दिवाळीचा फराळ करू नका; पण त्याची टिंगलही करू नका !

अभ्यंग स्नानानंतर सर्व कुटुंबियांनी एकत्र बसून दीपावलीच्या सणानिमित्त आणि आनंद म्हणून फराळ करणे, ही आपली पिढ्यान्‌पिढ्यांची परंपरा आहे. नंतरही दिवाळीच्या सर्व दिवशी हा प्रघात चालूच रहातो.

दिवाळीच्या फराळातील पदार्थ

१. फराळाविषयीची पारंपरिक प्रथा

करंजी, लाडू, अनरसा, चिरोटे, शंकरपाळे, चकली, शेव, कडबोळी, चिवडा असे अनेक पारंपरिक खाद्यपदार्थ समोर येतात. या सर्व पदार्थांचा आस्वाद घेतल्यानंतर दही-पोहे खाऊन या फराळ कार्यक्रमाची सांगता होत असे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने घरातील सगळ्या नातेवाइकांनी एकत्रित बसून हास्यविनोद करणे, अनेक घरात या निमित्त आलेला एखादा पाहुणा यापूर्वीच्या फराळाच्या आठवणी, असा एक गोफ विणला जात असे. घरात फराळ करण्याआधी देवळामध्ये जाऊन देवाला फराळाचे पदार्थ, नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. एखाद्या नातेवाइकाचे, मित्राचे कुणी मागच्या वर्षी निधन पावले असेल, तर त्याच्या घरी सर्वांत आधी फराळाचे पदार्थ पाठवण्याची पद्धत आजही पाळली जाते. समाजातील अनाथाश्रम, वृद्धाश्रम, रुग्णालये, सीमेवर लढणारे सैनिक यांना अत्यंत आठवणीने फराळाचे पदार्थ पाठवण्याची प्रथा लाखो लोक पाळतात. भारतातून प्रतिवर्षी विदेशामध्ये टनावारी फराळाचे पदार्थ पाठवले जातात. केवळ दिवाळीलाच केले जाणारे हे सर्व पदार्थ, हळूहळू पालटणार्‍या काळानुसार वर्षभर, मुबलक आणि अनेक प्रकारांमध्ये सहज मिळू लागले.

२. सध्या फराळाच्या पदार्थांची थट्टा करून आधुनिक पदार्थ आणि चॉकलेट्स खाण्याची पद्धत

खास दिवाळीचे पदार्थ ही त्याची ओळख आणि प्रसिद्धी पुसट होत गेली; पण त्याचा दुष्परिणामही असा झाला की, ‘दिवाळीला हे पदार्थ खाणे म्हणजे जुनाट बुरसटलेली कल्पना आहे’, असेच हळूहळू वाटू लागले. या पदार्थांचा तिरस्कार करणे, ते खाणार्‍यांना न्यून लेखणे, त्यांची थट्टा करणे, अशा गोष्टी चालू झाल्या. चारचौघे भेटले की, ‘आम्ही सध्या फराळाचे काही करतच नाही’, हे अगदी जाहीरपणे घोटवून, रंगवून सांगितले जाते. ‘त्या चकल्या, करंज्या खाण्याऐवजी आम्ही चक्क पावभाजी करतो, पाणीपुरी करतो, गोड गोड अगदी नको वाटते’, अशा गोष्टी रंगवल्या जातात. गोडाला आपण नाक अती मुरडणे आणि अनेकांना होणारा मधुमेह यांमुळे खरेच गोड खाणे अशक्य झाले आहे; पण त्याच वेळी अनेक मोठमोठ्या अभिनेते-अभिनेत्रींनी केलेल्या ‘कुछ मिठा हो जाये’, या विज्ञापनातील चॉकलेट्स आपल्याला चालतात, हे आश्चर्यच म्हणायचे !

३. मुसलमान आणि ख्रिस्ती यांची परंपरा पालनाविषयी कट्टरता अन् हिंदूंकडून होणारी टिंगलटवाळी !

किती वर्षे तेच तेच लाडू, चकल्या, करंज्या खायचे, अशी आपल्या फराळ संस्कृतीची सातत्याने टिंगल करणारी माणसे मात्र ‘मुसलमान शेजारी ‘शीरखुर्मा’ (शेवयांच्या खिरीचा एक प्रकार) किती छान बनवतो आणि आपल्याला आणून देतो’, याचे कौतुक करतात. ‘एखादा ख्रिस्ती मित्र ख्रिसमसला किती छान केक पाठवतो’, याचेही वर्णन ऐकायला मिळते. त्यांना केक किंवा शीरखुर्मा यांच्याऐवजी ‘चॉकलेट खा’, असे सांगण्याचे धैर्य कुणामध्येही नाही.

सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे कोणताही ख्रिस्ती माणूस ‘किती वर्षे तोच तोच केक खायचा’, असे म्हणत नाही. कोणताही मुसलमान व्यक्ती ‘किती वर्षे तोच तोच शीरखुर्मा खाणार’, असे म्हणत नाही किंवा त्याऐवजी शेजारच्यांना पावभाजी, पाणीपुरी, रगडा पॅटीस नेऊन देत नाही. ते त्यांचीच संस्कृती पाळतात आणि आपण त्यासाठी त्यांचे कौतुकही करतो. मग आपण आपल्या इतक्या पिढ्यांच्या परंपरेची टिंगल टवाळी का करतो ?

४. फराळाची कुचेष्टा करणे टाळा !

जशा चकल्या, करंज्या, लाडू, चिवडा या गोष्टी वर्षभर उपलब्ध असतात, तसेच पावभाजी, पाणीपुरी, रगडा पॅटीस वर्षभर उपलब्ध असतेच ना ! एकत्रित फराळ करणे, ही आपली कित्येक पिढ्यांची परंपरा आहे. यात हिंदु धर्म, संस्कृती, सामाजिक संबंध यांच्या अनेक छटा दडलेल्या आहेत. अनेक गरीब महिला आणि संस्था यांना प्रचंड रोजगार उत्पन्न होतो. जर तुम्हाला खरोखरच कंटाळा आला असेल, तर फराळाचे पदार्थ बनवू नका, विकत आणू नका, खाऊ नका; पण त्याची जाहीर कुचेष्टा करणे, टर उडवणे या गोष्टी अवश्य टाळा.

– मकरंद करंदीकर, ठाणे. (२०.१०.२०२५)