देशात ठिकठिकाणी दागिन्यांची वेगवेगळी नावे आणि प्रकार आढळतात. संपूर्ण भारतात अगदी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत केसांतील दागिने एकाच पठडीतील असत. ज्या ठिकाणी घुंगट (डोक्यावरून चेहरा झाकला जाईल अशा प्रकारे साडीचा पदर घेणे) घ्यायची पद्धत होती, त्या प्रदेशात अधिक भर हा कपाळपट्टी आणि केसांचा कानाकडून दिसणार्‍या भागातील दागिन्याला दिला गेला. मराठी ब्राह्मण स्त्री, गोव्यातील अन् द्रविडी स्त्रिया डोक्यावरून पदर घेत नसल्याने त्या सहज दिसतील, असे दागिने वापरत असत.

५. दागिन्यांचा अन्य कारणांसाठीही वापर !

दागिने हे सौंदर्यासाठी वापरले जात असत, तसेच ते अन्य अनेक कारणांसाठी वापरले जात असत. स्त्री विवाहित असल्याची ओळख (मंगळसूत्र), वाईट गूढ शक्तींपासून रक्षण (ताईत, गंडे, दोरे, दृष्ट मणी), शौर्य निदर्शक (पदके, कडी, कंठा), ईश्वरभक्ती (तुळस, स्फटिक, रुद्राक्ष माळ), एखाद्या ग्रहाची कृपा (विविध रत्ने आणि खड्यांचे लॉकेट्स), शौर्य निदर्शक (वाघ किंवा अस्वल नखे, अस्वलाच्या केसांचा ताईत); पराक्रम, विजय (पदक, सन्मान चिन्ह); शिवभक्ती, वैराग्य (रुद्राक्ष), असे अनेक प्रकार सांगता येतात. काही धनगर मंडळींच्या गळ्यात चामड्याच्या वादीत ओवलेले जाड दगडी मोठे मणी असतात. कोल्हे, लांडगे, तरस अशा प्राण्यांपासून स्वतःचे आणि मेंढरांचे रक्षण करण्यासाठी ते या वादीचा अन् मण्यांचा गोफणीसारखा उपयोग करतात. त्यांचा नेम इतका अचूक असतो की, असा मणी कपाळावर बसल्यावर तो प्राणी जागच्या जागी गतप्राण होतो. लिंगायत गुरव समाजाच्या पुरुषांच्या गळ्यात शिवलिंग ठेवलेली चांदीची डबी बांधलेली असते. भारतामध्ये हिंदु देवस्थानांमध्ये पिढ्यान्‌पिढ्यांचे सोन्याचे प्रचंड दागिने आहेत. लग्नातील दागिने हे स्त्रीधन मानले जाते. त्यावर केवळ त्या स्त्रीचाच अधिकार असतो.

६. आभाळाला भिडलेले दागिन्यांचे भाव !

बांगड्या

जगभर आता दागिन्यांचे भाव हे सर्व मर्यादा ओलांडून आभाळाला भिडले आहेत. सोन्याचा भाव १ लाख रुपयांच्या बराच पुढे गेला असून तो अडीच लाखांच्याही पुढे जाईल, याची निश्चिती आहे. सोन्या-चांदीसह प्लॅटिनम, ब्लॅक गोल्ड यांचे, तसेच रंगीत दागिने आले आहेत. ‘हेट यलो मेटल’ (सोन्याचा द्वेष करा), ही विचारसरणी वाढते आहे. चोरीच्या भीतीने दागिने बाहेरही सहज वापरता येत नाहीत आणि घरातही ठेवता येत नाहीत. बँकेत रग्गड शुल्क भरून लॉकरमध्ये बंद करून ठेवावे लागतात. अर्थतज्ञ म्हणतात की, असे सोने जरी बाजारात आणले, तरी आपला देश जगात फार मोठा होईल. भारतियांचे सुवर्णवेड न्यून करण्यासाठी १४ कॅरेट्सचे दुय्यम सोने आणून झाले. घरात अधिक सोने ठेवण्यावर बंदी आणून झाली. सरकार ‘गोल्ड बाँड्स’ (सोने हमी योजना), ‘गोल्ड डिपॉझिट स्कीम्स’ (सोने मुदत ठेव योजना) आणते, आयातशुल्क वाढवते; पण ‘हौसेला मोल नाही’, हेच खरे !

७. …तर सोन्याचे भाव निश्चितच खाली येतील !

हिर्‍यांचे भाव गगनाला भिडल्यावर अन्य मार्गांची चाचपणी चालू झाली. विविध वैज्ञानिक प्रयोगाअंती ‘लॅबग्रोन’ म्हणजेच प्रयोगशाळेतच हिरे निर्मितीत यश मिळाले. असेच आता ‘सर्न’ या संस्थेमध्ये ‘जस्ता’चे (अत्यंत अल्पकाल टिकलेले) सोने बनवता आले, तसेच अमेरिकेत ‘न्यूक्लियर फ्यूजन’द्वारे पार्‍यापासून सोने बनवण्याचे प्रयोग चालू आहेत. हे प्रयोग पुढे जर यशस्वी झाले, तर सोन्याचे भाव निश्चितच खाली येतील. ‘जुने ते सोने’, हे खरे असले, तरी ‘सोने ते सोनेच !’

– श्री. मकरंद करंदीकर, ठाणे

(पूर्वप्रसिद्धी : ‘घरकुल’ त्रैमासिक, दिवाळी अंक २०२५)