विद्यार्थ्यांना जुन्या गोष्टी नव्या दृष्टीने शिकवल्या पाहिजेत !- प्रा. दिलीप बेतकेकर

अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला प्रारंभ

शिक्षणतज्ञ प्रा. दिलीप बेतकेकर

रत्नागिरी – पूर्वीच्या काळी लहान मुलांनी प्रश्न विचारले की, पालक पाप-पुण्याचा विषय असल्याचे सांगत; परंतु आताच्या विद्यार्थ्यांना भारत शिकवण्यासाठी वैज्ञानिक आधारावर आपली प्राचीन परंपरा शिकवली पाहिजे. जुन्या गोष्टी नवी दृष्टीने सांगितल्या पाहिजेत. भारतीय संस्कृतीचा अभिमान जपणारा माणूस म्हणून घडवणे आवश्यक आहे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करायचे आहे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ञ प्रा. दिलीप बेतकेकर यांनी केले.

अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा प्रारंभ आज डॉ. ज.शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातून आतापर्यंत ५० सहस्रांहून विद्यार्थी शिकून गेले. त्यांचे पालक, माजी शिक्षक हा सर्व मोठा ‘डेटा’असून याद्वारे महाविद्यालयाने नवनवीन उपक्रम हाती घ्यावेत. हे सांगताना कायदेतज्ञ नानी पालखीवाला, स्वामी विवेकानंद, पं. दीनदयाळ उपाध्याय, डॉ. कलाम आदींचे संदर्भ आणि गोष्टी त्यांनी सांगितल्या. शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणायचे, ‘आयटी आयटी भरपूर झाले, आता टीआय टीआय म्हणजे थिंक इंडिया, टीम इंडिया साकारली पाहिजे.’ जिथे संधी नाही ते शिक्षण देऊन संधी निर्माण केली पाहिजे, असेही बेतकेकर यांनी सांगितले.

याप्रसंगी मंचावर र.ए. सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी आणि नियामक मंडळ सदस्य डॉ. संजय केतकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य सुनील गोसावी उपस्थित होते.

डॉ. साखळकर यांनी सांगितले की, महाविद्यालयास मोठी परंपरा लाभली आहे. माजी विद्यार्थी आज तज्ञ डॉक्टर, इंजिनियर, सीए आणि अधिवक्ता झाले आहेत. अभ्यंकर आणि जोगळेकर यांच्या देणगीमुळे महाविद्यालयाला बळ मिळाले. र.ए. सोसायटीचे संस्थापक बाबुराव जोशी आणि मालतीबाई जोशी यांच्या दूरदृष्टीमुळे कोकणातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ लागले. त्यांचे स्मरण करणे, हे आपले कर्तव्य आहे.

याप्रसंगी शिल्पाताई पटवर्धन आणि प्रा. दुदगीकर यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकामध्ये प्रा. गोसावी यांनी महाविद्यालयाची प्रगती आणि वर्षभरातील कार्यक्रमांची माहिती दिली. प्रारंभी महाविद्यालय गीत, त्यानंतर दृक्श्राव्य ध्वनी चित्रफीत सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. प्रा. निनाद तेंडुलकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. प्रा. माधवी लेले यांनी पद्य सादर केले, तर प्रा. प्रभात कोकजे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विद्याधर केळकर यांनी आभार मानले.