विनामूल्य आरोग्य चाचणी शिबिर, म्हणजे मध्यमवर्गियांशी जीवघेणा खेळ !

‘१८.१.२०२६ च्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील वैद्य सुविनय दामले यांचा ‘स्वतःचे आरोग्य केवळ स्वतःच्या हातात’ हा लेख वाचण्यात आला. त्या लेखामध्ये ‘विनामूल्य आरोग्य चाचणी शिबिरा’विषयीचे कटु सत्य स्पष्टपणे मांडले आहे. याचा अनुभव मी स्वतः नुकताच घेतला आहे. 

हृदयाशी संबंधित चाचणी केल्यावर एक शस्त्रकर्म करण्याविषयी सांगितले जाणे आणि अन्य आधुनिक वैद्यांनी त्याची आवश्यकता नसल्याचे सांगणे

माझी २५ वर्षांपूर्वी हृदयाशी संबंधित मोठी शस्त्रक्रिया झाली आहे. मधुमेह, रक्तदाब आणि रक्त पातळ होण्ो यांविषयीची औषधे चालू आहेत. मी ३ मासांनी या चाचण्या करतो. साधारण २ मासांपूर्वी सांगली येथे आमच्या घराजवळ विनामूल्य रक्त चाचणी शिबिर होते. त्यामध्ये नामवंत मोठ्या रुग्णालयाचा सहभाग होता. मी त्याविषयीचे विज्ञापन वाचून चाचणी करण्यासाठी गेलो होतो. इतर चाचण्यांसमवेत माझा ‘ईसीजी’ (हृदयस्पंदन आलेख) काढला. तेथील आधुनिक वैद्यांनी ‘त्यामध्ये फरक असून पुढील चाचणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला रुग्णालयामध्ये यावे लागेल’, असे सांगितले. ‘हे सर्व विनामूल्य होणार’, असे सांगितल्यामुळे मी मला सांगितलेल्या दिनांकाच्या दिवशी रुग्णालयात गेलो. तेथे ‘२डी इको’ ही चाचणी केल्यावर तज्ञ वैद्यांनी सांगितले, ‘‘तुमच्या हृदयाची कार्यक्षमता न्यून (४८ टक्के) झाली आहे. शस्त्रक्रियेची हमी १५ वर्षे असते. तुमची शस्त्रक्रिया करून २५ वर्षे झाल्यामुळे काही नवीन ‘ब्लॉक’ (हृदयाला रक्त पुरवठा करणार्‍या मुख्य रक्तवाहिनीमध्ये अडथळे) असू शकतात. यासाठी ‘ॲन्जिओग्राफी’ (हृदयाशी संबंधित एक शस्त्रकर्म) करावी लागेल. ती विनामूल्य होणार. लगेच भरती व्हा. त्यानंतर लगेच घरी जाता येईल.’’ मी लगेच संमती दिली. तथापि वेळ होईल म्हणून मी पत्नीस कळवले. तिने थोडा वेळ थांबण्यास सांगितले. तिने एका नातेवाईक वैद्यांना सर्व तपशील सांगितला. त्यांनी सांगितले, ‘काही करण्याची आवश्यकता नाही. तुमची यापूर्वी शस्त्रक्रिया झाली असल्याने जोखमीचे ठरेल. दुसर्‍या आधुनिक वैद्यांचा (डॉक्टरांचा) सल्ला घेऊया.’ त्याप्रमाणे काही दिवसांनी आधुनिक वैद्यांना दाखवले असता त्यांनी हृदयाची कार्यक्षमता ४८ ऐवजी ५५ झाली असून वयोमानानुसार ती योग्य असल्याचे सांगितले.

आरोग्य चाचणी शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या चाचण्यांविषयी सावध रहाणे महत्त्वाचे !

यावरून लेखात उल्लेख केल्याप्रमाणे आरोग्य शिबिरातील अहवालामध्ये (‘रिपोर्ट’मध्ये) कुठेतरी जरा न्यूनाधिक आकडेवारी दाखवून रुग्णाला घाबरवले जाते आणि पुढील चाचणीच्या वेळी ऐनवेळी गुंतागुंत वाढल्यास पुढील खर्चिक चाचण्या करण्यास भाग पाडले जाते, हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. शिबिरामध्ये शिकाऊ कर्मचारी असल्याने अहवालाची निश्चिती वाटत नाही. ‘विनामूल्य आरोग्य चाचणी शिबिर इत्यादी दिशाभूल करणार्‍या विज्ञापनांपासून सर्वांनीच सावध रहावे आणि खात्री करूनच पाऊल उचलावे.’

– एक साधक