‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले साधकांना जी सेवा करायला सांगतात, ती सेवा करण्यासाठी ते साधकांना आवश्यक ते ज्ञानही देत असतात. त्या संदर्भात मला अनुभवायला आलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संकल्पामुळे केवळ ८ ते १० दिवसांत गुजराती भाषा समजू लागणे आणि काही प्रमाणात गुजराती भाषेत बोलताही येणे
वर्ष २००८ मध्ये मी गुजरात दौर्यावर होतो. मला गुजराती भाषा अवगत नसतांनाही गुजराती भाषेतील प्रसिद्धीपत्रके, निवेदने, हिंदु राष्ट्र-जागृती सभांमध्ये करायच्या भाषणांच्या संहिता इत्यादी सहजतेने वाचता येत असत आणि त्यांतील सुधारणा किंवा चुका साधकांना सांगता येत असत. प.पू. डॉक्टरांच्या संकल्पामुळे मला ८ ते १० दिवसांतच गुजराती भाषा समजू लागली आणि मला काही प्रमाणात गुजराती भाषेत बोलताही येऊ लागले.
२. कर्नाटक येथे अध्यात्मप्रसाराची सेवा करणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संकल्पाची आलेली प्रचीती !

२ अ. कन्नड भाषा येत नसल्याने साधकांना मार्गदर्शन करतांना पुष्कळ वेळ लागणे : वर्ष २००९ ते २०१० या कालावधीत मी कर्नाटक येथे अध्यात्मप्रसाराची सेवा करत होतो. मला कन्नड भाषा येत नव्हती आणि तेथील साधकांना हिंदी भाषा येत नव्हती. त्यामुळे मला प्रत्येक वेळी ‘दुभाषी’ म्हणून एका साधकाचे साहाय्य घ्यावे लागायचे. श्री. विनायक शानभाग (वर्ष २०२५ मधील आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४२ वर्षे) बहुतांश वेळा ही सेवा करत असत. ‘मी करत असलेले मार्गदर्शन कन्नड भाषेत भाषांतर करणे आणि साधकांचे कन्नड भाषेतील बोलणे हिंदी भाषेत भाषांतर करणे’, यांत त्यांचा पुष्कळ वेळ व्यय होत असे.
२ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ‘कन्नड शिकण्यासाठी पुस्तक विकत घेतले’, असे सांगितल्यावर त्यांनी ‘कन्नड शिकण्यात वेळ घालवू नका !’, असे सांगणे : काही दिवसांनी माझ्या मनात विचार आला, ‘कन्नड भाषा शिकून घेऊया. त्यामुळे साधकांशी संवाद साधणे सोपे जाईल, तसेच ‘ते काय बोलत आहेत’, हे लक्षात येईल आणि भाषांतर करण्यासाठी लागणारा वेळही वाचेल.’ मी प.पू. डॉक्टरांना सांगितले, ‘‘मी कन्नड शिकण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या संदर्भातील पुस्तकही विकत घेतले आहे.’’ तेव्हा त्यांनी मला त्वरित सांगितले, ‘‘कन्नड शिकण्यात वेळ घालवू नका.’’ त्यांचे आज्ञापालन म्हणून मी कन्नड शिकणे रहित केले.
२ इ. साधकांचे कन्नड भाषेतील बोलणे समजू लागणे आणि कन्नड भाषिक साधकांनाही हिंदी भाषा समजू लागणे : काही दिवसांनी माझ्या लक्षात आले, ‘मी कन्नड भाषा शिकलो नसतांनाही साधक कन्नड भाषेत जे बोलत आहेत, त्याचे मला बर्याच प्रमाणात आकलन होत आहे.’ मला एखादे वाक्य किंवा शब्द समजला नाही, तर मी एखाद्या साधकाला त्याविषयी विचारून समजून घेत असे. त्यामुळे साधकाचा भाषांतर करण्यातील वेळ बर्याच प्रमाणात वाचू लागला. त्यानंतर काही मासांनी गुरुकृपेने कन्नड भाषिक साधकांनाही माझे हिंदी भाषेतील बोलणे हळूहळू समजू लागले.
२ ई. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी ‘कन्नड भाषा शिकण्यात वेळ घालवू नका’, असे मला का सांगितले असावे ?’, ते माझ्या लक्षात आले. ‘मी कन्नड भाषा शिकत आहे’, हे त्यांना सांगितले नसते, तर माझा कन्नड भाषा शिकण्यात साधनेतील पुष्कळ वेळ वाया गेला असता.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना ‘इंग्रजी भाषा शिकून घ्या’, असे सांगणे आणि त्याचा झालेला लाभ !
३ अ. प्रवास करतांना किंवा रात्रीच्या वेळी इंग्रजी पाक्षिक ‘सनातन प्रभात’ आणि इंग्रजी भाषेतील अन्य वृत्तपत्रे यांचे वाचन करणे अन् साधकाशी इंग्रजीत बोलण्याचा सराव करणे आणि केवळ २ मासांत इंग्रजी भाषा चांगल्या प्रकारे बोलता येणे : मला अशीच अनुभूती इंग्रजी भाषेविषयी आली. माझे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. त्यामुळे इंग्रजी भाषेवर माझे प्रभुत्व नव्हते. फेब्रुवारी २०१० मध्ये एकदा प.पू. डॉक्टरांनी मला ‘इंग्रजी भाषा शिकून घ्या’, असे सांगितले. मी दौर्यावर असतांना मला मोकळा वेळ अल्प मिळत असे. त्यामुळे मी प्रवास करतांना किंवा रात्रीच्या वेळी इंग्रजी पाक्षिक ‘सनातन प्रभात’ आणि इंग्रजी भाषेतील अन्य वृत्तपत्रे यांचे वाचन करत होतो. मी श्री. विनायक शानभाग यांच्याशी इंग्रजीत बोलण्याचा सराव करत असे. त्यानंतर केवळ २ मासांत मला इंग्रजी भाषा चांगल्या प्रकारे बोलता येऊ लागली.
३ आ. चेन्नई येथे प्रसारासाठी जाणे आणि गुरुकृपेने साधक अन् हिंदुत्वनिष्ठ यांना इंग्रजी भाषेत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणे : एप्रिल मासात मी चेन्नई येथे प्रसारासाठी गेलो. तेथील १ – २ साधक वगळता अन्य साधकांना हिंदी भाषा मुळीच येत नव्हती. त्यामुळे मला प्रत्येकच वाक्य इंग्रजीत बोलावे लागत असे. ‘मला इंग्रजीत बोलता येईल कि नाही ?’, या विचाराने मी तेथील साधकांना प्रथम हिंदी भाषेतून मार्गदर्शन केले. त्या वेळी तेथील उत्तरदायी साधिका सौ. उमाक्का (आताच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन्, सनातनच्या ७० व्या संत, वय ६० वर्षे) यांना हिंदी समजत होते; पण बोलता येत नव्हते. त्यांनी माझ्या मार्गदर्शनपर सूत्रांचे तमिळमध्ये भाषांतर करून साधकांना सूत्रे सांगितली. त्यामुळे तेथील साधकांना प्रथम मार्गदर्शन करतांना मला ४ घंटे लागले. नंतर मी विचार केला, ‘मला जसे येते, तसे इंग्रजीत बोलणे चालू करूया.’ त्यानंतर मी साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांना इंग्रजी भाषेत मार्गदर्शन करू लागलो. केवळ गुरुकृपेने मला इंग्रजी भाषेतून चांगल्या प्रकारे विषय मांडता येऊ लागला.
३ इ. गुरुकृपेने विदेशी साधकांना मार्गदर्शन करण्याची संहिता एका रात्रीत लिहू शकणे : त्याच वर्षी मला विदेशातील साधकांना संपर्क करून मार्गदर्शन करायला सांगितले. या कालावधीत फोंडा (गोवा) येथे विदेशी साधकांसाठी १० दिवसांचे ‘शिबिर’ होते. त्या शिबिरात मला इंग्रजीतून विविध विषयांवर मार्गदर्शन करता आले. मला आदल्या रात्री दुसर्या दिवशी ‘अमुक एका विषयावर इंग्रजीतून मार्गदर्शन करा’, असे सांगितल्यावर मी मार्गदर्शनाची संहिता इंग्रजीत एका रात्रीत लिहित असे. ‘हे केवळ गुरुकृपेनेच शक्य आहे’, हे मी अनुभवले.
४. उत्तर भारताच्या दौर्यावर असतांना विशेष प्रयत्न न करताही हिंदी भाषा शुद्ध स्वरूपात बोलता येणे
मुंबईत बोलली जाणारी हिंदी भाषा पुष्कळ अशुद्ध स्वरूपाची आहे. अशी हिंदी भाषा कुणी बोलू लागल्यावर उत्तर भारतीय व्यक्ती ‘बोलणारा मुंबईकर आहे’, हे लगेच ओळखतात. माझे आधी हिंदी भाषेतून बोलणेही तशाच प्रकारचे होते. उत्तर भारतातील हिंदी भाषेत पुष्कळ प्रमाणात उर्दू, फारसी इत्यादी अन्य भाषांतील शब्दांचा प्रयोग केला जातो. त्यामुळे तेथे बोलणारी भाषाही तेवढी शुद्ध नाही. मी उत्तर भारताच्या दौर्यावर असतांना मला विशेष प्रयत्न न करता बर्याच प्रमाणात हिंदी भाषा शुद्ध स्वरूपात (उर्दू, फारसी, इंग्रजी, मराठी या भाषांतील शब्दाचा वापर न करता) बोलता येऊ लागली. तेथील साधकांना शुद्ध हिंदी भाषेत काही लिहायचे असल्यास ते मला हिंदीतील योग्य शब्द विचारायचे.
५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संकल्पाने विविध भाषा शिकता येणे
केवळ प.पू. डॉक्टरांच्या संकल्पामुळे मला कन्नड आणि गुजराती या भाषा शिकता आल्या. मला पहिल्या मार्गदर्शनापासूनच हिंदी भाषा शुद्ध स्वरूपात बोलता येऊ लागली. इंग्रजी भाषेत बोलता येण्यासाठी अन्य व्यक्तींना पुष्कळ प्रयत्न करावे लागतात; मात्र मला केवळ २ मासांतच इंग्रजी भाषेत चांगल्या प्रकारे बोलता येऊ लागले. ही केवळ गुरुकृपाच होय !
६. साधनेत बुद्धीचा अडथळा दूर केल्यास गुरूंच्या संकल्पशक्तीचा लाभ होत असतो !
जेव्हा गुरु आपल्याला एखादी सेवा करायला सांगतात, तेव्हा बुद्धीचा अडथळा न आणता साधना म्हणून पूर्ण सकारात्मक राहून तळमळीने गुर्वाज्ञापालन केल्यास ‘गुरुकृपेने सेवेसाठी आवश्यक ज्ञान आणि गुण साधकाला सहज आत्मसात् करता येतात’, हे मला शिकता आले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सुचवलेली शब्दसुमने कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी अर्पण !
इदं न मम ।’
– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.५.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !