मदरशाने १३ वर्षांच्या विद्यार्थिनीकडे केली ‘कौमार्य प्रमाणपत्रा’ ची मागणी !

  • मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील मदरशातील निंदनीय घटना !

  • नकार दिल्यावर मदरशातून काढले !

एआय निर्मित चित्र

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या मुरादाबाद शहरातील एका मदरशात १३ वर्षांच्या विद्यार्थिनीला कौमार्य प्रमाणपत्र आणण्यास सांगितल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे. पालकांनी वैद्यकीय अहवाल सादर करण्यास नकार दिल्यावर मुलीचे नाव मदरशातून वगळण्यात आले आणि शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देऊन घरी पाठवण्यात आले. मदरशाने प्रवेश देण्याकरता घेतलेले ३५ सहस्र रुपयांचे प्रवेशशुल्कही परत केले नाही. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी चालू केली आहे.

चंडीगड येथील पीडित मुलीच्या वडिलांनी मुरादाबादचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सत्पाल अंतिल यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची १३ वर्षांची मुलगी लोधीपूरमधील एका मदरशात शिकत होती. वर्ष २०२४ मध्ये तिला ७ वीत प्रवेश मिळाला होता. यावर्षी ती ७ वी उत्तीर्ण झाली आणि ८ वीत प्रवेश घ्यायचा होता. या कालावधीत १६ जुलै या दिवशी मुलीला काही दिवसांसाठी घरी बोलावण्यात आले होते. २१ ऑगस्टला पालक मुलीला पुन्हा मदरशात सोडायला गेले असता तेथे उपस्थित मुख्याध्यापक आणि प्रवेश देणारे अधिकारी यांनी तिला प्रवेश देण्यास नकार दिला. त्यांनी मुलीच्या आईला मुलीची वैद्यकीय चाचणी करून कौमार्य प्रमाणपत्र आणण्यास सांगितले. अल्पवयीन विद्यार्थिनीच्या आईने विरोध केल्यावर मदरशातील कर्मचार्‍यांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर मुलीला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देऊन मदरशातून काढण्यात आले.

संपादकीय भूमिका

मदशातील या घटनेविषयी कथित स्त्रीवादी, पुरो(अधो) गामी, मानवाधिकार संघटना काही बोलणार कि नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करणार ?