पाऊले चालती विश्वगुरुपदाची वाट !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या प्रारंभीच देशासाठी ‘जी.एस्.टी. (वस्तू आणि सेवा कर) बचत महोत्सव’ ही आर्थिक विषयाशी संबंधित कृतीच्या स्तरावर नवीन सुधारणा घोषित केली. आश्चर्य म्हणजे आतापर्यंत हिंदूंच्या सणावाराच्या काळात असे कधी काही झाले नव्हते. अगदी गेल्या १२-१३ वर्षांपूर्वी हिंदूंच्या सणासुदीच्या काळात बघितले, तर विजेचे भारनियमन, पाणी कपात, अन्न-धान्याची टंचाई, काळाबाजार, महागाई अशा विविध अडथळ्यांशी हिंदूंना संघर्ष करावा लागत असे. त्यामुळे हिंदूंचे तोंड गोड होणे तर दूरच; पण तोंडाला फेस मात्र पुष्कळ यायचा.

या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच दसरा-दिवाळी या हिंदूंच्या मोठ्या सणासुदीच्या काळात अशा प्रकारे नवीन आर्थिक सुधारणा राबवल्या जाणे, याचा अर्थच हिंदू आणि हिंदुत्वाला एकप्रकारे सन्मानित करणे आहे, असे वाटते. याचे एक कारण हेही असू शकते की, स्वतः पंतप्रधान शास्त्रोक्त पद्धतीने नवरात्रीचे संपूर्ण व्रत करतात. ते शक्तीसहित शंभूचे उपासक आहेत. कारण कुठलेही असो, या निमित्ताने हिंदूंना पहिल्यांदा ‘आपण या राष्ट्राचे दुसर्‍या श्रेणीचे नाही, तर प्रथम श्रेणीचे नागरिक आहोत, याची जाणीव होत असेल’, तर ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधानांनी सगळ्यांचेच तोंड गोड केले. यासाठी त्यांचे आभार ! ‘अधिकस्य अधिकं फलम् ।’ म्हणजे ‘अधिक केल्याचे अधिक फळ मिळते’, या न्यायाने दसरा-दिवाळीच्या तोंडावर हा ‘जी.एस्.टी बचत महोत्सव’ साजरा करण्याचा निर्णय घेऊन आम्हा हिंदूंचे तोंड एका विशेष अर्थाने मधुर केले, यासाठी तुम्हाला अनेकानेक धन्यवाद ! विश्वगुरु बनण्याच्या मार्गावर भारताची सोनपाऊले पडत आहेत, याचेच हे द्योतक आहे. तेव्हा सनातन धर्माच्या शत्रूंनो सावधान !

– श्रीमती कमलिनी कुंडले (वय ६७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.