Screen Addiction Among Elderly : ज्येष्ठांचाही ५० टक्के वेळ ‘टीव्ही’, ‘स्मार्टफोन’, ‘गेमिंग डिव्हाईस’वर व्यतित होतो !

  • ६५ हून अधिक वर्षांच्या १०० टक्के ज्येष्ठांकडे ‘स्मार्टफोन’

  • वृद्धांच्या अनेक आजारांचे कारण बनली ‘डिजिटल’ उपकरणे !

(गेमिंग डिव्हाईस – खेळ खेळण्याचे उपकरण)

प्रातिनिधिक छायाचित्र

लंडन / न्यूयॉर्क – ब्रिटनच्या ‘नॅशनल गेमिंग डिसऑर्डर सेंटर’मध्ये नुकत्याच ७२ वर्षांची एक वृद्ध महिला उपचारांसाठी भरती झाली. वृद्ध महिलेला भ्रमणभाषवर ‘गेम’ खेळण्याचे व्यसन होते. आतापर्यंत येथे ६७ वृद्धांवर उपचार झाले आहेत. आतापर्यंत येथे केवळ किशोरवयीन मुलेच ‘स्क्रीन’च्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी येत असत. आता वृद्धही येऊ लागले आहेत. आता किशोरवयीन मुलांपेक्षा वृद्धांची चिंता अधिक आहे.

१. ‘ग्लोबल वेब इंडेक्स’च्या (जीडब्ल्यूआय) अहवालानुसार आता वृद्धही ‘स्क्रीन ॲडिक्ट’ (भ्रमणभाष, संगणक अथवा तत्सम उपकरणे सलग वापरण्याचे व्यसन) बनत आहेत. ते स्वतःचा ५० टक्के वेळ ‘टीव्ही’, ‘स्मार्टफोन’, ‘टॅब’ आणि ‘गेमिंग डिव्हाईस’वर घालवत आहेत.

२. ‘हार्वर्ड मेडिकल स्कूल’शी संलग्न ‘मॅकलीन हॉस्पिटल’च्या ‘टेक अँड एजिंग लॅब’चे प्रमुख इप्सित वाहिया म्हणतात, ‘‘वृद्धही किशोरवयीन मुलांसारखे भ्रमणभाषमध्ये जगत आहेत. हा पालट मनोरंजनापुरता मर्यादित नाही, तर त्याचा त्यांची झोप, शारीरिक हालचाल आणि मानसिक आरोग्य यांवरही परिणाम होत आहे.’’

३. डॉ. वाहिया म्हणतात, ‘‘वृद्धांमध्ये ‘स्क्रीन टाइम’ हा झोपेची समस्या, ऑनलाईन फसवणुकीची भीती यांसारख्या समस्यांचे मूळ कारण असते. काहींमध्ये नकारात्मक बातम्या वाचल्याने चिंता वाढली होती. वृद्धांमध्ये स्क्रीन टाइमशी संबंधित समस्या अनेकदा लपलेल्या असतात; कारण ते भ्रमणभाषच्या व्यसनाची तक्रार करत नाहीत.’’

४. वृद्धांसाठी ‘गेमिंग’ हे वेळ घालवण्याचे माध्यम बनले आहे. गाणी आणि व्हिडिओ यांमुळे त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या होतात. डॉ. वाहिया यांनी म्हटले आहे की, किशोरवयीन मुलांच्या तुलनेत वृद्धांचे सामाजिक संबंध आधीपासूनच बळकट असतात. त्यामुळे ‘स्मार्टफोन’ त्यांच्या नात्यांमध्ये अडथळा आणत नाहीत, तर नाती बळकट करतात.  नैराश्याने ग्रासलेल्या ८५ वर्षांच्या एका महिलेला डॉ. वाहिया यांनी ‘व्हर्च्युअल रिॲलिटी’द्वारे (आभासी वास्तव दाखवणार्‍या तंत्रज्ञानाद्वारे) त्यांच्या लहानपणीचे घर, शाळा यांची भेट घडवली. यामुळे त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि त्यांचा अनेक वर्षांचा तणाव दूर झाला, म्हणजेच तंत्रज्ञान त्यांना साहाय्यही करते.

१० वर्षांत वृद्धांच्या ‘डिजिटल’ उपकरणांच्या वापरात ६० टक्के वाढ

मागील दशकात वृद्धांमध्ये ‘डििजटल’ उपकरणांचा वापर झपाट्याने वाढला आहे. १० वर्षांपूर्वी अमेरिकेत ६५ वर्षांवरील केवळ २० टक्के लोकांकडे ‘स्मार्टफोन’ होते. ही संख्या आता ८० टक्के झाली आहे. ‘जीडब्ल्यूआय’च्या अभ्यासानुसार ६५ वर्षांवरील लोक आता २५ वर्षांपेक्षा अल्प वयाच्या तरुणांपेक्षा अधिक प्रमाणात ‘टॅब्लेट’, ‘स्मार्ट टीव्ही’, ‘ई-रिडर’ आणि संगणक वापरतात. तंत्रज्ञान आस्थापनेही हे लक्षात घेऊन उत्पादने बनवत आहेत. ‘स्मार्टवॉच’, म्हणजे नव्या तंत्रज्ञानाने युक्त हातात घालायच्या घड्याळांमध्ये ‘ईसीजी’ आणि आपत्कालीन दूरभाष करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. परिणामी १७ टक्के वृद्ध ‘स्मार्टवॉच’चा वापर करत आहेत.

प्रतिदिन ३ घंटे वापर

निवृत्तीनंतर वृद्धांना वेळेची कमतरता नसते. पूर्वी हा वेळ पूजा आणि टीव्ही पहाणे यांत जात होता. आता ‘स्मार्टफोन’, ‘टॅब्लेट’, संगणक वापरण्याचा वेळ वाढला आहे. ब्रिटनमध्ये ६५ वर्षांवरील लोक प्रतिदिन सरासरी ३ घंटे वेळ ‘ऑनलाईन’ घालवतात. हा वेळ १८ ते २४ वर्षे वयाच्या तरुणांच्या तुलनेत निम्मा आहे; पण जेव्हा ‘टीव्ही’, ‘स्मार्टफोन’ उपकरणे दोन्ही एकत्र पाहिली जातात, तेव्हा एकूण ‘स्क्रीन टाइम’ तरुणांपेक्षा अधिक होतो. १० वर्षांत ५० ते ६० वर्षे वयोगटातील लोकांमध्ये सामाजिक माध्यमे, मिडिया, ‘गेमिंग’, ‘ऑडिओ स्ट्रीमिंग’चा (माहिती ऐकण्याचा) वेळ वाढला आहे.

धोकाही वाढला !

दक्षिण कोरियामध्ये झालेल्या एका संशोधनानुसार ६० ते ६९ वर्षे वयोगटातील १५ टक्के लोकांना ‘स्मार्टफोन’चे व्यसन आहे. अनेक जण भ्रमणभाषचा वापर न्यून करण्याचा प्रयत्न करतात; पण अयशस्वी होतात. जपानमधील संशोधनात असे आढळून आले की, ‘स्क्रीन टाइम’ वाढल्याने वृद्धांची शारीरिक हालचाल न्यून होते. चीनमध्ये वयाच्या ६० वर्षांवरील लोकांवर केलेल्या सर्वेक्षणात ‘स्क्रीन टाइम’चा संबंध खराब झोपेशी जोडला गेला. वृद्धांसाठी ‘स्क्रीन टाइम’चे धोके किशोरवयीन मुलांपेक्षा वेगळे आहेत. वृद्धांची उपकरणे अनेकदा बँक खात्यांशी जोडलेली असतात. फसवणूक करणारे लोक याद्वारे त्यांची फसवणूक करू शकतात.

वृद्धांच्या ‘स्क्रीन टाइम’वर लक्ष ठेवण्यास कुणीही नाही !

किशोरवयीन मुलांच्या ‘स्क्रीन टाइम’वर आळा घालण्यासाठी शाळा आणि पालक त्याकडे लक्ष ठेवतात; पण वृद्धांवर असे लक्ष ठेवणारे कुणी नसते. ते स्वतः निर्णय घेतात. अनेकदा त्यांना साहाय्याची आवश्यकता असते, हे त्यांना स्वतःलाही कळत नाही. ‘गेमिंग क्लिनिक’ चालवणार्‍या हेन्रीएटा बोडेन-जोन्स म्हणतात, ‘‘अनेकदा वृद्धांच्या जवळ कुणी नसते किंवा जरी कुणी असले, तरी ते वृद्ध संगणकावर काय करत आहेत ? हे पाहू शकत नाहीत.’’

‘डिजिटल’ उपकरणांचा काहींना लाभ

धार्मिक सेवा, ऑनलाईन योगवर्ग, ‘बुक क्लब’ (पुस्तके वाचणार्‍यांचा गट) यांसारख्या गोष्टी वृद्धांसाठी पुष्कळ उपयुक्त आहेत. जे घराबाहेर जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे, तसेच वृद्धांना कुटुंबियांच्या संपर्कात रहाता येते.

 संपादकीय भूमिका 

  • तंत्रज्ञानाने मनुष्याला लाभ न होता, त्याची हानीच अधिक झाली आहे, त्याचे हे उदाहरण !
  • पूर्वी वयोवृद्ध वानप्रस्थाश्रम स्वीकारून देवाचे अधिकाधिक स्मरण करत असत. ती परंपरा चालू न राहिल्याने आताच्या वृद्धांचा अधिकाधिक वेळ अनावश्यक कृतींमध्ये वाया जात आहे. त्यामुळे त्यांच्या मनावरील संस्कार नष्ट न होता, ते तसेच राहून पुनःपुन्हा जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांत अडकत आहेत. त्यामुळे आता लहानपणापासून सर्वांना साधना शिकवणे आवश्यक झाले आहे !