Delhi Pollution : देहलीमध्ये दिवाळीच्या पहिल्याच दिवशी प्रदूषणात वाढ !

सर्वोच्च न्यायालयाने बंदी घालूनही रात्रभर फोडण्यात आले फटाके !

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने देहली-एन्.सी.आर्.मध्ये (नॅशनल कॅपिटल रिजन – राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये) रात्री ८ ते १० वाजेपर्यंत पर्यावरणपूरक फटाके वाजवण्याची अनुमती दिली होती; परंतु २० ऑक्टोबरला रात्री उशिरापर्यंत नागरिक फटाके फोडत राहिले. यामुळे वायूप्रदूषणावर लक्ष ठेवणार्‍या ३८ पैकी ३६ ठिकाणी प्रदूषणाची पातळी वाढली.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मते राजधानीतील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (‘एक्यूआय’ – एअर क्वालिटी इंडेक्स) रात्री १० वाजेपर्यंत ३४४ पेक्षा अधिक झाला. ५० पर्यंत असणारा निर्देशांक सामान्य मानला जातो. यामुळे प्रदूषणविरोधी निर्बंध लागू करण्यात आले. या हंगामात पहिल्यांदा १४ ऑक्टोबर या दिवशी निर्बंध लागू करण्यात आले होते. या अंतर्गत कोळसा आणि लाकूड यांच्या वापरावर बंदी असेल. डिझेलवर चालणार्‍या विद्युत् जनित्राचा वापरही मर्यादित करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

  • फटाके फोडण्याच्या क्षणिक सुखात पर्यावरणाची हानी करून स्वतःचे प्राणही संकटात टाकणारेही देशद्रोहीच होत ! अशांवर देशद्रोहाचाच गुन्हा नोंदवला पाहिजे !
  • प्रदूषणासाठी केवळ फटाक्यांनाच उत्तरदायी न ठरवता अन्य घटकांवरही कठोर कारवाई करण्यासह निर्बंध घातले गेले पाहिजेत !