शेतकर्‍यांसाठी सेंद्रीय प्रमाणपत्रांची पडताळणी करणार ! – दत्तात्रय भरणे, कृषीमंत्री

दत्तात्रय भरणे, कृषीमंत्री

मुंबई – राज्यातील सेंद्रीय प्रमाणित आणि नैसर्गिक शेती उत्पादक शेतकर्‍यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्यशासन शेतकर्‍यांना मार्गदर्शन करत आहे. केंद्रशासन प्रमाणित संस्थांकडून राज्यातील शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या सेंद्रीय प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार असून या पडताळणीमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार आढळल्यास अशा संस्थांचा अहवाल केंद्रशासनाला पाठवणार असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

मंत्रालयात सेंद्रिय प्रमाणीकरण संस्थेच्या संदर्भात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी भरणे म्हणाले की, शेतकर्‍यांची फसवणूक टाळण्यासाठी या उत्पादनाचे प्रमाणीकरण कोणत्या संस्थेद्वारे झाले आहे, हे पडताळणे तसेच प्रमाणीकरण प्रमाणपत्र आणि नियमावली यांची कृषी विभागाकडून माहिती देण्यात येईल. दोषी आढळलेल्या संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्याचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर होईल. वेळप्रसंगी राज्यातील शेतकरीही कायद्याचा आधार घेवून संबंधित संस्थेविरुद्ध तक्रार देऊ शकतात.