प्रशासकीय अधिकार्‍यांनी अन्न-औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा आदर्श घेऊन कायदा-सुव्यवस्था अबाधित राखावी !

तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील कर्तव्यनिष्ठ, निर्भीड आणि जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. ज्या ज्या विभागांमध्ये त्यांनी काम केले, तेथे शिस्त, पारदर्शकता आणि कार्यक्षमता यांचा ठसा उमटवला. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच त्यांनी भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट उत्पादने अन् जनतेच्या आरोग्याशी खेळणार्‍या घटकांविरोधात धडक कारवाई चालू केली. लाखो रुपयांचा माल जप्त करून संबंधितांवर गुन्हे नोंदवण्यात आले.

खरेतर महाराष्ट्रात गुटखाबंदी असतांनाही गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाढती विक्री चिंताजनक आहे. शाळा-महाविद्यालयांमधील तरुण-तरुणींना व्यसनांच्या जाळ्यात अडकवण्यासाठी आर्थिक जाळे कार्यरत असते. गुटखामाफियांचे हितसंबंध मजबूत असल्याने अनेकदा कायद्याला आव्हान दिले जाते. अशा वेळी मुंढे यांच्यासारखे अधिकारी कठोर कारवाई करतात.

काही चित्रपट कलाकार, खेळाडू आणि प्रसिद्ध व्यक्ती मोठ्या मोबदल्यासाठी घातक उत्पादनांची विज्ञापने करतात. त्यांच्या लोकप्रियतेच्या प्रभावाने तरुणांना व्यसनाधीनतेला अप्रत्यक्ष प्रोत्साहन मिळते. आदर्श मानल्या जाणार्‍या व्यक्तींनी केवळ पैशासाठी जनतेच्या आरोग्याशी संबंधित अशा उत्पादनांचे समर्थन करणे नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे. अशा विज्ञापनांवर सरकारने कायदेशीर कारवाई करणेही तितकेच आवश्यक आहे.

‘मुंढे यांनी चालू केलेली मोहीम केवळ धाडींपुरतीच मर्यादित न रहाता संपूर्ण व्यवस्थेला उत्तरदायी धरणारी ठरावी’, अशी जनतेची अपेक्षा आहे. आज महाराष्ट्राला तुकाराम मुंढे यांच्यासारख्या प्रामाणिक, निडर आणि लोकहिताला वाहून घेतलेल्या अधिकार्‍यांना राजकीय दबावापासून मुक्त ठेवून त्यांना आवश्यक पाठबळ दिले, तरच जनतेच्या आरोग्याशी खेळणार्‍या भेसळखोर, माफिया आणि नफेखोर प्रवृत्तींना आळा बसू शकेल. राज्यातील इतर प्रशासकीय अधिकार्‍यांनी तुकाराम मुंढे यांचा आदर्श घेऊन कार्य केले, तर राज्यात कायदा-सुव्यवस्था चांगली राहील. नागरिकांनीही प्रामाणिक आणि कर्तव्यकठोर अधिकार्‍यांच्या पाठीशी त्यांची शक्ती उभी केली पाहिजे !

– श्री. अनिल दत्तात्रेय साखरे, कोपरी, ठाणे (पूर्व).